निलेश अडसुळ

करोनामुळे मालिकांचे चित्रीकरण थांबले असून चित्रित आशयाचा संचयही संपला असल्याने पुढे काय दाखवायचं असा प्रश्न वाहिन्यांमपुढे उभा ठाकणे स्वाभाविकच आहे. परंतु लोकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिकांचे काही भाग पुन:प्रक्षेपित करण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला. त्यामुळे हे जुन्या प्रकाशाचे तेज लोकांचे रंजनाधार ठरेल यात शंका नाही.

स्टार प्रवाहवर रविवार, २९ मार्चला सकाळी ७ ते ९.३० या वेळेत ‘मी होणार सुपरस्टार’ या संगीत पर्वाचे काही निवडक भाग पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांची सकाळ सुमधूर होण्यासाठी या अनोख्या संगीत मैफलीचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता ‘फर्जंद’ या ऐतिहासिक चित्रपटाचे प्रक्षेपण होईल. तर पुढील आठवडय़ात दैनंदिन मालिकांचे पुन:प्रक्षेपण होईल.

झी मराठी वाहिनीने सोमवार, ३० मार्च पासून दररोज सकाळी कीर्तन,  दुपारी प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका, तर संध्याकाळ नंतर मनोरंजनाने काही कार्यक्रम आणि चला हवा येऊ द्या मधील विनोदवीरांची धमाल अशी भक्ती,  धमाल— मस्ती आणि विनोद प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. तर ‘झी टॉकीज’ या चित्रपट वाहिनीवर लवकरच टॉकीज प्रीमियर लीग सुरु होणार आहे. यामध्ये तुंबाड, लय भारी, मुळशी पॅटर्न, नाळ असे लोकप्रिय चित्रपट दाखवण्यात येतील.

तर कलर्स मराठी वाहिनीवर रविवार २९ मार्चला मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दोन स्पेशल हा मुलाखतींचा खुमासदार कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. तर सोमवारपासून सध्या सुरु असलेल्या मालिकांचे पुन: प्रक्षेपण केले जाईल. हे पुन: प्रक्षेपण असले तरी सिद्धी—शिवा, अनु—सिद्धार्थ, संजू— रणजीत या जोडय़ा लोकांना भलत्याच आवडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्यांची गोडी या निमित्ताने घराघरात पोहीचेल.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जीजामाता’ या मालिकेचे शिवजन्मापासून पुढचे भाग दाखवण्यात येतील ज्यामध्ये शिवरायांची जडणघडण आणि जिजाऊंचे स्वराज्य उभारणीचे संस्कार प्रेक्षकांना पाहायला मिळतील. तर सध्या करोनामुळे आयपीएल क्रिकेट सामने रद्द झाले असले तरी ह. म. बने तु. म. बने या मालिकेतील सर्वांना ‘बने प्रीमियर लीग’ चा आस्वाद प्रेक्षकांना आगामी भागात घेता येणार आहे. याच वाहिनीवरील  सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या सहजीवनाची गाथा सांगणारम्य़ा ‘सावित्रीजोती’ या मालिकेत त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग पुढील काही भागात पाहता येतील. तर लोकांचे विनोदाच्या माध्यमातून मनोरंजन करणारम्य़ा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे काही महत्वाचे भाग दाखवले जातील.

‘काय पाहाल’ ची चर्चा

नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे बंद आहेत. त्यात बगीचे, चौपाटी किंवा सार्वजनिक स्थळांवरही जाण्यास बंदी असल्याने घरात बसून करायचे काय, या प्रश्नाची अनेक उत्तरे समाज माध्यमांवर फिरत आहेत. कुणी आपल्या पुस्तकांचे फोटो काढून पाठवत आहेत तर कुणी कोणत्या वेबसिरीज, कशा आहेत आणि त्या का पहाव्यात याची माहिती देत आहेत.  काहींनी द. मा. मिरासदार, व. पु. काळे, रत्नकर मतकरी, सुधा मूर्ती, पु. ल. देशपांडे आणि अशा अनेक दिग्गज साहित्यिकांची इ—पुस्तके समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. नाटय़ वेडय़ांनी ‘नाटक.कॉम’ या संकेत स्थळावर प्रेक्षकांसाठी नाटकांचा खजिना खुला केला आहे. ज्याद्वारे प्रेक्षकांना घरबसल्या जुन्या कलाकृती पुन्हा पाहता येतील. तर यु— टय़ूब सारख्या माध्यमावर काय पाहता येईल याबाबतही चर्चा सुरु आहे. यामध्ये नाटक, चित्रपट काही जुन्या विनोदी मालिका किंवा आताच्या नवीन अशायाचाही समावेश आहे. मराठी कलाकरांनीही यात सहभाग घेत घरी बसून वाचन करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.

‘करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासन निर्देशाच्या आधीच आम्ही चित्रीकरण थांबवले होते.  मनोरंजन हे महत्त्वाचे असले तरी सद्य्स्थितीला आरोग्याला प्राधान्य द्ययला हवे. या काळात मालिका, रियॅलीटी शो यांच्या जुन्या भागांसोबातच काही चित्रपटही दाखवले जातील. या भूमिकेला प्रेक्षक सहकार्य करतील अशी आशा आहे.’

— निखिल साने, व्यवसाय प्रमुख. मराठी मनोरंजन वायकॉम १८.