चित्रपट असो की मालिका त्यामधील सर्व गोष्टी काही खऱ्या नसतात. अगदी सत्य परिस्थितीवर आधारित जरी कथानक असले तरी त्यात नाटय़मयता आणण्यासाठी बदल केले जातात. याची जाणीव सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील असते. पण काल्पनिक असो की सत्य कथानक जे काही दाखवले जाते ते रचताना त्यामध्ये थोडा तरी लॉजिकचा, तारतम्याचा विचार केलेला असतो. काहीतरी एक रचना असते. त्यामुळे ते पाहताना काही गोष्टी दुर्लक्षित करून पाहण्याची प्रेक्षकांनादेखील सवय होते. पण कधी कधी कसलाच काही विचार न करता अत्यंत बालिश अशा पद्धतीने शेंडा ना बुडखा अशी कथानकं सादर केली जातात. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वरील ‘चाचा विधायक है हमारे’ ही वेबसीरिज या वर्गवारीत अगदी फिट्ट बसणारी आहे. यात ना गोष्ट आहे, ना विनोद आहे, ना थरार आहे, ना रंजकता.

इंदोर शहरातील मध्यमवर्गीय घरातील एक मुलगा रॉनी हा शिकण्यासाठी दिल्लीला गेलेला असतो. (तो काय शिकत असतो हे संपूर्ण मालिकेत कधीच कळत नाही) पण ते सर्व सोडून तो इंदोरला परत येतो. सतत दाढीचे खुंट वाढलेला, कधी पाहावं तेव्हा आत्ताच झोपेतून उठून आलेला वाटावा असा त्याचा अवतार. टी शर्टवर बटणं सोडलेला शर्ट आणि कळकट्ट जीन्स हा त्याचा पेहराव. तर हा रॉनी त्याच्या दोन मित्रांना सांगत असतो की त्याचे काका आमदार आहेत. (पण चहाच्या गाडय़ावर याची उधारी असते) त्याच्या दोन बावळट मित्रांनादेखील हे खरे वाटत असते. रॉनी खोटं सांगत असतो, कारण गल्लीत त्याची कॉलर टाइट होण्यासाठी. आणि त्याच्या दोन बावळट मित्रांसारखे आणखीन तेवढीच बावळट मुलं त्यावर विश्वास ठेवतात. हा कोणाला फसवत नसतो, पण काका आमदार आहेत हे मात्र पदोपदी सांगत असतो. या सर्व बावळटांमध्ये चक्क एक बँकेत काम करणारी मुलगीदेखील सामील झालेली असते. ही मुलगी त्याला एका स्पर्धा परीक्षेच्या खाजगी शिकवणीत भेटलेली असते. ती याला काही कामं सांगत असते आणि हादेखील ती करत असतो. (कारण ह्य़ाचं तिच्यावर एकतर्फी प्रेम असते, पण ती याला चांगला मित्र मानत असते). रॉनीच्या त्या बावळट टोळक्यातील एकाच्या कामात याला फटका बसतो. हा वडिलांची गाडी विकतो. एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊ न इन्स्पेक्टरला थोबाडीत मारतो. बरं हे सर्व करण्याची याची ताकद नसतेच, पण हा करत असतो. एकदा त्या आमदाराला याचा सुगावा लागतो आणि राडा होतो. मात्र शेवटी तो आमदार आणि हे दोघे एकत्र येतात आणि याला युवक आघाडीचा प्रमुख केले जाते.

गोष्ट म्हणाल तर ती एवढीच. दहा भागांमध्ये सहा-सात उपद्व्यापी प्रसंग, उरलेला वेळ घरातली भांडणं आणि बावळट मित्रांची पिटपिट याशिवाय या वेबसीरिजमध्ये काहीही नाही. ना त्यात काही प्रभावी संवाद आहेत ना अभिनय. (हा, आत्ता बावळट मित्राचे पात्र एक नंबर साकारणे हा अभिनय असेल तर त्याला शंभर गुण द्यायला हरकत नाही). असो, दरवेळी काहीतरी पाहून बोध व्हायलाच हवा असे नाही, पण त्यातून निदान मनोरंजन तरी अपेक्षित असते. पण येथे तर कधी एकदा हे संपतंय असेच वाटत राहते. विनोद म्हणजे बावळट, बाष्कळ संभाषणं अशी जरी समजूत असेल तर या वर्गवारीत ही मालिका फिट्ट बसू शकते.

सेन्स नावाचा काही तरी प्रकार किमान प्रमाणात का होईना माणसाला असतो हेच बहुदा दिग्दर्शकाला मान्य नाही, असे हे सारे प्रकरण पाहताना वाटत राहते. एक रॉनी सोडला तर मालिकेतील सर्व पात्रं सेन्सविरहित असावीत अशी त्यांची रचना केलेली आहे. खोटं बोलण्याची काही तरी एखादी झिंग असावी असे म्हणून मुख्य पात्राची रचना असावी तर तसा प्रकारदेखील येथे नाही. कधी कधी तेदेखील बावळटासारखेच वागत असते.

वेबसीरिज हा प्रकार ज्या पद्धतीने हाताळला जात आहे, त्यातून काहीही बोध न घेता या सीरिजची मांडणी केलेली दिसते. ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ने खरं तर भारतीय बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारली आहे. पण त्यांचे हे सारे कसब हिंदी चित्रपटांशीच निगडित दिसत आहे. हिंदी वेबसीरिजमध्ये गेल्या सहा महिन्यात त्यांनी एकदेखील सकस प्रयोग सादर केल्याचे दिसून आले नाही. त्यांचे हिंदी वेबसीरिजमधील प्रयोग पाहता त्यांना काहीतरी दर्जेदार द्यायचंच नाही अशी त्यांची इच्छा असावी की काय, असाच प्रश्न ही वेबसीरिज पाहून वाटू लागतो.

चाचा विधायक है हमारे

सीझन – पहिला

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