मानसी जोशी

चार वेगवेगळ्या कथांना जोडणारा समान दुवा हे अँथॉलॉजी पद्धतीचे तंत्र प्रेक्षकांना काही नवे नाही. चित्रपटात, छोटय़ा पडद्यावर याचे अनेक प्रयोग झाल्यावर आता ओटीटीवरही अशाच पद्धतीच्या वेब मालिकांची निर्मिती होते आहे. एकाच मालिकेत कथेचे वैविध्य पाहण्यास मिळत असल्याने हा प्रकार प्रेक्षकांनाही पडद्याला खिळवून ठेवतो. ‘नेटफ्लिक्स’वरील लोकप्रिय ‘लस्ट स्टोरीज’ या वेबपटाच्या निमित्ताने हा प्रकार भारतीय प्रेक्षकांना नव्याने अनुभवता आला..

चार वर्षांपूर्वी इंटरनेटचे दर स्वस्त झाल्यावर भारतात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन या ओटीटी स्पर्धकांनी देशात पाय रोवले. ओटीटीच्या उदयानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी आशयनिर्मितीत वेगळे प्रयोग करण्यात आले. अँथॉलॉजी पद्धतीची आशयनिर्मिती हे त्यातील एक पुढचे पाऊल. हॉलीवूडमध्ये ‘लव्ह डेथ अँण्ड रोबोट’, ‘अमेरिकन क्राईम स्टोरी’, ‘नार्कोस’ या अँथॉलॉजी प्रकारातील वेब मालिका आहेत. चित्रपट आणि छोटय़ा पडद्यानंतर आता ओटीटीवरही अँथॉलॉजी पद्धतीच्या वेब मालिकांची निर्मिती केली जाते आहे. नेटफ्लिक्सवरील अनुराग कश्यप, करण जोहर, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी या चार दिग्दर्शकांची कलाकृती असलेली ‘लस्ट स्टोरीज’ हा वेबपट याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. वर्षांनुवर्षे उपेक्षित राहिलेली स्त्रीची लैंगिक भावना या विषयाला धरून चार वेगळ्या स्त्रियांचे भावविश्व मांडणारी ‘लस्ट स्टोरीज’ प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली. ‘लस्ट स्टोरीज’ला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून त्याच टीमने परत ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबपटाची निर्मिती केली. आणि त्यानंतर हिंदीत ‘फॉरबिडन लव्ह’, ‘परछाई’ आणि मराठीत ‘चिकटगुंडे’ या वेब मालिकांची निर्मिती केली गेली.

‘झी ५’ वर आलेल्या ‘फॉरबिडन लव्ह’ या वेब मालिके तही अँथॉलॉजी तंत्राचा वापर केलेला आहे. यातला अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री पत्रलेखा यांची भूमिका असलेला पहिला ‘अरेंज्ड मॅरेज’ नावाचा भाग समलिंगी संबंधांवर भाष्य करतो. एक गृहिणी आणि तरुण संगीतकार यांच्यातील प्रेमाच्या छटा दाखवणारा ‘अनामिका’ हा दुसरा भागही तितकाच रंजक आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘ताज महल १९८९’ या वेब मालिके त नव्वदच्या दशकातील लखनऊ शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. यात तीन वेगवेगळ्या जोडप्यांच्या कथेभोवती ही वेबमालिका गुंफण्यात आली आहे. या वेबमालिके त अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका आहे. बंगाली भाषेतील ‘बालोभाषोर शोहोर’ या वेब सीरिजमध्ये कलकत्ता हे शहर आणि प्रेम हा विषय केंद्रस्थानी ठेवून चार कथा गुंफण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर ‘परछाई’ या वेब सीरिजमध्ये रस्किन बाँड यांच्या भयकथा पाहायला मिळतात. ‘वूट’ वरील ‘शॉर्टकट’ या वेबमालिकेत बारा छोटय़ा कथा दाखवण्यात आल्या आहेत. साध्या सरळ चाललेल्या आयुष्यात घडणाऱ्या एका अवचित घटनेने बारा कथांना एका धाग्यात गुंफले आहे. एमएक्स प्लेयरवरील ‘पवन आणि पूजा’ याची मांडणी थोडी हटके आहे. तीन विविध वयोगटातील पवन आणि पूजा ही समान नावे असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काय घटना घडतात हे यात दाखवण्यात आले होते.

हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये असे दर्जेदार प्रयोग झाल्यानंतर मराठीतही त्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. टाळेबंदी आणि त्यात जोडप्यांना आलेले बरे वाईट अनुभव मांडणारी ‘भाडिपा’ची ‘चिकटगुंडे’ ही वेब मालिकाही अँथॉलॉजी प्रकारात मोडते. या वेब मालिके चे दोन भाग प्रदर्शित झाले असून तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल या मालिके चा निर्माता असलेला सारंग साठय़े सांगतो, ‘आई आणि मी नंतर आम्हाला एक आशयामध्ये वेगळा प्रयोग करायचा होता. पहिल्यापासून मी अँथॉलॉजीच्या प्रेमात असल्याने यावर आशयनिर्मिती करण्याचे ठरवले. यात दोन वेगवेगळ्या कथा लिहिताना त्याचा समान धागा ठेवण्याचे आव्हान लेखक आणि दिग्दर्शकावर असते. ‘चिकटगुंडे’ची निर्मिती करताना आम्ही हाच मुद्दा डोक्यात ठेवून कथा लिहिली. अँथॉलॉजी प्रकारचे महत्त्वाचे वैशिष्टय़ असे की, प्रेक्षकांना कथेत वैविध्य पाहण्यास मिळते. परिणामी कधी प्रेक्षकांना एक भाग आवडेल मात्र, दुसरा आवडणारही नाही. ‘चिकटगुंडे’च्या पहिला दोन भागांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि नवीन भागाची निर्मिती करणे हे खरे आव्हान आहे, असे तो म्हणतो. नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज’मध्ये अँथॉलॉजी प्रकाराचा उत्कृष्ट वापर केला होता. यात अनुराग कश्यपच्या कथेत विषयाची केलेली मांडणी सर्वात जास्त भावली. मात्र त्यापेक्षा करण जोहरची कथा जास्त लोकप्रिय झाली. पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणावरील ‘भाडिपाचे वल्ली’ हा कार्यक्रमही याच प्रकारातील आहे, अशी माहितीही सारंगने दिली.

अ‍ॅंथॉलॉजी प्रकारचे चित्रपट

लस्ट स्टोरीज

घोस्ट स्टोरीज

बॉम्बे टॉकीज

आय अ‍ॅम

कानपुरिये

रुबरु रोशनी

डरना मना है

हाऊस ऑफ स्टोरीज

वेब सीरिज

शॉर्टकट्स – वूट

परछाई – झी ५

फ से फँटसी – वूट

कपल्स बार – तेलुगू

रात्री के यात्री – एमएक्स प्लेयर

ऑफ बीट्स

भालोबाशार शोहोर – झी ५

‘ताज महल १९८९’ या वेब मालिके त नव्वदच्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. मी तो काळ अनुभवला असल्याने भूमिका करण्यास विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. अँथॉलॉजी प्रकारातील चित्रपट अथवा वेब मालिके ला एक विशिष्ट प्रकारचा प्रेक्षकवर्ग पाहतो. यातील एक कथा ही दुसऱ्या कथेहून खूप वेगळी असते. मात्र त्या दोन कथांना जोडणारा एक समान दुवा असतो. स्थळ, काळ, माणसे, एखादी वस्तू काहीही असू शकते. ताज महलमध्ये लखनऊ शहर आणि प्रेम हा कथांना जोडणारा समान धागा आहे. आगामी काळातही अँथॉलॉजी प्रकारातील आशयनिर्मिती वाढेल. 

गीतांजली कु लकर्णी, अभिनेत्री