अमेय वाघ

प्रत्येक कलाकाराचा करिअरचा प्रवास त्याच्यासाठी खास असतो. त्यात असलेले चढ-उतार, यश-अपयश, चांगल्या-वाईट घटना या साऱ्यांनीच कलाकाराचा प्रवास त्याच्यासाठी रोमांचकारीच असतो.

कलाकार त्याच्या करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर आला की तो थोडं मागे वळून त्याच्या तोवर झालेल्या प्रवासाकडे बघतो. त्या प्रवासातील चढ-उतार, अनुभव, आठवणी यात त्याला रमावंसं वाटतं. आज माझंही तसंच झालंय. एका बालनाटय़ शिबिरापासून सुरू झालेला प्रवास आता एका मोठय़ा पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

अनेकांप्रमाणे माझ्या करिअरची सुरुवातही रंगभूमीपासूनच झाली. माझी अनेक भावंडं खेळांमध्ये चांगली प्रगती करत होती. त्यांना त्यात रुची होती. पण माझं मन काही तिथे रमेना. मला कलेशी जवळीक वाटायची. माझी कलेप्रति आवड पाहून माझ्या आईला तिच्या मैत्रिणीने ‘अमेयला बालनाटय़ शिबिराला पाठव’ असं सुचवलं. तेव्हापासून मी पुण्यातल्या बालनाटय़ शिबिराला जायला लागलो. तेव्हा मी साधारण आठ-नऊ वर्षांचा असेन. तिथे मला मजा वाटू लागली. रंगमंचावर उभं राहून अभिनय करण्याचा मी आनंद घेऊ लागलो. हीच एक गोष्ट मला सर्वाधिक आनंद देतेय, याची जाणीव होऊ लागली. दिलीप नाईक यांच्या बालनाटय़ात अनेक र्वष काम केलं. त्यानंतर पुण्यातलं बीएमसीसी या कॉलेजचं नाटय़वर्तुळ खूप चांगलं आहे हे ऐकून होतो. त्यामुळे तिथेच जायचं हे पक्कं केलं.

कॉलेज सुरू झाल्यावर लगेच आम्ही ‘प्ले विदीन अ प्ले’ ही एकांकिका केली. सारंग साठय़े त्या एकांकिकेचा दिग्दर्शक होता. निपुण धर्माधिकारी आणि मी असे आम्ही तिघेही त्या एकांकिकेसाठी काम करायचो. आम्हा तिघांची मैत्री तेव्हापासूनचीच. एकीकडे कॉलेज सुरू असताना नाटकासंदर्भातील विविध उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी व्हायचो. असंच एकदा ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेबद्दल समजलं. मी आणि निपुणने तिथे जायचं ठरवलं. दुबे सरांबद्दल मी खूप ऐकून होतो. दुबे सरांची ती शेवटची अ‍ॅक्टिव्ह कार्यशाळा होती. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या कार्यशाळेत ते फक्त गप्पा मारायचे. त्यानंतर काही वर्षांनी ते गेले. त्या कार्यशाळेत अभिनेता म्हणून मला एक दिशा मिळाली.कलाकाराला ही दिशा मिळणं महत्त्वाचं असतं. या कार्यशाळेनंतर कोणतीही भूमिका, नाटक, मालिका, सिनेमा किंवा करिअर याकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं; हे शिकलो. दहा दिवसांच्या या कार्यशाळेने माझ्या करिअरला विशिष्ट वळण दिलं.

दुबे सरांच्या कार्यशाळेनंतर आम्ही व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेवर आधारित ‘सायकल’ ही एकांकिका केली. या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळालं. या एकांकिकेसाठी निपुण धर्माधिकारीला सवरेत्कृष्ट दिग्दर्शक आणि मला सवरेत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. या काळात मी करत असलेल्या कामात निरागसता होती. कारण मी जे काम करतोय ते चांगलं आहे की वाईट किंवा त्याचं पुढे जाऊन काय होईल, किती जणांना आवडेल असा कसलाच विचार मी त्या वेळी केला नाही. त्यामुळे मी त्या सगळ्यात रमत होतो. ‘सायकल’मधलं माझं काम मोठमोठय़ा कलाकारांपर्यंत पोहोचेल असं वाटलंही नव्हतं. नाना पाटेकर यांना एकदा ‘तुम्हाला तरुण कलाकारांपैकी कोण आवडतं?’ असं विचारलं होतं. तेव्हा त्यांनी निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ अशी नावं घेतली होती. ‘सायकल’ ही एकांकिका पाहिल्याचाही त्यावेळी त्यांनी उल्लेख केला. हा अनुभव नेहमी लक्षात राहील. कॉलेजमध्ये असताना काम करताना एक निरागसता असायची. नाटक खूप गाजेल, विशिष्ट व्यक्ती बघतील असा विचार आम्ही अजिबात केला नव्हता. त्यामागे तशी भावनाच नव्हती. तीच निरागसता नेहमी टिकून राहावी असं वाटायचं. पण ती तशीच राहत नाही. ती प्रत्येक कामागणिक बदलत राहते.

