खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा. भगवान अर्थात मराठमोळे भगवान पालव यांच्या जीवनावर आधारित ‘एक अलबेला’ हा मराठी चित्रपट तयार झाला आहे. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या अभिनेत्याच्या जीवनावर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल आणि चित्रपटात ‘मा. भगवान’ यांची भूमिका साकारणारा अभिनेता मंगेश देसाई यांच्याशी बातचीत..
काही चित्रपट व त्यातील गाणी ललाटी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, वीस, पंचवीस, पन्नास नव्हे तर साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि चित्रपटाचा ‘नायक’ अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘त्या’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. चित्रपटातील ‘शाम ढले खिडकी तले’, ‘भोली सुरत दिलके खोटे’ ही संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आणि आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटात मा. भगवान आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. शरीराला वेडेवाकडे झटके न देता जागच्या जागी पावले थिरकवत नाचण्याची स्वतंत्र शैली मा. भगवान यांनी निर्माण केली आणि पुढे इतरांनीही त्याचे अनुकरण केले. तो ऐतिहासिक चित्रपट होता ‘अलबेला’. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली मंडळींचे वर्चस्व कमी होत असताना आणि पंजाबी मंडळींचा वरचष्मा वाढत जातानाच्या काळात मराठमोळ्या मा. भगवान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर काही काळ अधिराज्य गाजविले. मा. भगवान यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘एक अलबेला’ चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
‘रचना संसद’ कला महाविद्यालयाच्या चित्रपट विभागाचे संचालक आणि ‘दिग्दर्शन’ या विषयावर व्याख्याने देणारे तसेच ‘जोशी की कांबळे’, ‘निर्माल्य’, ‘माय डीअर यश’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी आता ‘एक अलबेला’च्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले आहे. डॉ. मोनीश बाबरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘एक अलबेला’विषयी बोलताना सरतांडेल म्हणाले, ‘हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या जीवनावर आत्तापर्यंत चित्रपट तयार झालेला नाही. मा. भगवान यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती होती. या माणसाचे जीवन सर्वसामान्य लोकांपुढे चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे, असे मलाही वाटत होते. डॉ. बाबरे यांची भेट झाली. मा. भगवान यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची त्यांचीही इच्छा होती. सर्व गोष्टी जुळून आल्या. चित्रपटाची कथा-पटकथा माझी असून, संवाद मी व अमोल शेटगे यांनी लिहिले आहेत. मा. भगवान यांचे संपूर्ण जीवन यश-अपयश आणि चढ-उताराचे होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कोणत्या घटना, प्रसंग घ्यायचे त्याची खूप काळजीपूर्वक निवड केली. त्यावर कोणी आक्षेप घेणार नाही याची खबरदारी घेतली. या सर्व प्रक्रियेसाठी सात ते आठ महिने लागले.
