01-lp-ent‘थ्री इडियट्स’ची ऑडिशन सुरू असताना मी तिथेही कॅमेरा असिस्टंट होतो. त्या ठिकाणी मला खूप शिकायला मिळालं. कलाकारांना क्यू कसे द्यायचे, कॅमेरा कसा हाताळायला पाहिजे, कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांविषयी कसं सविस्तर सांगायला पाहिजे या आणि अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या दिग्दर्शकाला कलाकारांकडून नक्की काय हवंय हे समजून घेऊन त्याप्रमाणे ऑडिशन्स घेणं गरजेचं असतं हे एक तंत्र नव्याने शिकलो.

विधू विनोद चोप्रा सरांची एक फारच वेगळी पद्धत आहे. कुठलीही फिल्म सुरू होण्याआधी टीम तयार होण्यासाठी ते एखाद्या जाहिरातीचं दिग्दर्शन करतात. त्याचप्रमाणे त्यांनी ‘थ्री इडियट्स’ या सिनेमाच्या वेळीसुद्धा त्यांनी एका जाहिरातीचं काम सुरू केलं. या जाहिरातीचे कािस्टग सुरू झालं. मी त्याच प्रोजेक्टमध्ये दिग्दर्शन या विभागातही काम करत होतो. ऑफिसमध्ये जाहिरातीत असणाऱ्या पात्रांची चर्चा सुरू होती. ही सगळी चर्चा माझ्या कानावर पडत होती. दुसऱ्या दिवशी मी शूटिंगसाठी ठाण्याला निघालो. त्या वेळी ठाण्याला कसं जायचं हेसुद्धा मला माहीत नव्हतं. ट्रेनमध्ये असताना मला एक वयस्क गृहस्थ दिसले ते दिसताच क्षणी मला आदल्या दिवशी ऑफिसमधलं पात्रांविषयीचं संभाषण आठवलं. त्यांना जसा हवा होता तसा चेहरा होता तो. मला ते आजोबा खूप आवडले. मी त्यांना विचारून त्यांचे काही फोटो काढले. आणि त्यांना त्यांचा नंबर विचारला. माझी काहीच ओळख नसल्यामुळे त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला नाही. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला फोन करा मी तुम्हाला तुमचे फोटो देतो.

मी ऑफिसमध्ये येऊन राजेश दादाला तो फोटो दाखवून हिंमत करूनच विचारलं, ‘दादा तू जो म्हातारा माणूस शोधताय तो साधारण असा हवाय का रे?’ राजेश दादाला तो माणूस खूप आवडला. त्याने लगेच राजकुमार हिरानी सरांना तो फोटो दाखवला. राजू सर म्हणाले, ‘मुझे ऐसाही नही; यही चाहिऐ’. असं म्हटल्यावर मला काही कळलंच नाही की मी या माणसाला आता कुठे शोधू? माझ्याकडे त्यांचा नंबरही नव्हता. नावसुद्धा माहीत नव्हतं. माझ्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. मी सलग दोन दिवस त्या आजोबांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला ते काही सापडले नाही. मला वाटलं, झालं संपलं आपलं करिअर. मी गुपचूप आपलं सामान बांधलं आणि श्रीवर्धनला परत निघून आलो. दोन दिवसांनी माझा फोन वाजला. तो फोन त्या आजोबांचा होता. मी खूप खूश झालो. मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही आज ऑफिसला या. मी तुम्हाला तुमचे फोटो देतो’. ते हो म्हणाले. मी लगेचच मुंबईची गाडी पकडली आणि मुंबईला आलो. आणि त्या आजोबांची ऑडिशन घेतली. आजोबांची ऑडिशन राजू सरांना दाखवली आणि त्यांना कास्ट केलं गेलं. माझ्या आयुष्यातलं आणि माझ्या करिअरमधलं ते पहिलं कास्टिंग होतं. ते कािस्टग बघून राजू सरांनी ‘थ्री इडियट्स’ कास्टिंगमध्ये पूर्णपणे सहभागी करून घेतलं. तेव्हापासून मला खरं समजलं की, कास्टिंग करताना दिग्दर्शकाच्या व्यक्तिरेखांबद्दलच्या सूचना किती महत्त्वाच्या असतात.

कलाकारांबरोबर कसं बोलावं, त्यांना दिग्दर्शकाच्या सूचना कशा द्यायच्या, हे मला कळायला लागलं. या सगळ्या प्रक्रियेत मला खूप मजा यायला लागली. कािस्टग करता करता मला खूप लोक समजायला लागले. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्याने व्यक्तिरेखेप्रमाणे त्या लुकला साजेशी व्यक्ती दिसली की ती व्यक्ती कलाकार असो वा नसो त्या व्यक्तीला तुम्ही कलाकार म्हणून त्या व्यक्तिरेखेसाठी तयार करू शकता; हे मला कळलं. अशाच पद्धतीने मी लोक शोधत गेलो. मला खूप गमतीदार पात्रांना भेटता आलं. ‘थ्री इडियट्स’मध्ये शेवटी दोन मुलं चतुरला शॉक देतात असा एक प्रसंग आहे. हा प्रसंग लडाखमध्ये चित्रित झाला. त्या दोन मुलांचं कास्टिंग करणं म्हणजे कठीण काम होतं. एक तर लडाखमध्ये िहदी बोलणारी मुलं फार कमी होती. ज्यांना हिंदी बोलता येत होतं ते दिसायला त्या व्यक्तिरेखांसारखे नव्हते. त्या दोन मुलांना शोधण्यासाठी आम्हाला जवळपास १५०० मुलांची ऑडिशन करावी लागली. अखेर ती दोन मुलं मिळाली.

‘थ्री इडियट्स’चं कास्टिंग करणं हे खूप मोठं आव्हान होतं. या सिनेमात व्यक्तिरेखांची संख्या जास्त होती. या सिनेमातल्या सगळ्या व्यक्तिरेखा वास्तववादी होत्या. राजू सरांची एक पद्धत आहे. ते कधीच स्क्रिप्ट पूर्ण सांगत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतंकी, व्यक्तिरेखेच्या वर्णनावरून तुम्ही लोकांना शोधा, कलाकारांना शोधा. सिनेमाची स्क्रिप्ट माहीत नसताना फक्त व्यक्तिरेखांच्या वर्णनावरून कािस्टग करणं किती कठीण असतं, हे प्रत्यक्ष कास्िंटग करताना लक्षात येतं. मला नेहमीच चांगली माणसं भेटत गेली. प्रत्येक व्यक्तिरेखेचं वर्णन उत्तमरीत्या मला समजत गेलं. याचा परिणाम ‘थ्री इडियट्स’च्या कास्िंटगमधून दिसतोच आहे. खरं तर या सिनेमाचं कास्िंटग पूर्ण झाल्यानंतर माझं काम संपलं होतं. कारण त्यानंतर सिनेमाचं शूटिंग सुरू होणार होतं. तिथे माझं काहीच काम नव्हतं. पण, मी तोवर जितकं काम केलं आहे ते बघून मला त्या सिनेमाच्या दिग्दर्शन विभाग सहभागी करून घेतलं. कास्िंटग अ‍ॅण्ड डिरेक्टिंग असा दुहेरी अनुभव मिळला तेव्हा!

सौजन्य – लोकप्रभा