टी.व्ही. मालिका या विषयावर मी आधीही लिहिलं आहे. इतरही अनेक लोकांनी त्याबद्दल लिहिलं आहे. हे शेवटचं लिहितोय असं वाटत नाही. कारण ज्या संथ गतीने गोष्टी बदलतायेत, त्यामुळे अजून पाच ते १० वर्षांत अजून कुठे लिहायची वेळ आलीच, तरी या विषयावर लिहीन यात शंका नाही!

हा विषय निघाला की दोन पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया येतात. एक तर फार चिडचिड करून दाखवतात किंवा त्यावर हसतात. अर्थात प्रत्येक वेळी कुठली न् कुठली मालिका अपवाद असते या सगळ्याला. पण अपवाद म्हणून काहीतरी चांगलं असणं, यासारखं दुर्दैव नाही. एकीकडे नेटफ्लिक्सवर अंदाजे दर दोन आठवडय़ाने काहीतरी उत्तम दर्जाचं काम येतं. ते इतकं अति झालंय की परवा हा प्रश्न पडला की आपलं आयुष्यात नेमकं काम काय आहे? स्वत:चं काहीतरी बनवणं की दुसऱ्याचं नुसतं बघत राहणं? इतकं जास्त आणि चांगल्या प्रतीचं काम तिकडे बघायला मिळतं. मग आपण कुठे मागे पडतोय, हा प्रश्न पडतो. आणि आपली ही जी अवस्था आहे, तिला खरंच मागे पडणं म्हणायचं का? कारण लोक तर बघताहेत. आणि एकामागून एक नवीन कार्यक्रम, वाहिन्या आपल्याकडे पण येतायेत. याची उत्तरं शोधण्यासाठी या सगळ्याचा शांतपणे विचार करू लागलो. लोकांशी बोलू लागलो.

या क्षेत्रातच काम करत असल्यामुळे, टीव्हीसाठी वेगवेगळं काम करणाऱ्या अनेक लोकांशी ओळख आहे. खासकरून कलाकारांशी. मराठी भाषेत पूर्णवेळ अभिनय करून लोकप्रिय व्हायचं असेल तर मालिकांसारखं माध्यम नाही, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. एखाद्-दुसरा अपवाद वगळता अनेक लोकप्रिय कलाकार या माध्यमामुळेच झाले आहेत. त्यांच्यामुळे इतर माध्यमातील कलाकृतींना पण फायदा होतो हे मी स्वत: अनुभवतोय. ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. अर्थात जी कलाकृती तुम्ही करताय त्यामध्ये पण स्वत:चा काहीतरी दम असणं गरजेचं आहे. नुसतंच कलाकारांच्या लोकप्रियतेवर चालत नाहीत गोष्टी. पण त्याचा फायदा होतो, हे नक्की! पण काम करणाऱ्या कलाकारांशी, लेखक-दिग्दर्शकांशी संवाद साधला असता असं लक्षात येतं की मालिकांमध्ये काम करणं त्यांना फारच आनंद देऊन जातं, असं मुळीच नाहीये. अर्थात पसा मिळतो, रातोरात लोकप्रियता मिळते हे फायदे आहेत. पण या भोवतालच्या गोष्टी झाल्या. मुळात कामाचा आनंद मिळतो का असं विचारलं तर बऱ्याचदा त्याचं उत्तर नकारार्थी येतं. मग ‘मीटर पडतं’ किंवा ‘दुकान लागतं’ असली काहीतरी संबोधनं देऊन विषय संपतो. आणि ते एक वेळ मी समजू शकतो. त्यांनी ही झेप घेतली आहे आणि यामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं. आणि रोजच्या जगण्यापुरता तरी पसा कमावलाच पाहिजे. ते म्हणतात की ते आनंदाने वेगळ्या गोष्टी करतील, पण जर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांना तेच करायचं असेल तर ते तरी काय करणार?

म्हणून माझ्या लेखक-दिग्दर्शक-निर्माता मित्रांशी बोललो. ते म्हणाले की त्यांनाही आवडेल काहीतरी वेगळं करायला किंवा वेगळ्या पद्धतीने काम करायला. पण शेवटी चॅनेल जे म्हणेल ते करावंच लागतं. चॅनेलच्या लोकांना नाही आवडलं तर सरळ पुन्हा सगळं शूटिंग करावं लागतं!

म्हणून चॅनेलमध्ये काम करणाऱ्या मत्रिणीकडे गेलो आणि तिला विचारलं. तर ती म्हणाली की जे लोकांना बघायला आवडतं ते त्यांना दाखवावं लागतं. लोकांना काय आवडतं आणि काय नाही हे तुम्हाला कसं कळतं, असं विचारल्यावर म्हणाली की प्रत्येक मालिकेची रेटिंग निघतात (ळफढ) आणि त्यानुसार कळतं की किती लोक ते बघतात. त्यानुसार जाहिरातीचे दर ठरतात. अर्थकारण आलंच. आणि त्यातही वावगं नाही. यामुळेच तर सगळ्यांना पसे देता येतात आणि इतकी घरं चालतात. म्हणजे शेवटी अर्थकारणाचा एक मूलभूत सिद्धांत आहे की जितकी मागणी आहे तितका पुरवठा असला पाहिजे तो इकडे लागू पडतो. लोकांची जी मागणी आहे ती ही चॅनेल्स पुरवत आहेत.

