‘चिल्ड्रेन फिल्म सोसायटी, इंडिया’च्या (सीएफएसआय) वतीने नवी दिल्ली आणि मुंबई येथे उत्तमोत्तम बालचित्रपटांच्या ‘समर बोनान्झा’ चे आयोजन केले आहे. या बोनान्झामध्ये ‘सीएफएसआय’ने बनवलेले चित्रपट लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही मोफत पाहता येणार आहेत.

मुंबईत २३ एप्रिलपासून हा महोत्सव सुरू झाला असून २६ एप्रिलपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवात ‘सीएफएसआय’ निर्मित, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले ‘हॅप्पी मदर्स डे’, ‘गोपी गवैय्या बाघा बजैय्या’, ‘गट्टू’, ‘क्रिश, ट्रिश अँड बाटलीबॉय’, ‘कफल’, ‘पप्पू की पगदंडी’, ‘गौरू’ आणि ‘किमाज लोड’ सारखे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. गेल्या ६० वर्षांत ‘सीएफएसआय’ने लहान मुलांकरता उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. यातील अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे मुलांचे मनोरंजनही होईल आणि त्यांना नविन काही शिकायलाही मिळेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा यांनी व्यक्त केला.

मुंबईत ‘फिल्म डिव्हिजन्स’च्या जे. बी. हॉलमध्ये महोत्सवातील हे चित्रपट पहायला मिळणार आहेत. तर नवी दिल्लीत २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सिरी फोर्ट ऑडिटोरिअममध्ये या महोत्सवाची मजा बच्चेकंपनीला अनुभवता येणार असल्याचे ‘सीएफएसआय’च्या वतीने सांगण्यात आले.