News Flash

शिवविचार!

मराठी माणूस या जगात कुणाचे ऐकतो, तर ते फक्त महाराजांचे.

|| निलेश अडसूळ

ज्या राजाने इथल्या मातीचे सुराज्य केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही मराठी मुलखासाठी स्वर्गाहून सुंदर गोष्ट होती. त्या राज्याभिषेक सोहळ्याचा दिमाख, दिव्यता ही आपल्या कल्पनेपलीकडची आहे. इथे प्रत्येकाला वाटते की आपण त्या काळी महाराजांचे मावळे असायला हवे होतो, पण आजही आपल्याला त्यांचे मावळे होऊन जगता येईल, ते त्यांच्या विचाराने. किंबहुना आजच्या समाजात हा ‘शिवविचार’ रुजवण्याची अधिक गरज आहे. आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ज्या कलाकारांना भूमिकेच्या निमित्ताने महाराज जगता आले, त्यांचे विचार अंगीकारता आले अशा कलाकारांच्या मनातील ‘शिवविचार’ जाणून घेण्याचा प्रयत्न…

‘जाणता राजा’ हाच शिवविचार

‘राजा’ म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे अगदी बालपणापासून आपल्या मनात रुजले गेले आहे. जिजाऊच्या संस्कारात घडलेल्या महाराजांनी पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. इतक्या कमी वयात इतके बळ महाराजांना देणाऱ्या जिजाऊच्या संस्कारांची ही ताकद आहे, त्याचेही आज स्मरण व्हायला हवे. शिवविचार आपल्या मुलात रुजवण्यासाठी प्रत्येक पिढीतल्या बाळाला आई महाराजांच्या गोष्टी सांगते. लहानपणी जेव्हा चित्रपटातून महाराज पाहिले, पुस्तकातून वाचले त्या वेळी राज्याभिषेक सोहळा किती भव्य झाला असावा याची केवळ कल्पना करू शकलो. त्याच कल्पनेच्या आधारावर ‘हिरकणी’ चित्रपटात राज्याभिषेकाचे गाणे आम्ही चित्रित केले. महाराज केवळ राज्यकर्ते नव्हते, तर लोकांमध्ये जाऊन ते स्वत: त्यांचे दु:ख, व्यथा जाणून घेत असत. हे ममत्व, ही आपुलकी हा शिवविचार आहे. हिरकणी पहिल्यांदा महाराजांसमोर येते तेव्हा ते तिला ‘आई’ म्हणून साद घालतात. एका अनोळखी स्त्रीला आई म्हणणे हा शिवविचार आहे. त्या प्रसंगानंतर महाराजांनी त्या घटनेचा भावनिक, राजकीय, प्रजेच्या, सुरक्षेच्या सर्व बाजूने चौकस विचार करून एकीकडे हिरकणीचा सन्मान केला तर दुसरीकडे त्या मार्गावरून शत्रू वर येऊ नये म्हणून तिथे बुरूजही बांधला. ही दूरदृष्टी महाराजांकडे होती. आज महाराज असते तर महाराष्ट्राचे चित्र खूप वेगळे असते. ज्यांचा प्रत्येक विचार हा अंगीभूत करण्यासारखा आहे. असा हा ‘जाणता राजा’ हाच एक शिवविचार आहे.  – प्रसाद ओक

‘शिवविचार कृतीत आणावा’ 

मराठी माणूस या जगात कुणाचे ऐकतो, तर ते फक्त महाराजांचे. हा एकच विचार चित्रपटात महाराजांची भूमिका साकारताना माझ्या मनात होता. महाराजांवर आपली प्रचंड निष्ठा असते, पण त्यांचा एकही विचार आपण अंगी बाणवत नाही, हे आपले दुर्दैव आहे. इतका मोठा आदर्श आपल्यापुढे असताना, त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालवू शकलो नाही. एकेकाळी अटकेपार झेंडे लावलेले आपण आता कुठे आहोत. मराठी माणसाने भारतात चित्रपट आणला, पण आज मराठी चित्रपट कुठे आहेत. आज प्रत्येक प्रसंगात आपल्याला महाराजांची आठवण करून द्यावी लागते, जाणीव करून द्यावी लागते की कुठे होतो आपण. आज आपल्याला शिवविचारांवर चालायची गरज असतानाही आपण त्यापासून दूर गेलो आहोत. संघटित व्हा आणि लढा, हा एक महत्त्वाचा विचार त्यांनी आपल्यात रुजवला. या एकत्र येण्याच्या विचाराचाही आज आपल्याला विसर पडला आहे. पण अशी स्वातंत्र्य बेटे उभारून यशस्वी होणे फार कठीण असते. हा शिवविचार महाराजांचे नाव इथे-तिथे देऊन समाजमनात रुजणार नाही. त्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून कृती व्हायला हवी. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा तिथे रुग्णालय बांधून त्याला महाराजांचे नाव दिले तर ते जगापुढे आदर्शाचे ठरेल. – महेश मांजरेकर

‘चिरंतन चैतन्य’

महाराजांनी दिलेले शिवविचार हे चिरंतन चैतन्य आहेत. त्याला आपण जितक्या प्रामाणिकपणे साद घालू ते तितक्या उत्कटतेने आपली साथ देतात. केवळ डोक्यावर घेऊन मिरवले म्हणजे महाराज कळले, असे नाही तर मनापर्यंत त्यांचे विचार पोहोचायला हवेत. अठरापगड समाजाला एकत्र घेऊन विधायक कामे करणारा हा राजा आपल्यापुढील सर्वात मोठे आदर्श आहे. त्यांची दिव्यता इतकी आहे की आज ३५० वर्षांनंतरही मनामनात असलेले महाराजांचे स्थान तसूभरही हलले नाही. स्वत:आधी समाजाचा विचार करणे, ही शिकवण त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून समोर येते. तसेच कोणतेही काम करताना स्वराज्याचे नैतिक अधिष्ठान ढळू न देणे आणि प्रत्येक कृतीत लोककल्याण असणे, हा शिवविचार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आज राजकीय आणि कला क्षेत्रात काम करताना याच विचारावर मीही चालण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराजांची भूमिका करणारा प्रत्येक नट हा भाग्यवानच आहे. कारण अभिनय करताना तो महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर शिवविचारांचा प्रभाव त्याच्यावर पडतोच. – अमोल कोल्हे

‘ते माझे दैवतच’ !

महाराजांची भूमिका एकदा नव्हे तर तीनदा मला साकारायला मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. लहानपणापासूनच महाराज हे केवळ राजे नव्हे तर ते माझे ‘दैवत’ आहेत. त्यांची चरित्रे, कथा वाचताना त्यांच्या कार्याची उंची अनन्यसाधारण असल्याची जाणीव आपल्याला वारंवार होते. हे शिवप्रेम माझ्यात केवळ भूमिकेसाठी रुजलेले नाही तर गिरगावात घडलेल्या संस्कारातूनच महाराजांच्या विचारांचे बाळकडू मला मिळाले आहे. शिवविचार म्हणजे काय याचे एकच उत्तर आहे, ‘जाणता राजा…’. त्यामुळे जाणता राजा म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. ज्याने आपली जबाबदारी स्वीकारली आहे, जो पालक म्हणून आपले संगोपन करत आहे तो हा जाणता राजा आहे. एका राजाच्या ठायी असलेले पालकत्व आपल्यालाही आपल्या क्षेत्रात नेतृत्व करताना ‘पालक’ म्हणून सगळ्यांना सामावून घेण्याचा विचार देते. यश मिळवणे आणि ते टिकवणे, ते करताना जाती-पाती, भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन विचार करणे, ही त्यांची शिकवण आहे. महाराजांचे अनेक निर्णय आजही आपल्याला काळाच्या पुढचे वाटतात, ही दूरदृष्टी अंगीकारता यायला हवी. माझ्या भूमिकेच्या यशामागे मला मार्गदर्शक म्हणून लाभलेला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचा मोठा वाटा आहे. महाराजांचे प्रताप कथारूपाने आजवर अनुभवले भूमिकेच्या निमित्ताने ते विचाररूपाने जगता आले ही बाब महत्त्वाची.    -चिन्मय मांडलेकर

‘ऐसे नेतृत्व होणे नाही…’

भूमिकेदरम्यान महाराज वाचताना त्यांच्या नेतृत्वातील नाना पैलू पाहून मला स्तिमित व्हायला झाले. महाराज ‘महाराज’ का आहेत, आपण आजही त्यांना का मानतो याची जाणीव या प्रवासात आली. त्यांचे शौर्य, गनिमी कावा आपल्याला माहिती आहेच, पण त्यांचा आपलेपणा, साधेपणा हा खरा शिवविचार वाटतो मला. माणूस म्हणून माणसाला सुखाने जगता यावे यासाठी लढा देणारा हा राजा महाराष्ट्रासाठी सूर्य ठरला. त्या काळी महिलांनाही आदराचे स्थान देणे, त्यांचा सन्मान करणे हे आजच्या जगाला दिशा दाखवणारे आहे. नेतृत्व करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, साकल्याने आणि चौकस पद्धतीने विचार करून प्रत्येकाला न्याय मिळवून देणे आणि तो देताना वेळ लागला तरी चालेल पण कुणावरही अन्याय होता कामा नये, ही भावना जोपासणे. हे खरे नेतृत्व आहे. जातीपातींचा, लिंगभेदाचा विचार मोडून ज्यांनी प्रत्येकाला जवळ केले, त्या राजाच्या महाराष्ट्रात आज जातीपातींचे राजकारण होत असताना खेद वाटतो. महाराजांच्या कथा वाचताना आपण अवाक होतो, अचंबित होतो. पण त्यांनी केलेले अचूक नियोजन, चौकस विचार, शौर्य आणि प्रत्येकाला सामावून घेण्याचा विचार हे पाहता ऐसे नेतृत्व पुन्हा होणे नाही, इतकेच वाटते.    – शंतनू मोघे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:04 am

Web Title: chhatrapati shivaji maharaj coronation ceremony shiv vichar akp 94
Next Stories
1 केवळ जुन्या जाणत्यांच्या जिवावर…
2 स्वामी साकारताना…
3 संजीवनीचा खाकी साज
Just Now!
X