बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता म्हणून नावलौकीक मिळवलेल्या अर्शद वारसीने पाकिस्तानची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाकिस्तानमधील हे गमतीदार रॉकेट लॉन्चिंग पाहून लोक हसून हसून अक्षरश: वेडे होत आहेत. अर्शदने ट्विट केलेल्या या व्हिडीओत काही पाकिस्तानी लोक स्पेस रॉकेटसारखा दिसणारा एक भला मोठा फुगा आकाशात सोडत आहेत. या प्रकाराची त्याने “पाकिस्तानने देखील रॉकेट सोडले, हे मला माहितच नव्हते” अशा मिश्कील शब्दात खिल्ली उडवली आहे.

अर्शदने ट्विट केलेला हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या जोरदार चर्चेत आहे. २० हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्याच्या या पोस्टवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओची तुलना भारताच्या चांद्रयान मोहीमेशी देखील केली आहे.

अगदी कालपरवाची गोष्ट आहे, भारताने आपली चांद्रयान मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करुन दाखवली. या मोहीमेत पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या ३ लाख ८४ हजार किलोमीटर पैकी ३ लाख ८३ हजार ९९८ किलोमीटरचा प्रवास आपण पार केला. भारतीय वैज्ञानिकांच्या या महत्वकांक्षी प्रयोगाचे जगभरातून कौतुक करण्यात आले. मात्र हे कौतुक पाकिस्तानला आवडलेले नाही.

चांद्रयान मोहीमेच्या शेवटच्या दोन किलोमीटरच्या टप्प्यात काहीशी तांत्रिक गडबड झाली होती. याच गडबडीचे निमित्त साधून तमाम पाकिस्तानी मंडळींनी भारतावर टीका केली होती. या टीकेचा बदला घेण्यासाठी अभिनेता अर्शद वारसीने हे ट्विट केले, असे म्हटले जात आहे.