स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतल्या कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा म्हणून स्टॅन ली यांची ओळख होती. स्टॅन ली यांनी १९६१मध्ये ‘दि फॅन्टास्टिक फोर’सोबत मार्व्हल कॉमिक्स सुरु केलं होतं. त्यानंतर यामध्ये स्पायडर मॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्टेंज आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंची पात्रं समाविष्ट झाली. इतकंच नव्हे तर ‘चक्र’ या भारतीय सुपरहिरोचे जनकसुद्धा स्टॅन लीच होते. ‘चक्र- द इनव्हिन्सिबल’ हा त्यांचा पहिला भारतीय सुपरहिरोवर आधारित चित्रपट होता.

२०१३ मध्ये ‘चक्र- द इनव्हिन्सिबल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने तयार झालेला हा चित्रपट कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात राजू राय नावाच्या एका भारतीय तरुणाची कहाणी रेखाटण्यात आली आहे. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तांत्रिक पोशाख विकसित करतात, जो परिधान केल्यावर शरीरातील रहस्यमयी चक्रे सक्रिय होतात. या चित्रपटाचे दोन सिक्वलसुद्धा २०१६ आणि २०१७ साली प्रदर्शित झाले. ‘चक्र- द राइज ऑफ इनफायनायटस’ आणि ‘चक्र- द रेव्हेंज ऑफ मॅग्नस फ्लक्स’ अशी या दोन सिक्वलची नावं आहे.

ली यांनी कॉमिक्ससह बऱ्याच चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. स्टॅन ली यांच्या कॉमिक्सचे चाहते जगभरात आहेत.