विक्रम पाटील आणि सायली बांदकर यांना अभिनयाचा पुरस्कार; ‘संगीत-घागरे के पीछे’ला प्रेक्षक पसंती

‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या ‘सवाई ’ एकांकिका स्पर्धेत मध्यमवर्गीय कुटुंबाची समस्या मांडणाऱ्या सिडनेहॅम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ या एकांकिकेला परीक्षकांनी पहिला क्रमांक जाहीर केला. तर  रुईया महाविद्यालयाची ‘संगीत-घागरे के पिछे’ ही एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

पुण्याच्या समर्थ अकादमीच्या ‘सेकंड हॅन्ड’ एकांकिकेतील संजय ही भूमिका वठवणाऱ्या विक्रम पाटीलला सवाई अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला, तर निर्वासितमधील आईची भूमिका साकारणाऱ्या सायली बांदकरने सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने ‘म्याडम’, मुंबईच्या नाटय़कीर्ती संस्थेने इव्होल्युशन अ क्वेश्चन मार्क आणि मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयाने ‘शुभयात्रा’ ही एकांकिका सादर केली होती, पण या तिन्ही एकांकिकांना एकही पारितोषिक मिळवता आले नाही.

गेले काही वर्ष एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य आढळून येत आहे. जे या स्पर्धेतील एकांकिकांमध्येही पाहायला मिळालं. ज्या मुलीबरोबर आपला शरीरसंबंध आला तीच जर लग्नासाठी सुचवली गेली तर पाहण्याच्या कार्यक्रमात मुलाचा काय गोंधळ उडेल.. मुलाने लग्नापूर्वी संबंध ठेवले तरी चालतील, पण मुलीने नाही, अशा जुनाट विचारांमध्ये गुरफटलेला मुलगा. पण ती मुलगी त्याचे मतपरिवर्तन करते आणि सारे काही आलबेल होते, अशी गोष्ट होती ती सेकंड हॅन्ड या एकांकिकेची. म्याडम, या एकांकिकेमध्ये आपल्या मुलीला शिकवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या आईची गोष्ट दाखवली गेली होती. आपल्या मुलीने शिकावं, ‘म्याडम’ व्हावं यासाठी झटणारी आई या एकांकिकेत रेखाटली होती.

मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन पिढय़ांमधील फरक निर्वासित या एकांकिकेत दाखवला होता. एका पालिका कर्मचाऱ्याच्या घरात मुलगा आणि वडील यांच्या भविष्यातील विचाराबाबतच्या मतांमधला फरक यात मांडण्यात आला होता.

इव्होल्यूशन अ क्वेश्चन मार्क  या एकांकिकेमध्ये एका आदिवासी बेटावर अपघाताने एक नवीन जोडपं येतं, त्यातल्या नवऱ्याला आदिवासी ठार मारतात, पण ते त्याच्या बायकोला मारत नाहीत, ते का.. या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही एकांकिका पाहायला हवी. ही एकांकिका म्हणजे एक वेगळाच प्रयोग होता. मुंबईतील ट्रेनमधील गर्दी आणि एल्फिन्स्टन स्थानकावर झालेली चेंगराचेंगरी यावर शुभयात्रा ही एकांकिका बसवण्यात आली होती. सॉरी परांजपे या एकांकिकेमध्ये पुण्यातील पुतळ्याचा विटंबनेचा विषय फार खुबीने हाताळण्यात आला होता. कौमार्यभंग चाचणी  हा विषय घेऊ न ‘संगीत-घागरे के पिछे’ ही एकांकिका गुंफली होती. या एकांकिकेतील संगीत चाहत्यांच्या पसंतीस उतरले, मात्र या एकांकिकेचा शेवट अंगावर येणारा होता.

सविस्तर निकाल

  • प्रथम एकांकिका : निर्वासित, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई.
  • द्वितीय एकांकिका : सॉरी परांजपे, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे.
  • प्रेक्षक पसंती पात्र एकांकिका : संगीत-घागरे के पिछे, रामनारायण रुईया महाविद्यलय, मुंबई.
  • सर्वोत्तम लेखक : स्वप्निल जाधव, निर्वासित.
  • सर्वोत्तम दिग्दर्शक : अभिजित झुंजारराव, निर्वासित.
  • सर्वोत्तम अभिनेता : विक्रम पाटील, सेकंड हॅन्ड.
  • सर्वोत्तम अभिनेत्री : सायली बांदकर, निर्वासित.
  • सर्वोत्तम नेपथ्यकार : सानिक, निर्वासित.
  • सर्वोत्तम प्रकाश योजनाकार : श्याम चव्हाण, संगीत- घागरे के पिछे.
  • सर्वोत्तम ध्वनिसंयोजक : आदिनाथ पाटकर, संगीत- घागरे के पिछे.