आशयात ८९ कट्स व नाव अशा विविध बाजूने ‘उडता पंजाब’ला सेन्सॉरने घेतलेल्या आक्षेपांवरून वादाचा धुराळा उडाला असून, नवनवीन मुद्दे व गुद्दे यांची घुसळण सुरू आहे. चित्रपटाच्या नावातील पंजाब वगळले तर कथेचा फोकस बदलण्याची भीती. सेन्सॉरने कधी फक्त नावालाच हरकत घेतलीय तर कधी गोष्टीवरून नाव आक्षेपार्ह ठरवले. १९७६ मध्ये म्हणजे ऐन आणीबाणीच्या काळात निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘चरस’ या चित्रपटाच्या नावालाच हरकत घेतल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. चित्रपट प्रदर्शित करण्याची बरीचशी तयारी झाली व पोस्टरदेखिल रस्तोरस्ती लागली असताना ऐनवेळी नाव कसे बदलणार? आणीबाणीच्या काळात सेन्सॉरचे नियम जरा अधिकच कडक असल्याने पंचाईतच होती. रामानंद सागर यांच्या सारखा प्रतिष्ठीत निर्माता असल्याने सुटका होऊ शकली. ऐंशीच्या दशकात नसिरूद्दीन शाहची हिंसक भूमिका असणारा ‘जिंदा जला दूंगा’ नावाचा चित्रपट आला होता. सेन्सॉरने त्या नावात बदल सुचवत ‘राख को जलाकर’ असे सुरूवातीला नावात जोडायला लावले. किती विचित्र वाटते ना? संजय लीला भन्सालीच्या राम लीला नावापूर्वी गोलियों की बौछार लावले गेले. चित्रपट निर्मात्यांची संस्था इम्पा यामध्ये चित्रपटाचे नाव नोंदवावे लागते. पण त्या नोंदणीचा व सेन्सॉरचा काहीच संबंध येत नाही. त्यामुळे नाव नोंदवल्याने सर्व काही आलबेल झाले असे अजिबात होत नाही. चित्रपटाच्या नावात शहर वा राज्याचे नाव अथवा धर्म जात पंथ यांच्या भावना व अस्तित्व जोडले गेले असेल तर सेन्साँरची जबाबदारी वाढते. त्यातूनही काही वाद वा समस्या निर्माण होतात. हा वाद निर्माता व सेन्साँर यापुरताच राहिला तर ठीक. पण त्यात राजकीय सामाजिक संस्था शिरल्या तर बाह्य सेन्सॉरशिपचा धोका वाढत जातो.
– दिलीप ठाकुर