त्यानंतर सतत नाटक करत राहिलो. पुण्यात समन्वय आणि आसक्त या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळी प्रायोगिक नाटकं केली. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये या दोन्ही संस्थांचं मोठं योगदान आहे. मराठी नाटकांकडे बघण्याची योग्य नजर या संस्थांमुळे मला मिळाली. मराठी नाटकं प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचतील, याचे धडे मी तिथे गिरवले. नाटय़ शिबिरं, कार्यशाळा, एकांकिका स्पर्धा, तालीम हे सगळं माझ्यासाठी एका रियाजासारखं होतं. हा रियाज प्रचंड आनंद देणारा होता. या संपूर्ण काळात अभिनय क्षेत्राकडे बघण्याच्या कक्षा रुंदावत होत्या. त्यानंतर मी व्यावसायिक नाटकंही केली. पण माझा चेहरा त्यावेळी फारसा ओळखीचा नसल्यामुळे ते नाटक फारसं चाललं नाही. व्यावसायिक नाटकांना ओळखीचा चेहरा लागतो. आपल्याला व्यावसायिक नाटक कधीच जमणार नाही, असं वाटून मानसिक खच्चीकरणही झालं. म्हणून मी त्यानंतर अनेक र्वष व्यावसायिक नाटकांकडे वळलोच नाही. दरम्यान मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. पण त्यावेळी विचार केला की, आता आपण मुंबईला गेलो आणि पैसे कमवायला लागलो तर आपण तेच करत राहू, मग काहीच शिकता येणार नाही. म्हणून पुण्यात मास्टर्स इन कम्युनिकेशन करायचं ठरवलं. या कोर्सच्या दरम्यान अभ्यासक्रमाचा भाग म्हणून काही शॉर्टफिल्म्स कराव्या लागल्या. कलाकार म्हणून कॅमेऱ्यासमोर उभं असताना वेगळे विचार असतात आणि कॅमेऱ्यापलीकडे उभं असताना वेगळे. त्यावेळी आपल्यासह इतर गोष्टींकडेही लक्ष केंद्रित करावं लागतं. तसं कलाकाराचं नसतं. हे करत असताना मला माझ्याच कामाकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मिळाली.

या सगळ्या टप्प्यांमध्ये मला ‘दळण’ आणि ‘गेली एकवीस र्वष’ या महत्त्वाच्या दोन नाटकांचा भाग होता आलं. दरम्यान आम्ही ‘नाटक कंपनी’ हा ग्रुप काढला. या ग्रुपमधल्या आम्हा सगळ्यांचं वय साधारण १८-१९ असं होतं. मुंबईत ‘थेस्पो’ नावाचा प्रायोगिक नाटकांचा एक फेस्टिव्हल होतो. त्यात देशभरातील विविध नाटकं असतात. ते सादर करणारा तरुण वर्ग पंचविशीच्या आतला असतो. या फेस्टिव्हलमधून काही नाटकांची निवड केली जाते. निवडलेल्या नाटकांचे देशभर प्रयोग होत असतात. या फेस्टिव्हलमध्ये सलग दोन र्वष आमच्या ‘दळण’ आणि ‘गेली एकवीस वर्षे’ या दोन्ही नाटकांची निवड झाली होती. या फेस्टिव्हलमध्ये आम्ही पहिल्यांदाच अमराठी प्रेक्षकांसमोर नाटक सादर केलं होतं. त्यांचा प्रतिसाद बघून आम्ही भारावून गेलो होतो. प्रादेशिक भाषांतल्या कलाकृतींमध्येही तितकीच ताकद असते, ही जाणीव त्यावेळी झाली. अशाच आणखी एका फेस्टिव्हलचे आम्ही साक्षीदार झालो. इटलीमध्येही एक फेस्टिव्हल होतो. तिथे जगभरातल्या नाटकांचे प्रयोग होतात. त्यासाठी पाच-सहा नाटकांची निवड केली जाते. त्यात ‘दळण’ची निवड झाली होती. या फेस्टिव्हलसाठी आशियातून गेलेलं ते पहिलं नाटक होतं. या घटनेने माझा माझ्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या इतर कलाकारांशी ओळख, मैत्री झाली. कळत-नकळत सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. तिथेही आमचं नाटक पहिलं आलं. आपल्या कलाकृतीत लोकांपर्यंत पोहोचायची किती वैश्विक ताकद असू शकते, हे त्यावेळी जाणवलं.

अधेमधे छोटी-मोठी कामं चालूच होती. पण चरितार्थ चालवण्याची कामं वेगळी असतात आणि समाधान मिळवण्यासाठी कामं वेगळी असतात. पैसे कमवण्यासाठी मी जी कामं करत होतो त्यात मला मजा येत नव्हती. ती कामं लोकांपर्यंत फारशी पोहोचतही नव्हती. मोठय़ा कलाकारांसोबत काम करायला मिळायचं याच आनंदात मी असायचो. हे सगळं सुरू असताना एका व्यावसायिक नाटकाच्या निमित्ताने मुंबईत आलो. तिथे भाडय़ाने एक घर घेतलं. ते नाटक फारसं चाललं नाही. ते घर सोडावं लागलं. तिथून छोटय़ा ठिकाणी राहायला गेलो. पुणे-मुंबई येऊन-जाऊन असायचो. कसंबसं भाडं भरायचो. ‘तो कलाकार म्हणून चांगला आहे, पण त्याला फारसं कोणी ओळखत नाही’; हे वाक्य मला या टप्प्यावर अनेकदा ऐकायला मिळे. पण त्यानंतर अचानक ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेसाठी विचारलं. भूमिका आणि एकूणच मालिकेचं स्वरूप विचारात घेता मालिकेत काम करण्यास होकार कळवला आणि मालिकेचा प्रवास सुरू झाला. या मालिकेने मला जे काही दिलंय ते सगळ्यांसमोर आहेच. नाव, ओळख, लोकप्रियता, कौतुकाची थाप, आर्थिक स्थैर्य असं सगळंच! या मालिकेनंतर अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. कामं मिळत गेली. आर्थिक स्थैर्य आलं. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’ हे सिनेमे मिळाले. ‘सायकल’ एकांकिकेपासून माझा प्रवास सुरू झाला. त्यातही एका प्रसंगात मी सायकल घेऊन उभा असायचो. आता ‘फास्टर फेणे’मध्ये बनेश फेणे सगळीकडे सायकलवरूनच फिरतो. फरक फक्त त्या भूमिका आणि त्यांच्या पेहरावात होता. हा सायकल ते सायकल हा प्रवास मी एन्जॉय केला.

‘सायकल’पासून सुरू झालेला प्रवास चढ-उतारांचा होता. काही वेळा कौतुकाची थाप मिळाली तर काही वेळा टीका ऐकावी लागली. कौतुकाने भारावून व्हायचो आणि टीकेने मानसिक खच्चीकरण व्हायचं. पण या दोन्ही गोष्टींचा मला फायदा झालेला आहे. जेव्हा टीकेला सामोरं जायचं असतं त्यावेळी कधी चांगल्या कामाने केलेल्या कौतुकाचा विचार करतो. ‘मी चांगलं काम करू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण होतो. आणखी चांगलं काम करायचं बळ मिळतं आणि नव्या जोमाने कामाला लागतो. या कौतुकाच्या थापेची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मौल्यवान आठवण माझ्या मनात घर करून आहे. ‘सायकल’ या एकांकिकेच्याही आधीचा एक किस्सा मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो. साधारण बारा-तेरा वर्षांपूर्वी ‘नटसम्राट’ या नाटकाची डीव्हीडी आली होती. त्यामध्ये डॉ. श्रीराम लागू यांनीच काम केलं होतं. या डीव्हीडीच्या शूटिंगच्या वेळचा हा किस्सा आहे. बूट पॉलिशवाल्याची भूमिका करणारा मुलगा शूटिंगसाठी येऊ शकला नाही. या नाटकाच्या निर्मात्यांचा मुलगा अनिश जोग हा माझा मित्र. त्याने त्याच्या आईबाबांना माझं नाव सुचवलं. राजा नावाचं बूट पॉलिश करणारं ते पात्र होतं. गणपत बेलवलकर म्हणजे नटसम्राट यांना सांभाळणारा तो मुलगा असतो. त्याच्या भूमिकेसाठी मला बोलावलं. लागू सरांसोबत काम करायचं म्हटल्यावरच मला खूप भीती वाटत होती. लागू सर मला म्हणाले, ‘तू या भूमिकेला फारसा योग्य नाहीस. पण बघू आपण कसं होतंय ते.’ त्यांच्यासोबत तालीम केली आणि शूटिंग पूर्ण झालं. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘तू त्या भूमिकेत मला योग्य वाटला नव्हतास. पण तू खरंच चांगलं काम केलंस.’ डॉ. श्रीराम लागूंकडून हे वाक्य माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान वाक्य आहे.

मला कधीही कोणत्याही गोष्टीने अस्वस्थ वाटलं, मी काही कारणास्तव दु:खात असलो किंवा माझा आत्मविश्वास कमी होतोय असं मला वाटू लागलं की मी माझ्या आयुष्यातले असे सकारात्मक अनुभव आठवतो, ते जगतो, त्यात रमतो. मग तेच मला पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या तयारीने, नव्या ऊर्जेने उभं राहायला, काम करायला बळ देतात.

शब्दांकन : चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com / @amey_ameyjwagh
सौजन्य – लोकप्रभा