सेलिब्रिटी लेखक – श्रेया बुगडे
स्वप्नातलं वाटावं असं निसर्गरम्य बोरिवलीतलं माझं सुंदर घर. त्या समोरच असलेलं मारुतीरायाचं देखणं मंदिर. त्या मंदिराच्या पटांगणात माझ्याच वयाची अनेक मुलं संध्याकाळच्या वेळी वेगवेगळे खेळ खेळायची. खूप आरडाओरडा, दंगामस्ती करायची. त्यांचं ते बालसुलभ खेळणंही मला निर्थक वाटायचं. कारण मी तेव्हा माझ्या खोलीत दुसऱ्या दिवशी असणाऱ्या कुठल्याशा स्पर्धेची तयारी करण्यात मग्न असायचे. अगदी नर्सरीत असल्यापासून. आई म्हणते तसं बहुधा माझा जन्मही यासाठीच झालेला असावा.

अभिनयाची आवड आणि थोडीफार पार्श्वभूमी असलेल्या माझ्या आईने माझी आवड जोपासली, वाढवली. माझ्या बाबांचा खंबीर पाठिंबा आणि माझ्या मोठय़ा बहिणींची नि:शब्द साथ याच्या जोरावर मी पुढे जात राहिले. माझ्या मोठय़ा बहिणीला जेव्हा आईची गरज होती त्या काळातही आई सतत माझ्याबरोबर असायची. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा, मेहनत करायची आणि यशस्वी व्हायचं हे ठरूनच गेलं होतं. बोरिवलीतल्या सेंट झेव्हिअर्स शाळेनेही अशा स्पर्धामध्ये उतरवून मला नेहमी प्रोत्साहन दिलं.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

माझ्या आईची जवळची मैत्रीण मंजिरी धर्माधिकारी हिने माझी आणि माझ्या आईची ओळख मीना मावशीशी म्हणजे सुप्रसिद्ध कळसूत्रीकार मीना नाईक यांच्याशी करून दिली. मीना मावशी त्यावेळी प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचं ‘चमत्कार झालाच पाहिजे’ हे बालनाटय़ करत होती. तालमीच्या पहिल्याच दिवशी नाटकाचं एवढं मोठं बाड माझ्या हातात आलं आणि मी घाबरूनच गेले. कारण मी तेव्हा तिसरीत होते. आणि नुकताच मराठी विषयाचा अभ्यास सुरू झाला होता. आता हे वाचायचं कसं आणि पाठ कसं करायचं असा मोठा प्रश्न मला पडला. पण कुठलीही गोष्ट करून बघायचीच, यशापयशाचा विचार करायचा नाही हे आई-वडिलांनी लहानपणापासून मनावर िबबवलेलं असल्यामुळे मी माझ्या भीतीवर नेटाने मात केली आणि माझे बालरंगभूमीवर पहिले पाऊल पडले. ‘माकडा माकडा हुप’ या माझ्या दुसऱ्या नाटकाने माझ्या बालपणातील रंगत आणखी वाढवली. लहानपणापासून निरीक्षणशक्ती, आणि उत्तम पाठांतर माझ्यासाठी जमेची बाजू ठरली.

मीना मावशींनी डॉ. अनिल बांदिवडेकर लिखित ‘वाटेवरती काचा गं!’ या लैंगिक शोषणावर आधारित बालनाटकाची निर्मिती करून एक धाडसी पाऊल उचललं. या नाटकाने माझ्यासाठी एका वेगळ्या जगाचे दरवाजे खुले केले. आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी यांच्या आश्वासक गोतावळ्यात वाढणाऱ्या निष्पाप बाल्याला असाही एक कंगोरा असू शकतो हे या नाटकाने शिकवलं आणि माझ्याही नकळत मी मोठी होत गेले.

मी आणि आई आम्ही दोघी या नाटकाच्या प्रयोगात आई-मुलीचीच भूमिका करायचो. या नाटकाचे देशभरात शाळा, कॉलेज, दवाखाने, सामाजिक संस्थांमध्ये जवळपास ४५० प्रयोग केले. जन्मदाते वडीलच आपल्या दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण करतात तेव्हा मुलींना घेऊन वेगळी होणारी, त्यांच्यासाठी वर्षांच्या मध्यावरच मुंबईच्या एका प्रथितयश शाळेत प्रवेशासाठी याचना करणारी आई पाहिली.

या नाटकाचा प्रयोग म्हणजे प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव असायचा. एक वेगळी शिकवण असायची. ‘तुम्ही आमच्यासाठी देव आहात. या नाटकाने मला तोंड उघडण्याची िहमत दिली’, असे सांगणारा वसईच्या एका शाळेतला नववीत शिकणारा मुलगा आणि ‘आमच्या वेळीही आम्हाला अशा किळसवाण्या प्रकारांना सामोरं जावं लागलंच होतं,’ असं व्यथित होऊन सांगणाऱ्या ७५ वर्षांच्या ठाण्यातल्या आजी; या आणि यांसारख्या अशा असंख्य अनुभवांनी मला आणखीच कणखर बनवलं. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बालरंगभूमी माझ्यासाठी एक मोठी शाळा ठरली.

फोरास रोड हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांच्या मनात धडकी भरते. पण माझ्याच वयाच्या नट्टापट्टा करून, पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या मुली मी नाटकाच्या निमित्ताने पाहिल्या. ‘माझ्या घरासमोर तुमचं नाटक करू नका. आता माझी धंद्याची वेळ आहे’, असं सांगणाऱ्या स्त्रीची विवशता मी वयाच्या १२-१३ व्या वर्षी अनुभवली. ‘ये दिल मांगे मोअर’ या माझ्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हे भयाण वास्तव माझ्यासमोर आलं आणि वरवर चमचमणाऱ्या दिखाऊ दुनियेची भयानकता मला जाणवली.

मुलीच नाही तर मुलांनाही अशा शोषणाला सामोरं जावं लागतं हे विदारक सत्य जाणवलं. आताही स्त्रियांवर आणि अजाण बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाचनात येतात तेव्हा खूप दु:ख होतं. ‘वाटेवरती काचा गं’सारख्या नाटकांची समाजाला अजून गरज आहे हे जाणवतं. खेद वाटतो. ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात;

वाटेवरती काचा गं, काचा गं…
चाफ्यावरती नाचा गं, नाचा गं…

कोवळ्या वयात अशा निष्ठुर प्रकारांना सामोरे जाणारी बालकं बघून मन विदीर्ण होतं. स्त्रियांवरील अत्याचार मन हादरवून सोडतात. हे सर्व थांबविण्यासाठी स्वत:च बदलायला हवं. अधिक मजबूत होऊन या विकृत मनोवृत्तीशी लढायला हवं. सक्षम व्हायला हवं.

अनेक चांगल्या गोष्टी शिकवत माझ्यातल्या कलेनं मला इथपर्यंत आणलंय. माणूस म्हणून घडवलंय. याच कलेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. माझ्या लाडक्या गणरायाच्या आणि आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने ती पुरी होईलच हा विश्वास मला आहे.

आपण चांगलं वागलं की आपल्याभोवती असणारं सगळं चांगलंच असतं याचा प्रत्यय मला अनेकदा आलाय. सुदैवाने मला आत्तापर्यंत सर्वाचच खूप प्रेम मिळालंय. विश्वास मिळालाय. त्या प्रेमाला, विश्वासाला सार्थ ठरवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतेय. करत राहीन. अधिक जोमाने काम करत राहीन.

हसत राहीन, हसवत राहीन!
श्रेया बुगडे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा