हेमांगी कवी

दिवसभर उन्हाची फिकीर न करता लंगडी, खोखो, पकडापकडी, आंधळी कोशिंबीर, लपाछुपी खेळायचो. दुपारच्या जेवणानंतर अंधार पडायच्या आत पुन्हा अधाशासारखं खेळून धुळीने माखलेल्या अंगाने घरी यायचो.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

मुंबईचं रणरणतं ऊन आणि प्रचंड उकाडा सोसत एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात घामाच्या थारोळ्यात वार्षकि परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन झाला की अगदी त्या रात्री लाल रंगाच्या एस्टीतनं जिला ‘रातराणी’ म्हटलं जायचं अशा बसमधून आम्ही गावाला निघायचो. मुंबईच्या दमट हवेत जरा उजळलेली त्वचा गावच्या उन्हात काळी ठिक्कार पडेपर्यंत चांगले दोन-अडीच महिने राहायचो. गावाला राहून थेट जूनच्या १३ तारखेला शाळा पुन्हा सुरू व्हायच्या आदल्या रात्री पावसाळलेल्या थंडगार मुंबईत परत यायचो. साताऱ्यापासून ७० कि.मी. जवळ माण तालुक्यातलं म्हसवड गाव. जरासं दुष्काळी आणि रूक्ष असलं तरी प्रत्येकाला आपआपल्या गावाबद्दल ओलावा आणि गारवा हा असतोच, तसाच मलाही आहे. गावाला मी, माझी आई, मोठा भाऊ आणि मोठी बहीण आधी निघायचो. माझ्या बाबांना नोकरीमुळे आमच्याएवढी मोठी सुट्टी मिळत नसल्यामुळे ते शेवटच्या दहा दिवसांमध्ये मागाहून गावाला यायचे, परीक्षेचा निकाल सोबत घेऊनच.

माझ्या जन्मानंतरची पहिली चार-पाच र्वष सोडली (कारण एवढय़ा लहानपणीचं मला आठवत नाही म्हणून) तर इयत्ता पहिली ते नववीपर्यंत आम्ही गावाला जायचो. तेही वर्षांतून दोनदाच. दरवर्षी न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि कधीकधी प्रसिद्ध अशा सिद्धनाथाच्या यात्रेला. आई-बाबा दोघांचंही गाव एकच असल्यामुळे सगळे नातेवाईक, आप्तेष्ट एकाच गावात. आमच्या परीक्षेच्या दरम्यान माझी आई एकीकडे गावाला जायच्या तयारीला लागलेली असायची. आमच्या कपडय़ांच्या बॅग्स भरणं, गावच्या नातेवाईकांसाठी खास मुंबईच्या कपडय़ांची खरेदी, मुंबई स्पेशल थोडासा खाऊ, सुट्टीत कुणाचं लग्न असेल तर त्यांच्यासाठी भेटवस्तू घेणं असं सगळंच. रात्री आठच्या सुमारास रिक्षेने कळव्याहून ठाण्याला ठाणे-म्हसवड ही बस पकडायला वंदना टॉकीजसमोर असलेल्या बस स्टॅण्डवर पोहोचायचो.
त्या लाल एस्टीचा वास नकोसा वाटायचा. पोटात उगाचच उमळून आल्यासारखं व्हायचं. आम्हाला तिथे सोडायला येणाऱ्या माझ्या बाबांना मी एकदा विचारलंही होतं एवढय़ा घाणेरडय़ा वासाच्या बसला रातराणी का म्हणतात हो? यावर माझे बाबा नुसतेच हसले होते. या वासाच्या अडचणीवर उपाय म्हणून बाबा आम्हाला केशरी रंगाच्या लिमलेटच्या गोळ्यांचा पुडा आणून द्यायचे, एकच. तो आम्ही सगळ्यांनी वाटून खायचा. त्यावेळी एवढय़ा लांबच्या प्रवासासाठी सवसामान्यांना परवडणारी बस आणि ट्रेन या दोनच सोयी असायच्या. म्हसवडपर्यंत थेट ट्रेन नसल्यामुळे आम्ही बसनेच प्रवास करायचो. प्रवासात खायला म्हणून आई चपात्यांसोबत खास खमंग भजी तर कधी कधी अंडय़ाची भुर्जी (दरवर्षीचा ठरलेला बेत) एका डब्यात बांधून घ्यायची. माझ्या आईच्या हातची भजी माझ्या आजीला, चुलत काकांना, भावंडांना खूप आवडायची म्हणून त्यांच्यासाठी आई वेगळा डबा घ्यायची, ज्याला आम्ही हातही लावायचा नाही असा कडक नियम असायचा. अकराच्या आसपास आई चपात्यांमधे भजी किंवा भुर्जी गुंडाळून रोल करून आम्हाला खायला द्यायची. घरूनच भरून आणलेल्या बॉटलीमधलं पाणी प्यायचो आणि लिमलेटच्या गोळ्या चघळत झोपी जायचो.