म्हणून मग लोकांकडे वळलो. लोक म्हणजे घरची मंडळी. अनायासे तेव्हा टीव्ही सुरू होताच. त्यावर एका मालिकेमधला प्रसंग चालला होता. उच्चशिक्षित, चांगला पगार असलेल्या नायिकेला आत्ताच कळलं आहे की तिच्या सासूने तिच्या मुलासाठी, म्हणजेच नायिकेच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आणखी एक मुलगी पाहून ठेवली आहे! तेही या दोघांचं लग्न झालेलं असताना! त्या नायिकेचे माहेरचे तिकडे पोचतात, तिचा नवरा तिकडे येतो. सासू तरीही तिचीच बाजू कशी बरोबर याचा खुलासा करते. तो कोणालाही पटत नाही. वर ती तिकडे उपस्थित सगळ्यांचा अपमान करते. हा प्रसंग इतपत ठीक आहे. मी पण चवीने पाहिला. कारण मला वाटलं की आता संपली मालिका! यापुढे सगळे त्या कजाग सासूला वाळीत टाकणार आणि आनंदात राहणार. पण कसलं काय! याउलट ती सून एक ‘चॅलेंज’ घेते की ती अजून चांगली सून व्हायचा प्रयत्न करेल. याबद्दल मी घरी काही बोलणार तेवढय़ात पुढची मालिका लागली. त्यामुळे शांत बसावं लागलं. ही मालिका तर निराळीच. यातली नायिका उच्चशिक्षित वगरे नाहीये पण जगन्माता आहे. यामध्ये तिचा नवरा हा लग्न होईपर्यंत अत्यंत चांगला असतो आणि होणारी सासू वाईट. लग्नानंतर तो विकृतीच्या नव्या पातळ्या गाठतोय आणि सासू फारच चांगली झालीये. नाही, मला याचाही फार त्रास नाहीये. खऱ्या आयुष्यात होतातच की अशा घटना. कोणीतरी वरवरचं चांगलं वागत असतं आणि लग्नानंतर खरं स्वरूप कळतं. मान्य आहे! पण आपण जेव्हा खऱ्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला एकाच माणसाचा दृष्टिकोन माहिती असतो. आपल्या स्वत:चा! मालिकेत तसं होत नाही. अनेक प्रसंगांत तो होणारा नवरा एकटा विचार करताना वगरे दखावला आहे. तेव्हा कधीही विकृतीची झाकही दिसली नाही. ती सासू वाईट म्हणजे वाईटच दाखवली आहे. मग सोयीनुसार व्यक्तिमत्त्व कसं काय बदललं? सोयीनुसार अशा अनेक गोष्टी बदलल्या जातात. पात्र, घटना, काळ, कलाकार – तुम्ही जे म्हणाल ते. आणि स्मृतिभ्रंश वगरे पण उठसूट होतात. विचारलं मग मी घरी, माझ्या मित्र-मत्रिणींना की का तुम्ही हे सगळं बघता? शिव्या देत देत बघता, पण बघताच! तुम्ही बघता म्हणून ते दाखवतात! त्यावर वेगवेगळी कारणं मिळतात. इतकं सीरियसली नाही बघत, येता जाता, स्वयंपाक करता करता जे दिसतं किंवा कानावर पडतं ते बघतो. हे खरं आहे म्हणा. आपल्याकडे बऱ्याचदा असंच बघितलं जातं सगळं. कल्लोळ असतो आजूबाजूला आणि आपण बघतो. यामुळेच नाटक आणि सिनेमा बघताना फोनवर बोलणं, मुलांनी आवाज करणं हे चालवलं जात असेल का? माहीत नाही, पण शक्य आहे. मग म्हटलं जातं की आधीच इतका त्रास आहे आयुष्यात त्यात काहीतरी बघायचं म्हणजे ते सगळं विसरायला मदत होते. हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्याकडे मूलभूत गोष्टी कमवायला इतकी स्पर्धा आहे. त्यात वाहतुकीचा ताण. म्हणजे नुसतं रोजचं जगायला झगडावं लागतं अनेकांना. तर या मालिकांनी थोडं विसरायला होत असेल का? पण मग त्याचा दर्जा इतका खालचा असण्याची काही गरज नाही. चांगल्या कलाकृती पण उत्तम मनोरंजन करतात. त्यामुळे हा मुद्दा मी खोडून टाकला आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांचा समान मुद्दा हा होता की दुसरं काही नसतं बघायला!

म्हणजे दुसरं काही बघायला नसतं म्हणून बघितलं जातं आणि बघितलं जातंय म्हणून दुसरं कोणी काही बनवायला घेत नाही! या अशा दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत का? मग यावर उपाय काय? एका बाजूने उपाय करून काहीच होणार नाहीये. दोघांनीही – कर्त्यांनी आणि प्रेक्षकांनी पावलं टाकली पाहिजेत. परिस्थिती बदलायलाच हवी. कारण हे एक अत्यंत ताकदवान माध्यम आहे. यांनी समाज, त्याची विचारधारणा बदलू शकते, घडू शकते. त्याची जाणीव फक्त कोणाला नाही याचं वाईट वाटतं.

निपुण धर्माधिकारी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा