पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं त्यानंतर या चित्रपटातील एकही फोटो समोर आले नव्हते. बऱ्याच महिन्यांनंतर पहिल्यांदा या चित्रपटातील अभिनेता विवेकचे लूक्स समोर आले आहेत. विवेक या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटातले विवेकचे काही फोटो शेअर आहेत. या फोटोंमध्ये मोदींची भूमिका साकारत असलेला विवेक वेगवेगळ्या वेशात दिसत आहे. विवेकच्या या लूक्सवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात १९५७ ते २०१९ पर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. या काळात मोदींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. ‘या चित्रपटासाठी १५ लूक टेस्ट देणं गरजेचं होतं. यासाठी विवेकला दिवसातून किमान सात आठ तास मेकअपसाठी बसावं लागत होतं. त्यानं दाखवलेला संयम कामालीचा होता. विवेक ही भूमिका खूप उत्तमप्रकारे करू शकतो अशी मला खात्री होती म्हणूनच या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आल्याची माहिती कास्टिंग प्रोड्यूसर संदीप सिंग यांनी दिली.