17 January 2021

News Flash

‘आशयभान हवेच’

मालिकांची पोहोच ही इतर माध्यमांपेक्षा अधिक आहे, याचाही अनुभव आरोहला आला आहे.

निलेश अडसूळ

एकांकिकेतून नाटक, मग मालिका, मग एखादा चित्रपट असा साधारण एखाद्या नटाचा प्रवास होत असतो. पण एकांकिके तील सर्वोत्कृष्ट अभिनयाने तो थेट चित्रपटातच झळकला आणि केवळ झळकला नाही तर कमी कालावधीत प्रेक्षकांची मनेही जिंकली. प्रायोगिक रंगभूमी ते ‘रेगे’ चित्रपटापर्यंतचा प्रवास करणारा हा नट म्हणजे आरोह वेलणकर. ‘रेगे’मधील डॉ. अनिरुद्ध रेगे म्हणून तो आपल्याला परिचित आहेच, परंतु पुन्हा एकदा तो ‘डॉक्टर’च्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या नव्या मालिकेत डॉ. सौरभ साटम या नायकाची भूमिका तो साकारतो आहे. यानिमित्ताने मालिका विश्वात त्याचे पहिले पाऊल पडले आहे.

अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आरोह सांगतो, ‘पुण्यात एमआयटी महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच एकांकिकेतून अभिनयाला सुरुवात केली. पण यात कधी करिअर करेन असा विचारही केला नव्हता. याच दरम्यान करत असलेल्या ‘पेज नोट फाऊंड’ या एकांकिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनयाची राज्यभरातील जवळपास सर्व पारितोषिके मिळाली. याचा परिणाम असा झाला की, २०१२ साली मला थेट ‘रेगे’ या चित्रपटासाठी विचारणा झाली आणि मी होकारही दिला. सुदैवाने माझ्या वाटय़ाला असा उत्तम लेखन-दिग्दर्शन असलेला चित्रपट आला. या चित्रपटाने मला यश दाखवले आणि मी या क्षेत्रातच कारकीर्द घडवण्याचे निश्चित केले.’

छोटय़ा पडद्यावरच्या दैनंदिन मालिका हे असे माध्यम आहे, जिथे एखादा कलाकार घराघरातच नाही तर मनामनात पोहचू शकतो. नाटक आणि चित्रपटानंतर याही माध्यमात काम करण्याची आरोहची इच्छा ‘लाडाची मी लेक गं’च्या निमित्ताने पूर्णत्वास आली. ‘आयुष्यातला पहिला अनुभव हा खासच असतो. मग ते नाटक असो, चित्रपट वा मालिका. या माध्यमाविषयी मला प्रचंड आदर आहे. फक्त योग्य संधीची वाट पाहत होतो. ती मिळाली, त्यातही मुख्य भूमिका. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करणे हाच पर्याय होता’, असं तो सांगतो. मालिकेचे चित्रीकरण अधिक आव्हानात्मक वाटत असल्याचेही तो विशद करतो. त्याच्या मते, ‘दोन्हीकडे कॅमेरा एकच असला तरी चित्रीकरणाची पद्धत वेगळी आहे. चित्रपटात भूमिकेचा अभ्यास, संवाद, स्वत:ची तयारी याला बराच वेळ मिळतो. तालमी होतात. पण मालिकेत मात्र डेडलाइन, क्लोज शॉट, टार्गेट या तत्त्वावर काम करावे लागते. त्यामुळे कमी वेळात ती भूमिका आत्मसात करावी लागते. शिवाय त्या त्या दृश्यात ते ते भाव चेहऱ्यावर आणणे गरजेचे असते. परंतु याच मेहनतीतून आपण घराघरात पोहचत असतो हेही तितकेच खरे’, असे तो सांगतो.

मालिका वर्षभर सुरू राहो किंवा दहा वर्ष, मालिकेतील पात्रांना ‘सातत्य’ जपण्यासाठी आपले शरीर, चेहरा यावर विशेष मेहनत घ्यावी लागते, असे सांगणाऱ्या आरोहने त्यासाठी व्यायाम आणि आहार यांची सांगड घातली आहे. ‘मालिकेचे काम हे जास्त दमवणारे आहे. बारा-बारा तास चित्रीकरण चालते. त्यामुळे ते काम करण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. आपली त्वचा कशी आहे. मेकप केल्यानंतर ती कशी दिसते. त्यावर आपल्याला किती काम करणे गरजेचे आहे, या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ’, असे सांगत सम्यक आहार आणि व्यायामाची गरज यांचे महत्त्व तो पटवून देतो.

मालिकांची पोहोच ही इतर माध्यमांपेक्षा अधिक आहे, याचाही अनुभव आरोहला आला आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात शेवटचे चार आठवडे बाकी असताना तो आला आणि त्याने आपल्या स्वभावाने बिग बॉसच्या घरातल्याच नाही तर टीव्हीपुढे बसलेल्या प्रत्येकालाच आपलेसे केले. ‘बिग बॉसनंतर मला लोकांच्या प्रेमाची कल्पना आली. आणि जर आपण रोज यांना दिसू लागलो तर ते आपल्यावर किती प्रेम करतील याचा अंदाज आला. तेव्हापासून मालिकेचा ध्यास होता. म्हणून या प्रवाहाकडे वळलो’, असे तो सांगतो.

* ‘वीर’ची निर्मिती

मराठी नाटकांना ‘जाणता राजा’सारख्या महानाटय़ाचीही परंपरा आहे. भव्यदिव्य नेपथ्य, त्या काळाशी जोडू पाहणारा जिवंतपणा अशी बरीच वैशिष्टय़े असणारे ‘वीर’ हे महानाटय़ लवकरच रंगभूमीवर येणार असल्याचे आरोहने सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारलेले हे नाटय़ असून याचे दिग्दर्शन तो स्वत: करत आहे.

* समृद्धतेकडे वाटचाल..

नव्या कलाकारांचा वेबमालिके कडे अधिक कल दिसून येतो आहे. नवनवीन आशय, सेन्सॉरची कात्री नसल्याने आलेला जिवंतपणा त्यामुळे कलाकारांना काम करायला त्यात बरीचशी मुक्तता आहे. आरोह वेलणकरही लवकरच वेबमालिके त दिसणार आहे. कदाचित तिथेही त्याच्या अभिनयाची छाप पडेल, परंतु अभिनयाआधी तो लेखक म्हणून समोर येणार आहे. सध्या एका वेबमालिके चे लेखन सुरू असल्याचे त्याने सांगितले.

* कलाकारांची खंत..

‘रेगे’ या चित्रपटानंतर आरोहने जवळपास पाच चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यातील बरेचसे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. हल्ली अशाही चित्रपटांचे प्रमाण वाढले आहे. जे अंतिम टप्प्यात येऊन बारगळतात. परंतु अशा घटनांचा कलाकारांच्या मनावर आणि कारकीर्दीवर नकारात्मक परिणाम होत असल्याची खंत आरोह व्यक्त करतो. त्याच्या मते, ‘कोणताही कलाकार एखादी भूमिका साकारताना त्यात जीव ओतून काम करत असतो. अर्थात ते लोकांसमोर यावे हाच त्यामागे उद्देश असतो. परंतु आपण आपल्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतानाच काही तांत्रिक, आर्थिक कारणांमुळे चित्रपट रद्द होतात. त्यावेळी मात्र धक्का बसतो. पण हरकत नाही, याच अनुभवातून वाट काढत आपल्याला पुढे जायचे आहे.’

*  स्वनियंत्रण गरजेचे

वेबमालिका हे माध्यम माझ्या आवडीचे आहे. ते माध्यम मुक्त आहे हे त्याचे वैशिष्टय़ असले तरी किती वाहवत जायचे हे आपल्या हातात आहे. आपण काय दाखवणार आहोत किंवा करतो आहोत याचे भान आपल्याला हवे. त्यासाठी सेन्सॉर बोर्डाची गरज नाही. सध्या जे दाखवतात त्यावर माझा आक्षेप मुळीच नाही कारण तेही पाहणारा प्रेक्षकवर्ग आहे, त्यामागे आर्थिक गणिते आहेत. परंतु मला जे दाखवायचे आहे ते निश्चितच प्रत्येकाला पाहावेसे वाटेल असे असेल, असे तो ठामपणे सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:17 am

Web Title: chat with marathi actor aroh welankar zws 70
Next Stories
1 समाजमाध्यम   नको रे बाबा..!
2 अनवट साय-फायपट!
3 सध्या घरोघर बिग बॉसचाच खेळ!
Just Now!
X