चित्रपट निर्मितीनंतर तो सेन्सॉर बोर्डाकडे गेल्यावर त्यांना केवळ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह भाग असेल, तर त्याबाबत निर्माता किंवा दिग्दर्शकाला त्यांनी सूचना द्यावी. त्यावर उगाच वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमातून चित्रपटाबाबत वाद निर्माण केले जात असताना त्याला रोखणे आपल्या हातात राहिलेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘उडता पंजाब’ वरून सुरू असलेला वाद निर्थक आहे. सेन्सॉर बोर्डाने तो सुरू केला असून त्यांच्यात एकमत नाही. चित्रपट निर्मितीनंतर तो सेन्सॉर बॉर्डाकडे परवानगीसाठी जातो. त्यावेळी दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे. चित्रपटातील काही भाग वगळण्यास सांगणे उचित नाही. चित्रपट निर्मितीसाठी निर्माता कोटय़वधी रुपये खर्च करतो, दिग्दर्शक आणि कलावंत मेहनत घेतात. त्यावर सेन्सॉर बोर्डाने आपले अधिकारी वापरून आक्षेप घेणे उचित नाही. त्यांना केवळ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते दिले पाहिजे. सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीबाबत जी नियमावली आहे त्यात बदल केले जात आहेत. मात्र, ते करताना चित्रपट निर्माता अणि दिग्दर्शकालाही विश्वासात घेण्याची गरज आहेत. चित्रपटासाठी परवानगी घेण्याचा प्रकार भारतात आहेत. हॉलंडमध्ये नाही. चित्रपटात काय दाखवावे आणि काय नाही, याचा अधिकार दिग्दर्शक आणि निर्मात्याला असला पाहिजे. त्यात राजकीय हस्तक्षेप असण्याची गरज नाही. उंबरठा, जैत रे जैत, सामना यासारख्या अनेक मराठी चित्रपटात राजकारणावर टीका करण्यात आली. मात्र, त्यावरून कधीच वाद निर्माण करण्यात आले नाहीत. निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला मर्यादा असल्या पाहिजे, हे जरी खरी असले तरी आवश्यक ती दृश्ये दाखविण्याचा अधिकार त्यांना असला पाहिजे. चित्रपटावर वाद निर्माण झाल्यावर तो जास्त प्रसिद्ध होतो, असे नाही. ‘उंबरठा’ला मिळालेली प्रसिद्धी आजही विसरणार नाही. नागपुरात तो १५ आठवडे सुरू होता, त्यामुळे चित्रपटाचे कथानक, संगीत आणि कलावंतांवर चित्रपटाचे भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म. फुले-सावित्रीबाईंच्या जीवनावर चित्रपट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने २.५ कोटी मंजूर केले आहेत. कमलेश पांडे या चित्रपटाचे पटकथा-संवाद लिहीत असून निर्मितीच्या दृष्टीने लवकरच काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.