चांद्रयान 2 ला आतापर्यंत मिळालेल्या यशाचं भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्नांचा प्रत्येक नागरिक गौरव करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील 7 सप्टेंबर रोजी इस्रोच्या बंगळुरूमधील केंद्रात उपस्थित राहून शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवले होते. विक्रम लँडर 2.1 किलोमीटर अंतरावर असतानाचा त्याचा संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. त्यातच कोणत्या कोणत्या माध्यमातून प्रत्येक भारतीय त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. अशात आता इस्रोच्या शास्त्रज्ञांना ट्रिब्युट देणारे एक गीत तयार करण्यात आले आहे.

चांद्रयान-2 मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाला हे गीत समिर्पित करण्यात आले आहे. या गाण्याला चांद्रयान अॅन्थेम असं नाव देण्यात आलं आहे. Sreekant’s SurFira या बँडेने हे चांद्रयान अॅन्थेम तयार केले आहे. तसंच यामध्ये लोकप्रिय गायक आणि संगीतकार कैलाश खेर यांचीदेखील झलक पहायला मिळत आहे. या गाण्याचे शब्द देशभक्तीने भरलेले आणि प्रेरणादायक आहेत. यूट्युबवर हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे.

यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही इस्रोच्या या कामगिरीचे कोतुक केले आहे. तसंच विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर अनेकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचाही प्रयत्न केला आहे. चांद्रयान-2 मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली होती. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नसून इस्रोकडून संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.