30 May 2020

News Flash

आयला..सचिन!!!

अचानक आगीचा बंब वाजावा तसा माझ्या खोलीमधला फोन, खणाणला.

Rio Olympics 2016 : सदिच्छादूतपदासाठी आता भारतीय ऑलिम्पिक समितीने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला गळ घातली आहे.

कार्यक्रमावरून हॉटेलच्या रूमवर येऊन जेवण उरकून झोपे – झोपेपर्यंत उशीरच झाला जरा. बरं! होक्टिक शेडय़ुल्समुळे साठलेली झोप इतकी असते, की त्या पेंडिंग झोपेने सूड उगवायचं ठरवलाच एखाद दिवशी तर पुढच्या अख्ख्या दिवसाच्या वेळापत्रकावर पाणी, पण आजच्या रात्री तसं होऊन अजिबात चालणारं नव्हतं. कारण दुसऱ्या दिवशी पहाटेची फ्लाइट पकडून मुंबई गाठून एअरपोर्टवरूनच थेट शूटिंगला हजेरी लावायची होती. या उद्याच्या विचारांनी थकवा जास्तच जाणवायला लागला. नाही! मोबाइलवर पहाटे साडेचार वाजताचा अलार्म सेट केला होता मी; पण ‘गाढ’ झोपेच्या भीतीने पाठ टेकल्यावरही या कुशीवरून त्या कुशीवर करत करत कधीतरी खूप उशिरा निद्रेच्या स्वाधीन केलं स्वत:ला.

अचानक आगीचा बंब वाजावा तसा माझ्या खोलीमधला फोन, खणाणला. त्या फोनचा कर्णकर्कश आवाज बंद करण्यासाठी आधी मी लगबगीने तो उचलला आणि मग ‘आता डोळा लागला होता. फोन करून झोपमोड का केली’ असं म्हणून पलीकडच्या माणसावर आवाज चढवणार तोच ‘गाडी आलीए तुम्हाला न्यायला’चा निरोप मिळाला. मनात ‘रात्र संपलीसुद्धा!!’  असा विचार आला आणि मी खडबडून जागी झाले. संपलं.. तडक फोन पाहिला मी, तर त्याने इमानेइतबारे त्याचं अलार्म वाजवण्याचं काम केलं होतंच. मीच ‘स्नूझ’ करत करत झोपून राहिले होते. असो, ‘अशी कशी जाग आली नाही?’ हा प्रश्न स्वत:ला विचारण्याएवढा वेळच नव्हता.  सुरुवातच विचित्र झाली होती दिवसाची. मग आता काय, घाईच्या वेळची ‘टू डू’ लिस्ट केली त्यामुळे अर्थात आंघोळीची गोळी घेतली आणि भराभरा आवरून १५ मिनिटांत खाली कारमध्ये येऊन बसले. खूप उशीर झाला होता. मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मवरची धावती ट्रेन जशी पकडतात ना मुंबईकर तशी बहुधा उडत्या विमानात झेप घेण्याची वेळ येणार होती माझ्यावर. बोर्डिग पास मिळेल ना? नाही मिळाला तर? लगेचच दुसरं फ्लाइट असेल का? मुंबईत वेळेवर पोहोचलेच नाही तर? अशा असंख्य विचारांनी एअरपोर्टपर्यंतच्या त्या प्रवासात तेहतीसच्या तेहतीस कोटी देवांना सकाळी सकाळी जागं केलं होतं मी. एअरपोर्ट दिसायला लागला तशी धडधडच वाढली माझी. एका पॉइंटला येऊन कार थांबली. आता सामान घेऊन तडक धावत सुटायचं अशा विचाराने उतरले तोच एक फॅमिली समोर आली. ‘माझ्या मुलीला तुम्ही खूप आवडता, एक फोटो घे..ऊ..’ त्यांचे पुढचे शब्द हवेतच विरले आणि मी धावत धावत थेट बोर्डिग काऊंटरवर मुंबई फ्लाइट असं धापा टाकत उच्चारलं तिथल्या मुलीनं एक क्षण रोखून पाहिलं आणि मग गोड हसून वेलकम म्हटलं. अय्यो! माझ्या जिवात जीव आला. बोर्डिग क्लोज् व्हायला तब्बल सात मिनिटं बाकी होती. फारसं सामान नव्हतं. त्यामुळे मुंबईत उतरल्यावरची धावाधाव कमी करण्यासाठी सामान स्वत:जवळच ठेवण्याचा निर्णय घेतला मी. (हो! कारण एखाद्या स्थळावरून विमानाने मुंबई गाठायला जेवढा वेळ लागतो, त्याच्या दुपटीने वेळ आजकाल लगेज् पट्टय़ावर आपलं सामान पोहोचायला लागतो.)

बोर्डिग पास हातात मिळाल्यामुळे जरा रिलॅक्स झाले होते मी. पुढे सेक्युरिटी चेकच्या दिशेने निघाले, मला उशीर झाल्यामुळे असेल, लोकांची गर्दी सरली होती. मी स्कॅनिंगसाठी बॅगस् ठेवल्या आणि बाजूच्या केबिनमधून स्वत:ला चेक करून घेऊन बोर्डिग पासवर स्टँप मारून घेतला. बाहेर पडले तर स्कॅनिंग मशीनसमोर जरा चुळबूळ झाली. मी आठवायला लागले. विमानात आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे मेकअप वॅनिटीमधलं सामान असावं बहुधा, नेलकटर, नेलफायलर, छोटीशी एखादी कात्री माझ्या बॅगेत त्यांना दिसली असावी. अपेक्षेप्रमाणे बॅगऐवजी सेक्युरिटीवालाच माझ्या जवळ आला आणि तो माझ्याशी बोलणार तोच..

‘आयला..सचिन!’ एवढंच एअरपोर्टवर ऐकू येऊ लागलं, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. (कला क्षेत्रात आल्यावर, काम करायला सुरुवात झाल्यावर, मी असं म्हणत आले होते, की या जन्मात कलेशी निगडित लताबाई, ए. आर. रेहमान अणि सचिन तेंडुलकर यांना एकदा डोळेभरून पाहण्याची संधी जर देवाने मला दिली तर त्यांच्यासमोर मी आधी ढसाढसा रडायलाच लागेन, पण खरंच असं होईल का? हे या आताच्या क्षणापर्यंत माहीत नव्हतं) आज प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरला ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलं आणि त्याच्याबद्दलच्या अपार आदरातून खरोखरीच डोळे पाणावले माझे. त्याचं तेज, त्याचं वलय माझ्या धुसर झालेल्या दृष्टीतूनही स्पष्ट दिसत होतं. ही माणसं नाहीतच, दैवताच्या जवळपासची देवानेच साकारलेली उत्कृष्ट अशी कलाकृती आहेत. हृदयाचा ठोका चुकणं ही गोष्ट खात्रीनं अनुभवली मी त्या क्षणी. त्याच्या नुसत्या दिसण्यातही कमालीचं समाधान होतं, तो चालत होता आणि मला सिनेमात दाखवतात तसं बाकी सगळं ब्लर, फक्त त्याच्यावर फोकस आणि स्लो मोशनमध्ये चालणारा तो, असं दृश्य दिसत होतं बरं! ही घटना १६ नोव्हेंबर २०१३ नंतरची, म्हणजेच सचिन शेवटची मॅच खेळून रिटायर झाल्यानंतरची. त्यामुळे अवघा देश ‘सचिन आता खेळणार नाही!’ या दु:खातून सावरला नव्हता.

