chand pritichaप्रेम मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. प्रेमाचे हे महत्त्व ओळखून कोल्हापूरच्या ‘प्रेमला प्रॉडक्शन’ने मराठीतील हरहुन्नरी व नवोदीत कलाकारांना घेऊन ‘छंद प्रितीचा’ हा नवा तमाशाप्रधान मराठी चित्रपट आकारास आणला आहे. ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून तांत्रिक सोपस्काराचे काम पूर्ण होताच चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
मराठी चित्रपट यशाची नवनवीन परिमाणे तयार करताना दिसतोय. वैविध्यपूर्ण आशय विषयांनी समृद्ध असे चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करताहेत. याच धर्तीवर येऊ घातलेल्या ‘छंद प्रितीचा’ चित्रपटास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे. ‘छंद प्रितीचा’ या संगीतमय चित्रपटाचे चित्रीकरण सांगली जिल्ह्यातील नांद्रे, वसगडे, ब्रह्मनाळ, भिलवडी, हरिपूर या रम्य ठिकाणी कृष्णामाईच्या परिसरात पूर्ण झाले असून कर्नाटकातील ऐतिहासिक बदामी येथेही काही उत्कंठावर्धक दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये हर्ष कुलकर्णी, सुबोध भावे, सुवर्णा काळे, शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव आदि कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाची अदाकारी पहाता येईल.
चित्रपटाची कथा, गीते आणि दिग्दर्शनाची धुरा ज्येष्ठ दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी सांभाळली आहे. संगीत प्रवीण कुंवर यांचे असून छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. दाक्षिणात्य नृत्यदिग्दर्शक सुजितकुमार यांच्यासह दिपाली विचारेने नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे.