रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्‍या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणून महिला दिन साजरा केला जातो. देशात आज अनेक महिला पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व दाखवत आहे. त्यानिमित्त मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील अभिनेत्रींना महिला दिनाबद्दल काय वाटते हे जाणून घेऊया.

मी सगळेच विशेष दिन खूप लाइटली घेते. एक स्पेशल दिवस आपण कोणालातरी डेडिकेट करतो. जसं वाढदिवस तसचं महिला दिनदेखील आहे. मला लहानपासूनचं भावासोबत सारखी वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे मुलगी असल्याची वेगळी वागणूक मिळाल्याचे जाणवले नाही. पण एकंदरीत समाजाची दृष्टी पाहिली तर काही ठिकाणी मुलींना स्वातंत्र्य तर असतं पण  आम्ही करू दिलं म्हणून तू स्वतंत्र जगलीस असे बोलही कुठे ना कुठे ऐकू येतात. बाहेरुन मुलगी संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगतेय असं चित्र असतं. मात्र, कितीही सुशिक्षित घरातील जरी असली तरी अगदी छोट्याछोट्या गोष्टींसाठी तिला घरांच्याची परवानगी घ्यावी लागते. आणि ही मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा समाजात नक्की बदल होईल असं मला वाटतं- वीणा जामकर

मी आजपर्यंत कधी कोणतेच दिवस साजरे केले नाहीत. पण यावेळी ८ मार्च २०१५ या दिवसाबद्दल मला खूपचं आतुरता आहे.  या दिवशी मी खूप चांगली अॅक्टिविटी करतेयं. पुण्याला आसक्त ही एक संस्था आहे जी प्रायोगिक कार्यक्रम करते त्यांच्यासाठी मी उद्या ‘कुलिन स्रिया रंगभूमी आणि बोलपट’ या पुस्तकाचं वाचन करणार आहे. हे माझ्यासाठी खास आहे कारण या पुस्तकाच्या लेखकाचा मुद्दा होता की कुलिन स्त्रियांनी रंगभूमी आणि बोलपटांमध्ये काम करू नये. त्याच्या विरुद्ध आम्ही वाचन करणार आहोत की कुलिन स्त्रियांनाही रंगभूमीवर काम करण्याचा हक्क आहे. आज आपण २०१५मध्ये आहोत आणि बहुतेक सर्वच क्षेत्रात स्त्री दिसते. पण अशा काही गोष्टी घडतात की अजूनही कुठेतरी आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आहोत अशी जाणीव होते. त्याची खंत कुठेतरी वाटते. – प्रिया बापट</p>

भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी आणि मुलाला कुठेतरी वेगळी वागणूक देण्याचा प्रयत्न नकळत होतो. याच विचारपद्धतीने मीदेखील वाढले आहे. जर एखादी स्त्री गाडी चालवत असेल तर ती चुकीचीच गाडी चालवणार, असा अनुभव मला आला. पण परिस्थिती बदलतेय आणि लोकांची मानसिकताही बदलत चालली आहे.
मला असं वाटतं आपल्याला स्त्री असल्याची जाणीव असायला हवी. केवळ एक दिवस महिला दिन साजरा केल्याने काय फरक पडणार असं मला पूर्वी वाटायचं.  पण आता आयुष्य फार घाईगडबडीचे झाले आहे. त्यामुळे हा एक दिवस तिला अधिक स्पेशल असल्याची जाणीव होते. त्यामुळे हा दिवस असायला हवा. या दिवशी अनेक पुरस्कार दिले जातात, विचारही सांगितले जातात. तर या दिवशी बोलले गेलेले विचार हे केवळ त्या दिवसापुरतेचं न राहता ते अंमलात देखील आणले गेले पाहिजेत. सजकतेने वागण्याची गरज आहे. मी स्वतःदेखील या दिवशी काही विशेष महिलांना भेटते आणि त्यांचे कार्य, विचार याबद्दल जाणून घेते. त्यांच्याकडून शिकते आणि प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करते- शीतल क्षिरसागर

मला असं वाटतं एक स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मविश्वास असण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्यामुळे तुम्हाला कोणीही गृहीत धरु शकणार नाही. त्याचप्रमाणे मला प्रत्येक पुरुषाला सांगाव वाटतं एक स्त्री तुमचं घर सांभाळते, काम करते तर तिला योग्य तो आदर द्या. महिला दिन एक दिवस तिला मानसन्मान द्यायचा न पकडता तो दिवस तिला अजून जास्त आदर देण्याचा, तिला स्पेशल असल्याची जाणीव करून देण्याचा आहे.- क्रांती रेडकर

शब्दांकन- चैताली गुरव, chaitali.gurav@expressindia.com