हर कहानी में एक विलन होता है! अगदी तसंच, त्या क्षणी ‘एक्सक्यूझ मी!’ असं म्हणत, त्या सचिनकडे पाठमोऱ्या असलेल्या सिक्युरिटीवाल्याने माझी तंद्री मोडण्याचा प्रयत्न केला. मी पण कुठली सचिनची झलक पाहण्याची संधी गमावणार? सचिनवर स्थिरावलेल्या नजरेतूनच त्या सिक्युरिटीवाल्याला म्हणाले. ‘नंतर जेलमध्ये टाक मला, आधी मागे वळून बघ’ त्या क्षणाला आपण काय बोलून गेलो याचंही भान नव्हतं मला. पण तोसुद्धा सचिनला बघून ‘फ्रिझ’ झालाच. खरं तर त्या क्षणी अख्खा एअरपोर्टच् स्तब्ध झाला असावा, आणि एकटा सचिनच पटापट पावलं टाकत जात होता. त्याच्या वेगात तो ‘व्हिआयपी’ गेटमधून दिसेनासाही झाला.

मगाशी फ्लाइट चुकेल का या भीतीने धडधडणाऱ्या माझ्या हृदयाचे ठोके आता त्या वेळेपेक्षा स्पष्ट ऐकू येत होते. त्याच आवाजानं मी भानावर आले तेव्हा तोंडाचा ‘आ’ वासला होता. अचानक माझ्या लक्षात आलं. ‘नंतर जेलमध्ये टाका मला!’ या बालिश वाक्यानं आता त्याच नजरा आपल्यावर खिळल्यात. जरा ओशाळलेच मी, पण आपण ओशाळलोय हे समोरच्याला कशाला दाखवा? लगेच त्यांना म्हटलं, ‘‘सचिन आपला! होऊ शकतं ना त्याला बघून असं’’ बहुतांश मराठी स्टाफ असल्यानं, माझ्या या वाक्यावर सगळेच जरा हसले आणि मग मी माझं आवडतं ‘नेलकटर’ त्या एअरपोर्टला दान करून माझ्या फ्लाइटच्या दिशेने निघाले. अजूनही डोळ्यासमोर रेड टी-शर्टमधला सचिन जात नव्हता. सकाळपासून स्वत:वर उशिरा उठल्यामुळे नाराज असलेली मी स्वत:चेच आभार मानायला लागले होते. काही गोष्टी विधिलिखितच असतात बघा ना, आज सचिन तेंडुलकर दिसणं यासाठीचीच सकाळपासूनची योजना होती ती देवाची.

याच आठवणींमध्ये तृप्त मनाने मुंबई गाठली मी. एक वेगळीच चेतना निर्माण झाली होती माझ्यात. काल रात्री आजचं हेक्टिक शेडय़ूल आठवून कल्पनेनंच थकलेलं माझं मन क्रिकेट क्षेत्रात अपार प्रामाणिक कष्ट घेऊन स्वत:चं आधिपत्य गाजवणाऱ्या त्या क्रिकेटप्रेमीला पाहून, प्रेरित होऊन कामाचं ठिकाण गाठण्यासाठी नव्या जोमाने झपझप पावलं टाकत निघालं होतं. याच वेगात एअरपोर्टवरून बाहेर पडणार तोच मगाशी नागपूर एअरपोर्टवर पोहोचल्यावर भेटलेली फॅमिली दिसली, ‘म्हणजे माझ्याच फ्लाइटने आले हे, उशीर झाला असतानाही तो फोटो महत्त्वाचा होता त्यांच्यासाठी, या जाणिवेने माझी पावलं त्यांच्या दिशेने वळली. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या चिमुकलीला जवळ घेतलं मी आणि त्या काकांना म्हणाले, ‘‘आता काढता फोटो?’’ त्यांनी आनंदाने मोबाइलवर फोटो घेतला आणि मी माझ्या मार्गाला लागले.
तेजश्री प्रधान
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:23 am

Web Title: celebrity writer tajashree pradhan
टॅग Tejashree Pradhan
Next Stories
1 पुन्हा एकदा मालिका..!
2 मुलाखत : प्रत्येक गीत कविता असावी!
3 एफएम बोले तो…
Just Now!
X