दिग्दर्शित हंसल मेहता याचा बहुप्रतिक्षित ‘ओमर्ता’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला अ प्रमाणपत्र देत प्रदर्शनाची संमती दिली आहे. मात्र या सिनेमामधील एका महत्वाच्या सीनमध्ये सेन्सॉरने बदल सुचवले आहे. हा सिनेमा कोणताही बदल न करता प्रदर्शित व्हावा यासाठी दिग्दर्शक हंसल मेहता प्रयत्न करत होते. तरी सेन्सॉर बोर्डने भारताचे राष्ट्रगीत असणाऱ्या एक सीनमधून राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितले असून याच अटीवर त्यांनी सिनेमाला अ प्रमाणपत्र दिल्याचे समजते. सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले असले तरी या सिनेमाचे प्रदर्शन लांबवणीवर गेले आहे. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार राव या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे.

प्रदर्शनापुर्वीच हा सिनेमा बऱ्याच वादात अडकला आहे. मात्र काहीही झाले तरी सेन्सॉर बोर्डला सिनेमाला कात्री लावू देणार नाही अशी भूमिका हंसल मेहता यांनी घेतली होती. एका मुलाखतमीमध्ये बोलताना ‘सिनेमा सेन्सॉर होऊ नये म्हणून मी हवं ते करायला तयार आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण सेन्सॉर बोर्डने सिनेमाचा आक्षय लक्षात घेऊन सिनेमाला संमती द्यावी’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

काय बदल सुचवला आहे सेन्सॉरने

सेन्सॉरने सुचवलेला एकमेव बदल हा शेख तुरुंगात असतानाचा आहे. तुरुंगाबाहेर भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना तुरुंगात शेख लघवी करत असतानाच्या सीनमधील राष्ट्रगीत काढून टाका असे सेन्सॉर बोर्डने सांगितले आहे. याबद्दल बोलताना ‘ओमर्ता’ निर्माता फारुख खान म्हणाले की राष्ट्रगीत असणाऱ्या सीनमध्ये आम्हाला सेन्सॉर बोर्डने बदल सुचवून संबंधीत सीनमध्ये राष्ट्रगीताऐवजी दुसरी म्युझिक वापरण्यास सांगितले. हा बदल आम्ही मान्य केला आणि आमच्या सिनेमाला अ प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती खान यांनी दिली.

प्रदर्शनाची तारीख बदलली

या सिनेमाला सेन्सॉरने अ प्रमाणपत्र दिले असले तरी हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र सेन्सॉरने सुचवलेल्या बदलामुळे निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख दोन आठवड्यांनी पुढे ढकलली असून सिनेमा आता चार मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच दिवशी उमेश शुक्लांचा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या मुख्यभूमिका असणारा 102 नॉट आऊट सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिकीटबारीवर कोणता सिनेमा सरस ठरतो हे मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दिसेलच.

काय आहे सिनेमामध्ये…

हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच राजकुमारच्या भूमिकेचे पैलू पाहायला मिळत आहेत. भूमिका जगतात कशी, हे तो प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगून जातो. लंडन आणि भारतात याची शूटिंग पार पडली असून काही दहशतवादी हल्ल्यांचा चित्रपटाच्या कथेत समावेश करण्यात आला आहे. १९९४मधील दिल्ली अपहरण प्रकरण असो, ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला असो आणि २६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला या घटनाही त्यात दाखवण्यात येणार आहेत.

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट महोत्सव गाजवले

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून पदवी घेतलेला ओमर दहशतवादी कसा होतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनापूर्वीच विविध चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने वाहवा मिळवली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मामी चित्रपट महोत्सवातही याचे प्रदर्शन झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हंसल मेहता आणि राजकुमार ही जोडी चौथ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी ‘अलिगढ’, ‘सिटीलाइट्स’ आणि ‘शाहिद’ या दमदार चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केलं होतं.