चेतन आनंद दिग्दर्शित हिमालय फिल्म्सचा ‘हकिकत’ (१९६४) हा आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट मानला जातो. या चित्रपटाचे हे पन्नासावे वर्ष असून, १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चेतन आनंद यांनी ‘हकिकत’ घडवला आणि रसिकांना प्रचंड भावलादेखील.
युद्धपट म्हणजे फक्त युद्धाचे थरारक प्रसंग नव्हे तर त्यासह भावनिकता, नातेसंबंध व उत्कट गीत-संगीत हेदेखील हवे. या स्वरूपाचे भान चेतन आनंद यांनी ठेवले म्हणूनच तर हा चित्रपट खूपच प्रभावी ठरला. युद्धपटातही दिग्दर्शक दिसतो असे आवर्जून म्हणायला हवे, असे या चित्रपटाचे सादरीकरण झाले.
चित्रपटातील प्रमुख पात्रे मेजर रणजीत सिंग(बलराज साहनी) मेजर प्रताप सिंग (विजय आनंद) मेजर बहादूर सिंग (धर्मेंन्द्र), (प्रिया राजवंश). चित्रपटाचे छाया-दिग्दर्शन सदानंद यांचे होते व कृष्णधवल स्वरूपातील या चित्रपटात ते रंग भरण्यात विशेष यशस्वी ठरले. तर संकलन जाधव राव यांचे होते. युद्धाच्या दृश्यांची काटछाट व जोडणी हे कसब खूप महत्वाचे असते. ते जमले नाही तर लुटूपुटूची लढाई ठरण्याची दाट शक्यता असते.  कैफी आझमीची गीते व मदन मोहनचे संगीत ही या चित्रपटाची खूपच मोठी ताकद ठरली. युद्धपटातही गाण्याला स्थान मिळते व त्यातून दर्जा सिद्ध करता येतो, हेदेखील हिंदी चित्रपटाचे वैशिष्ट्य! होके मजबूर मुझे, कर चले हम फिदा, जरा सी आहट, मस्ती मे छेडे तराना या गाण्यांचा मुखडा सहजपणे गुणगुणला जातो, यातच त्याचा दर्जा स्पष्ट होतो. या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वर्षानंतरही ही गाणी तेवढीच तजेलदार वाटतात.
चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण त्याचे संगीत वगळता ( ते मदन मोहनचे होते) त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. दरम्यानच्या काळात ‘फौजी’, ‘मेरा देश मेरा धरम्’, ‘आक्रमण’, ‘डाकू और जवान’ इत्यादी बरेच चित्रपट आले. पण सर्वात प्रभावी जे.पी.दत्तांचा ‘बॉर्डर’ ठरला.१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारित होता. त्यातील ‘संदेसे आते है’ हे जावेद अख्तर लिखित व अन्नू मलिकने स्वरबद्ध केलेले गाणे आजही लोकप्रियता टिकवून आहे. त्यानंतर जे.पी. दत्तांनी मोठ्या मेहनतीने ‘एल.ओ.सी.’ हा चित्रपट बनवला, पण तो अगदीच निष्प्रभ ठरला.
हिंदी युद्धपटाची एकूणच वाटचाल पाहता, त्यात चेतन आनंदचा ‘हकिकत’ सर्वोत्तम. तोदेखील ‘मुगल-ए-आझम’, ‘नया दौर’ यांच्याप्रमाणे रंगात तयार केला आहे. पण युद्धपटाचा खरा थरार कृष्ण-धवल स्वरुपातच आहे.