टाटा ग्रुपच्या मालकीच्या दागिण्यांच्या तनिष्क या ब्रॅण्डची नवी जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य या जाहिरातीमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर या जाहिरासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच या जाहिरातीमधून लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार होत असल्याचं सांगत अनेकांनी त्यावर टीका केली. दरम्यान लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी तनिष्कला पाठिंबा देत टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.

नुकताच चेतन भगत यांनी ट्विट केले असून त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘प्रिय तनिष्क, जे लोकं तुमच्यावर हल्ला करत आहेत ते तुमचे दागिणे खरेदी देखील करु शकत नाही आणि त्यांचे विचार अर्थव्यवस्था कुठपर्यंत घेऊन जातात हे पाहण्यासारखे आहे. त्यांच्याकडे येत्या काळात नोकरी नसणार. त्यामुळे भविष्यात असे लोकं तनिष्कमधून काही खरेदी करु शकणार नाहीत. तुम्ही काळजी करु नका’ या आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केले आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये?

एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन हॅशटॅग BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे.