येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी निधी पांडे हिने सोनी वाहिनीवरील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये १२.३० लाख रुपये जिंकले. विशेष म्हणजे, कौन बनेगा करोडपती या मालिकेत चंद्रपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलीला संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ज्येष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती या स्पर्धात्मक मालिकेत संधी मिळावी, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून प्रत्येक जण या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नरत असतो. असाच प्रयत्न येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निधी पांडे या विद्यार्थिनीने केला. सततच्या प्रयत्नानंतर यात तिला यश आले आणि २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त आयोजित आई व मुलीच्या स्पेशल जोडीसाठी निवड झाली.
या संधीचे सोने करून निधी पांडे ही आई रिता पांडेंसोबत कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाली. यात या आई-मुलीच्या जोडगोळीने अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना तब्बल १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. या आई-मुलीचे ज्ञान बघून स्वत: अमिताभ बच्चन यांनी कौतूकाने पाठ थोपटली. या स्पेशल जोडी विशेष कार्यक्रमात रिता पांडे यांनी एका कवितेचे वाचन केले व अमिताभ बच्चन यांना एक पेंटिंग भेट स्वरूपात दिले. हे पेंटिंग रिता पांडे यांचे सासरे आपटेजी यांनी तयार केले आहे.
रिता पांडे या येथील दीक्षित परिवारातील कन्या असून प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दीक्षित यांची लहान बहीण आहे. त्यांनी जनता महाविद्यालयातून बीएस्सीची परीक्षा सुवर्णपदकासह उत्तीर्ण केली. त्यानंतर नागपूरला एमएसस्सी केले. सध्या त्या रायपूर येथे वास्तव्याला आहेत, तर त्यांची मुलगी निधी पांडे हिने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आता तिने मुंबईत एमबीएसाठी प्रवेश घेतला आहे. रिता व निधी पांडेंच्या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.