मधेच जाग यायची तेव्हा रातराणी हमखास घाटात कुठेतरी थांबलेली असायची. तेव्हा आताचा द्रुतगती मार्ग नसल्यामुळे जुन्या मार्गाने सिंगल रोडच्या अरुंद रस्त्यावरून जावं लागायचं. ट्रॅफिक सुटून रातराणी पूर्वगतीने सुसाट धावायला लागेपर्यंत आम्हाला परत झोप लागायची. तेव्हा गावाला पोहोचायला नऊदहा तास लागायचे. गाव काही कि.मी. अंतरावर आलं की आई आम्हाला झोपेतून उठवायची. मग रिकाम्या झालेल्या एखाद्या सीटच्या खिडकीत बसून बाहेर पहाटेच्या अंधुक प्रकाशात मागे भरधाव वेगाने पळत जाणाऱ्या झाडांकडे, इवल्या घरांकडे, मधेच लागणाऱ्या छोटय़ा छोटय़ा पुलांकडे, मलदगडांवरच्या कमी कमी होत जाणाऱ्या आकडय़ांकडे, उन्हाळ्यात सुकलेल्या माणगंगेच्या नदीकडे डोळे चोळत चोळत कुतूहलाने बघत बसायचं. पहाटेचा गार वारा चेहऱ्यावर घेत ‘मम्मी अजून किती लांब, अजून किती वेळ’ असं सतत तिला विचारत गावात आमचा प्रवेश व्हायचा आणि गावच्या बस स्टॅण्डवर ‘ढुस्स्स’ असा आवाज करत श्वास सोडत अखेर रातराणी थांबायची. महिना-दीड महिना अगोदरच पत्राद्वारे किंवा सांगाव्याद्वारे आम्ही गावाला अमुक अमुक दिवसाच्या पहाटे प्रकट होणार हे गावच्या लोकांना आधीच कळलेलं असायचं. असं जरी असलं तरी तेव्हा मोबाइल, टेलिफोन अशी इन्स्टंट बोलण्याची साधनं नसूनसुद्धा माझा काका किंवा मामा पहाटे अचूक त्या वेळेला बस स्टॅण्डवर आमची वाट बघत प्रसन्न चेहऱ्याने आम्हाला घ्यायला आलेला असायचा. बसमधून खाली उतरल्या उतरल्या गावच्या मातीचा सुगंध यायचा. शुद्ध ऑक्सिजनने भरलेली हवा अंगात शिरताच प्रवासाचा सगळा शीण निघून जायचा.

स्टॅण्डपासून बाबांचं घर अगदी एक कि.मी.वर आहे. घरातली सर्वात मोठी सून म्हणून माझी आई माहेरी न जाता आधी सासरी जायला हवं असा अलिखित नियम पाळत, खांद्यावर पदर घेत पुढे चालायची आणि आम्ही तिच्यामागे सोबत आणलेल्या बॅग्स जमेल तसं खांद्याला लावून चालतच घराच्या दिशेने निघायचो. गावात तोपर्यंत जाग आलेली असायची, कुणी अंगण झाडत, कुणी पाणी शिंपडत, एखादा म्हातारा दगडावर तंबाखूची म्हशेरी लावत तर कुणी गुरांना खुंटीपासून सोडवून शेतात नेताना दिसायचं. गावात सगळे एकमेकांना ओळखत असल्यामुळे वाटेत जाताना बरेचजण माझ्या आईला, आम्हाला आपुलकीने विचारायचे ‘काय गं, आलीस वाटतं?’, ‘बरी हायेस नव्हं’, ‘काय रं पोरांनो आता रहावा मस्त दोन म्हयनं’. मुंबईच्या भाषेची, लहेजाची सवय असल्यामुळे गावची ही भाषा, हा सातारी टोन ऐकला की आम्हाला खूप गंमत वाटायची आणि तेव्हा थोडं हसूही यायचं. सगळ्यांना उत्तरं देत देत आम्ही घरी पोहोचायचो. घरातले आजीआबा, काकाकाकू, सगळी भावंडं ‘मुंबईची मंडळी’ येणार म्हणून आमच्या स्वागतासाठी सज्ज असायची. चुलीवर तापवलेल्या कडक पाण्याने आम्ही अगदी मोठं होईपर्यंत तीन दगडांवर बसून अंघोळ करायचो. मग दगडमातीने बांधलेल्या मोरीत करायला लागलो. चुलीवरचा चहा, नाश्ता खाऊन, मुंबईहून आणलेला खाऊ, कपडे सगळ्यांमध्ये वाटून आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात व्हायची.

