अभिनेता सैफ अली खानच्या आगामी ‘शेफ’ चित्रपटाचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. याआधी आज सकाळीच चित्रपटाचा पहिलाच पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलेला. काम आणि मुलावर असलेले प्रेम यांच्यामध्ये तारेवरची कसरत करणारा सैफ यात दिसतो. चित्रपटात सैफच्या मुलाची भूमिका मुंबईच्या स्वर कांबळे या मुलाने साकारली आहे. आपल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्याच्यासोबत वेळ घालवण्याकरिता काहीही करण्यासाठी तयार असलेल्या वडिलांच्या भूमिकेत सैफ दिसतो. ‘शेफ’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा आहे.

वाचा : केदार शिंदेची पहिली हिंदी मालिका ‘क्या हाल मिस्टर पांचाल’

सैफने स्वतःला भूमिकेत झोकून दिल्याचे ट्रेलरमध्ये पाहावयास मिळते. आपल्या मुलाच्या आणखी जवळ जाण्यासाठी सैफ त्याच्यासोबत एका ट्रिपला जाण्याचे ठरवतो. या ट्रिपमध्ये तो विविध ठिकाण आणि तेथील खाद्यसंस्कृतीची तो आपल्याला मुलाला ओळख करून देतो. चित्रपटातील इतर पात्रंही मनोरंजक असल्याचे दिसते. सैफ अली खानचा हा चित्रपट जॉन फेव्हर्यूने याच्या ‘शेफ’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक असून येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होईल. ‘शेफ’ चित्रपटाने अभिनेत्री पद्मप्रिया जनकिर्मन ही पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. यात ती सैफच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.

वाचा : आता सलमानसोबत ‘रेस’ लावणार अमिताभ बच्चन

राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित ‘शेफ’ चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि ‘बांद्रा वेस्ट पिक्चर्स’ यांनी केलीये. २०१४ साली प्रदर्शित झालेला ‘शेफ’ हा मूळ हॉलिवूड चित्रपट एका व्यावसायिक शेफवर आधारित होता. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तो नामांकित रेस्तराँमधील नोकरी सोडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव आणि स्वतःचे हॉटेल सुरु करताना होणारा आनंद यात चित्रीत करण्यात आलेला.