अभिनेता मंगेश देसाई याच्या निवडीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, एखाद्या अभिनेत्याच्या जीवनावर चित्रपट तयार करणे आणि ज्या अभिनेत्याच्या जीवनावर चित्रपट आहे त्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करणे हे एक मोठे आव्हान असते. भगवानदादा यांच्यावरील चित्रपटात ज्या अभिनेत्याची निवड केली जाईल तो मुळात ‘भगवानदादा’ म्हणून शोभला आणि दिसला पाहिजे. भगवानदादा यांची नृत्यशैली, संवादफेक त्या कलाकाराला जमणे आवश्यक आहे. भगवानदादा आणि मंगेश देसाई यांच्या चेहऱ्यात मला साम्य दिसले होते. त्याची छायाचित्रे मी आमचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांना दाखविली. त्यांनीही आपण प्रयत्न करून पाहू या म्हणून हिरवा कंदील दिला. वेशभूषा व रंगभूषा करून मंगेशची ‘लूक’ टेस्ट झाली आणि आम्ही मंगेशच ‘मा. भगवान’ करणार हे नक्की केले. मंगेशची निवड झाल्यानंतर त्याला बरोबर घेऊन तालीम, अभ्यास सुरू केला. चित्रपटात ‘गीता बाली’ची भूमिका आहे. या भूमिकेसाठी मराठीमधील कोणी अभिनेत्री डोळ्यासमोर दिसत नव्हती. अभिनेत्रीचा शोध सुरू होता. एकदा भट्टे यांनी, काय ‘गीता बाली’ मिळाली का? असे विचारले. मी नाही उत्तर दिले. भट्टे यांनी ‘जासूस’ चित्रपटासाठी विद्या बालन यांची रंगभूषा केली होती. भट्टे यांनी विद्या बालन यांचे वैयक्तिक रंगभूषाकार म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ‘गीता बाली’च्या भूमिकेविषयी विद्या बालन यांना विचारले. त्यांची व माझी भेट झाली. चित्रपटासाठी केलेला अभ्यास व तयारी त्यांना सांगितली. चित्रपटाचा विषय त्यांनाही आवडला आणि ‘गीता बाली’ करायला त्यांनी होकार दिला. हिंदीतील आघाडीची अभिनेत्री पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करणार होती. हिंदीत त्यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्हालाही थोडे दडपण होते. पण सेटवरील त्यांचा वावर सहज असायचा. सर्वाशी मिळून-मिसळून वागायच्या. मी हिंदीतील कोणी तरी मोठी अभिनेत्री आहे, असा गर्व किंवा बडेजाव त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधीही दिसून आला नाही. प्रत्येक प्रसंग चित्रित झाल्यानंतर तो ठीक झाला का, दिग्दर्शक म्हणून तुम्ही समाधानी आहात का? नसाल तर आपण पुन्हा चित्रित करू, असे त्या म्हणायच्या.
‘एक अलबेला’ चित्रपटात मा. भगवान यांच्या तरुणपणाचा काळ, त्यांचा अचानक चित्रपटसृष्टीत झालेला प्रवेश, चित्रपटसृष्टीत त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांना मिळालेले यश, अपयश, त्यांचे कर्तृत्व ते ‘अलबेला’ चित्रपटाची निर्मिती इथपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटापूर्वी मा. भगवान हे ‘अ‍ॅक्शन’ चित्रपटाचे नायक म्हणून प्रसिद्ध होते. राज कपूर यांनी भगवानदादा यांना अ‍ॅक्शन चित्रपटाकडून सामाजिक चित्रपटाकडे वळा, असे सांगितले आणि ते इतके वळले. मा. भगवान यांच्या जीवनात आलेल्या काही व्यक्तिरेखाही चित्रपटात दाखविल्या आहेत. यात ‘राज कपूर’ आणि ‘सी. रामचंद्र’ व अन्य मंडळींचा समावेश आहे. राज कपूर यांच्या भूमिकेसाठी साहिल खान हा नवोदित अभिनेता तर ‘सी. रामचंद्र’ यांच्या भूमिकेत अभिनेता विघ्नेश जोशी आहे. मूळ ‘अलबेला’ चित्रपटातील ‘शोला जो भडके’ आणि ‘भोली सुरत दिल के खोटे’ ही दोन गाणी चित्रपटात घेतली असून काही अन्य गाणी नवीन आहेत. ‘भगवानदादा’ यांच्यासाठी पाश्र्वगायक विनय मांडके यांचा आवाज घेतला असल्याची माहितीही सरतांडेल यांनी दिली.
