‘हुतात्मा’, ‘बापजन्म’, ‘गोलके री’, ‘एनटीआर महानायाकुडू’ या बहुभाषिक चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारे अभिनेते सचिन खेडेकर ‘इरॉस नाऊ’वरील ‘हलाहल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद..

झिशान कादरी यांच्या लेखणीतून जन्माला आलेली ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ‘हलाहल’ या संस्कृ त शब्दाचा अर्थ विष असा होतो. एका डॉक्टरला काही कारणाने विषप्राशन करावे लागते, अशी कल्पना घेऊन ही कथा बेतण्यात आली आहे. करोनाकाळात ‘ओटीटी’ माध्यमांमुळे का होईना कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आपल्याकडे अजूनही हे माध्यम बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे ‘ओटीटी’वर एवढय़ात निर्बंध नकोत, असे सचिन खेडेकर यांनी सांगितले.

सध्या ‘ओटीटी’वर दाखविण्यात येणाऱ्या आशयात भयपट, लैंगिक दृश्ये, शिवराळ भाषा यांचा अतिरेक होत असल्याने या माध्यमावर निर्बंध आणावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र ‘ओटीटी’ माध्यमावर निर्बंध नसावेत. कु ठल्याही गोष्टीवर जास्त निर्बंध घातल्यास ते मोडणाऱ्यांची संख्याच जास्त असते. आपल्या देशातील ‘ओटीटी’ हे माध्यम अजूनही बाल्यावस्थेत आहे. सध्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी या माध्यमाचा जास्त वापर केला जातो आहे. त्यामुळे प्रयोगशील आणि आता कु ठे आकार घेत असलेल्या या माध्यमावर निर्बंध घालणे योग्य नसल्याचे खेडेकर म्हणाले. गेले कित्येक महिने चित्रपटगृहे बंद असल्याने मनोरंजनविश्वाचा सगळा डोलाराही ‘ओटीटी’ माध्यमांवर आहे. आताच्या घडीला ‘ओटीटी’सारखे दुसरे चांगले माध्यम नाही. ‘ओटीटी’ प्लॅटफॉम्र्सकडून मराठी चित्रपटांनाही पाठिंबा मिळायला हवा, असे मतही खेडेकर यांनी व्यक्त केले. ‘ओटीटी’ प्लॅटफॉम्र्स मराठी चित्रपट विकत घेण्यास रस दाखवत नसल्यामुळे अनेक दर्जेदार चित्रपट अडकू न पडले आहेत. त्यामुळे मराठीत झालेली दोन नवीन ओटीटी प्लॅटफॉम्र्सची घोषणा मराठी चित्रपटांसाठी फायद्याची ठरेल आणि त्यांच्यासाठी प्रदर्शनाची वाट मोकळी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त के ला.

‘हलाहल’ हा त्यांचा नवीन चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होत असून चित्रपटातील भूमिके बद्दल सांगताना ते म्हणाले, यातील मध्यवर्ती म्हणजेच डॉक्टरची भूमिका मी करत असून त्याला भयकथेची पार्श्वभूमी आहे. हरियाणातील रोहतक या छोटय़ाशा शहरात एक डॉक्टर आपल्या दोन मुली आणि पत्नीसोबत आनंदाने राहतो आहे. त्याच्या मोठय़ा मुलीला डॉक्टर व्हायचे असते. भविष्यात आपली मुलगी डॉक्टर बनल्यावर छोटय़ा दवाखान्याच्या जागी मोठे रुग्णालय बांधावे, असे स्वप्न तो उराशी बाळगून असतो. मात्र अचानक एकदा अपघातात मोठय़ा मुलीचे निधन होते. आणि त्या घटनेने डॉक्टरच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते. तो मुलीच्या अपघातामागील रहस्य कसे शोधतो याची ही कथा आहे. या भूमिकेसाठी हरियाणवी भाषेचा लहेजा, ती देहबोली आत्मसात करणे हे मोठे आव्हान होते. ही कथा ऐकल्यावर मी भूमिकेसाठी तात्काळ होकार दिला. ही भूमिका साकारताना संहिता हीच माहितीचा मोठा स्रोत होती.

सध्या अनेक चित्रपट आणि वेब मालिका या सत्य घटनेपासून प्रेरणा घेऊन बनवलेल्या असतात. अशा प्रकारच्या कथा पडद्यावर आणताना यातलं वास्तव प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशा पद्धतीने मांडणं हे लेखक आणि दिग्दर्शकासाठी खरं आव्हान असतं. प्रेक्षकांनाही अशा वास्तव घटनेवर आधारित कथा पडद्यावर पाहायला जास्त आवडतात, असे एका प्रश्नाच्या उत्तरात खेडेकर म्हणाले.

कु ठल्याही एकाच भाषेपुरते, माध्यमापुरते मर्यादित न राहता वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, भूमिकांमधून व्यग्र असणाऱ्या खेडेकर यांनी सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादाबद्दलही नाराजी व्यक्त के ली. मराठी चित्रपटसृष्टीत तर सगळेच कलाकार हे आपल्या क्षमतेवर पुढे आले आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘मला चित्रपटसृष्टीत कुणीही ‘गॉडफादर’ नव्हता आणि नाही. चित्रपटसृष्टीत कठीण परिस्थितीचा सामना करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या कलाकारांची संख्याच जास्त आढळून येते’, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. येत्या काही दिवसांत ऑनलाइन नाटक करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. तसेच टाळेबंदीमुळे तेलुगु, मराठी आणि हिंदी चित्रपटाचे राहिलेले कामही पूर्ण करायचे असल्याचेही ते म्हणाले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे गेले सात महिने चित्रपटगृहे बंद आहेत. नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि निर्मात्यांच्या संघटनांनी सरकारला चित्रपटगृहे सुरू करण्याविषयी निवेदन दिले आहे. करोनामुळे चित्रपट व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांची अवस्था बिकट आहे. कलाकार म्हणून पुन्हा चित्रपटगृहे सुरू करावीत असे मला मनापासून वाटते. सध्या आम्हा कलाकारांना प्रेक्षकांविना कार्यक्रम सादर करावे लागत आहेत. हीसुद्धा परिस्थिती यामुळे टळेल.  

सचिन खेडेकर