गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या इंटरनेट क्रांतीनंतर मनोरंजन क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे. सोशल मीडिया आणि युट्यूब चॅनल्सची वाढती संख्या यामुळे टेलिव्हिजन माध्यमासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, नव्वदीच्या दशकात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता तेव्हा टेलिव्हिजन हे दैनंदिन मनोरंजनाचे प्रमुख साधन होते. याच काळात टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक बदल व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी ‘व्ही’ आणि ‘एमटीव्ही’ हे दोन चॅनेल्स प्रेक्षकांसाठी नव्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम घेऊन आली. त्यामुळे अल्पावधीतच हे चॅनेल्स लोकप्रिय झाले. मात्र, काळाच्या ओघात नव्या माध्यमांच्या उदयानंतर हे चॅनेल्स प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेले. त्यामुळेच आता ‘व्ही’ चॅनेलने आता आपला कारभार आवरता घेण्याचा निर्णय घेतलाय. या चॅनलमुळे कोणताच नफा होत नसल्यामुळे ‘स्टार इंडिया’ने व्ही चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : प्रार्थनानंतर आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

चॅनल ‘व्ही’ने गेली दोन दशके तरुणांच्या मनावर राज्य केले. तेव्हाच्या नव्या पिढीला अपील करणारे अनेक कार्यक्रम व्ही चॅनलवर पाहायला मिळाले. या चॅनेलवर नवीन चित्रपटांची गाणी, नवे शो आणि सेलिब्रिटीजचा राबता नेहमी असायचा. या कार्यक्रमांमधूनच अनेक व्हीजे मनोरंजन क्षेत्राला मिळाले. यामध्ये हरयाणवी जट उधम सिंहची भूमिका साकारणारा मुनिष मखिजा, मल्याळी लोल्ला कुट्टी साकारणारी अनुराधा मेनन, श्रुती सेठ, सारा जेन डियास, आदित्य रॉय कपूर, गौरव कपूर, लूक केन्नी यांचा समावेश आहे.

वाचा : आलिया भट्टने घेतली रेंज रोवर वोग, जाणून घ्या किंमत

घसरलेली लोकप्रियाता लक्षात घेता २०१२ मध्ये व्ही चॅनेलकडून नव्या धाटणीचे कार्यक्रम सुरू करण्यात आले. या चॅनलवरील ‘दिल दोस्ती डान्स’, ‘द बडी प्रोजेक्ट’, ‘हमसे है लाइफ’, ‘डेअर टू डेट’, ‘सड्डा हक’, ‘गुमराह’ मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. शक्ती मोहन, शांतनू महेश्वरी, कुवर अमर हे स्टारही याच चॅनलमुळे नावारूपाला आले. परंतु, गेल्यावर्षी जून महिन्यात चॅनलवरील सर्व शो बंद करण्यात आले होते. तेव्हापासून चॅनेलवर फक्त गाणीच दाखवली जातात.