अभिनेता मंगेश देसाई याने आजवर दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट आणि नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ‘एक अलबेला’मधील त्याला मिळालेली ‘मा. भगवान’ ही भूमिका त्याच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. या भूमिकेमुळे त्याच्या अभिनय प्रवासाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना मंगेश म्हणाला, मी मा. भगवान यांच्यासारखा दिसतो याची जाणीव मला ही भूमिका मिळेपर्यंत झालेली नव्हती आणि आयुष्यात मा. भगवान यांची भूमिका मला करायला मिळेल, असेही वाटले नव्हते. दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी मला मा. भगवान यांच्या भूमिकेविषयी विचारणा केली तेव्हा आपण या भूमिकेला न्याय देऊ शकू का, असा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. पण वेशभूषा आणि रंगभूषेच्या माध्यमातून माझी ‘लूक’ टेस्ट झाली व या भूमिकेसाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही भूमिका मला मिळाली पण आता त्या भूमिकेत शिरून मी ‘मा. भगवान’ वाटणे हे मोठे आव्हान होते. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाच्या आदल्या रात्री मला धड झोपही लागली नाही. माझे पहिले दृश्य पार पडले आणि सगळ्यांकडून मी भगवानदादा यांच्यासारखा दिसतो व त्या भूमिकेत शोभलो म्हणून कौतुक झाले तेव्हा मी निर्धास्त झालो. माझी ही भूमिका जास्तीत जास्त चांगली होण्यामागे दिग्दर्शक शेखर सरतांडेल, रंगभूषाकार विद्याधर भट्टे आणि कॅमेरामन शरद देव्हारे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
भूमिका साकारण्यासाठी केलेल्या तयारीविषयी बोलताना मंगेशने सांगितले, मा. भगवान ही भूमिका साकारताना ती मिमिक्री किंवा अर्कचित्र वाटणार नाही तर मंगेश देसाई हा ‘मा. भगवान’ वाटले पाहिजेत, असे मनाशी नक्की केले. त्यादृष्टीने तयारीला लागलो. मा. भगवान यांच्याविषयी फारशी माहिती, पुस्तके किंवा ध्वनिफिती उपलब्ध नाहीत. त्यामुळे भगवानदादांचा ‘अलबेला’ चित्रपट मिळविला आणि दिवस-रात्र पाहायला सुरुवात केली. त्या दिवसात मी अक्षरश: ‘अलबेला’मय होऊन गेलो होतो. एखादा कलाकार ती भूमिका साकारण्याचा, जिवंत करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. मी पण ती व्यक्तिरेखा पूर्णपणे साकारली जातेच असे नाही. मी माझ्याकडून या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मा. भगवान’ हे अभिनेता आणि त्या पलीकडे जाऊन माणूस, वडील, पती म्हणून कसे वागत असतील याची मी कल्पना केली आणि त्याचा विचार करून भगवानदादा उभे केले. चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर भगवानदादांच्या मुलाने मला या भूमिकेत माझे वडील दिसले, तर नातीने ‘नाना’ पाहायला मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निर्माते आणि कॅमेरामन यांनीही पसंतीची पावती दिली. माझ्यासाठी ती आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. विद्या बालन यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना मंगेश म्हणाला, हिंदीतील मोठी अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक सहकलाकार म्हणून त्यांचे वागणे, बोलणे आणि वावरणे असायचे. आपल्याला चित्रपट मोठा करायचा आहे, माझी भूमिका नाही, या विचारातूनच त्या संपूर्ण चित्रीकरणात सहभागी झाल्या होत्या.
मा. भगवान यांनी संघर्ष करून, प्रचंड मेहनत घेऊन एका जिद्दीने स्वत:ला हिंदी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केले. त्यांचा जीवनपट सगळ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही मंगेशने व्यक्त केला.

एखादा कलाकार ती भूमिका साकारण्याचा, जिवंत करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. पण ती व्यक्तिरेखा पूर्णपणे साकारली जातेच असे नाही. मी माझ्याकडून या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मा. भगवान’ हे अभिनेता आणि त्या पलीकडे जाऊन माणूस, वडील, पती म्हणून कसे वागत असतील याची मी कल्पना केली आणि त्याचा विचार करून भगवानदादा उभे केले. चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर भगवानदादांच्या मुलाने मला या भूमिकेत माझे वडील दिसले, तर नातीने ‘नाना’ पाहायला मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मंगेश देसाई, अभिनेता
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या जीवनावर आत्तापर्यंत चित्रपट तयार झालेला नाही. मा. भगवान यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती होती. या माणसाचे जीवन सर्वसामान्य लोकांपुढे चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे, असे वाटत होते. डॉ. बाबरे यांची भेट झाली. मा. भगवान यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची त्यांचीही इच्छा होती. सर्व गोष्टी जुळून आल्या. मा. भगवान यांचे संपूर्ण जीवन यश-अपयश आणि चढ-उताराचे होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कोणत्या घटना, प्रसंग घ्यायचे त्याची खूप काळजीपूर्वक निवड केली. त्यावर कोणी आक्षेप घेणार नाही याची खबरदारी घेतली.
शेखर सरतांडेल, दिग्दर्शक

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

शेखर जोशी