दिवसभर उन्हाची फिकीर न करता लंगडी, खोखो, पकडापकडी, आंधळी कोिशबीर, लपाछुपी खेळायचो. दुपारच्या जेवणानंतर अंधार पडायच्या आत पुन्हा अधाशासारखं खेळून धुळीने माखलेल्या अंगाने घरी यायचो. चिडलेल्या मम्मीच्या डोळ्यांना घाबरत, आजीच्या नऊवारीच्या पदराचा आडोसा घेत सुटका करून घ्यायचो आणि शुचिर्भूत होऊन आठ वाजताच जेवून अंगणात अंथरूण घालून वर चांदण्यांनी गच्च भरलेल्या आकाशाकडे बघत, मंद गार वारा अंगावर घेत गाढ झोपी जायचो. काही दिवस बाबांच्या घरी मुक्काम ठोकून मग आईच्या माहेरी आमची स्वारी निघायची. ते घर मला जास्त आवडायचं. माणगंगा नदीला लागूनच एका छोटय़ाशा टेकडीवजा उंच जागेवर असलेलं काडाच्या छप्पराची मातीने लेपलेल्या कच्च्या भिंतींची साताठ घरांची वस्ती. पावसाळ्यापासून ते डिसेंबर महिन्यात गावच्या यात्रेपर्यंत तुडुंब भरून वाहणारं माणगंगेचं हे विशाल पात्र उन्हाळ्यात पूर्णपणे सुकून जायचं. त्या सुकलेल्या नदीवरून चालत असताना माझ्या आजी, आबांना एवढय़ा लांबून कशी कुणास ठाऊक आमची चाहूल लागायची. ते आमच्या दिशेने हात हलवत उभे असायचे. घराच्या थोडय़ा अंतरावर एक विहीर होती, अजूनही आहे, त्या विहिरीवर आम्ही पाणी भरायला, कपडे धुवायला जायचो, घराच्या मागच्या बाजूला शेत, िलबाची, जांभळाची मोठी झाडं आणि आंब्याच्या, पेरूच्या, डािळबाच्या घनदाट बागा असायच्या. दगडाने नेम धरून किंवा झाडावर प्रत्यक्ष चढून फळ तोडून तिथल्याच एका फांदीवर बसून, सावलीत बसून फळं खायचो. दुपारच्या वेळेला या झाडांना झोपाळा बांधून मोठ मोठे झोके घ्यायचो, काकडी, कांदा, पालेभाज्यांच्या शेतात बसूनच चुलीवरची भाकरी, ठेचा, त्याच शेतातली ताजी काकडी, रताळी, कांदा हाताने फोडून खायचो. संध्याकाळी आजी घरातल्याच शेळीच्या दुधाचा चहा प्यायला द्यायची आणि अंगणात भोपळाखेच, कानगोष्टी, मामाचं पत्र हरवलं, बठी खेळ खेळत मग जेवून समोरच्या झाडांच्या सावल्यांचा खेळ बघत आणि रेडिओ ऐकत ऐकत झोपी जायचो. सकाळ व्हायची ती मंजुळ पक्ष्यांच्या, कोंबडय़ाच्या नॅचरल अलार्म क्लॉकने.

दहावीनंतर ‘आता खरं आयुष्य सुरू झालं’ म्हणवणाऱ्या आणि कधीच न संपणाऱ्या रुटीनला सुरुवात झाली आणि हळूहळू माझं गावाला जाणं कमी होत गेलं. मधल्या काळात नवीन आयुष्याच्या नवलाईने भारावून जाऊन गावाला जाणं टाळलं, पण मग बारातेरा वर्षांपासून आईबाबा मुंबईला रामराम ठोकून कायमचे गावाला स्थायिक झाल्यावर पुन्हा येणं- जाणं सुरू झालं. काळाप्रमाणे आता माझं हे गाव बरंच बदललंय, घरं, माणसं बदललीयेत, वातावरणात बदल होतोय. पण कितीही बदललं तरी मला पुन्हा माझ्या गावाला जाऊन आधीसारखी उन्हाळ्याची सुट्टी घालवायची कमालीची ओढ वाटू लागलीये याचा जास्त आनंद होतोय.

हेमांगी कवी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा