उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ या चित्रपटानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना उत्तराखंडच्या महिला व बाल विकास मंत्री रेखा आर्या म्हणाल्या, “राज्यातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी दरमहा पाच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्यासंदर्भात सरकार नियोजन करत आहे. त्यामुळे अॅसिड पीडितांना त्यांचं पुढील जीवन सन्मानानं जगता येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पेन्शनबद्दलचा प्रस्तावाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

उत्तराखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर मेघना गुलजार यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत चित्रपट तयार करण्याचा उद्देश सार्थकी लागला, असं म्हटलं आहे.


दरम्यान, ‘छपाक’ हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.