टेलिव्हिजनवरून घराघरात पोहचलेली अभिनेत्री छवी मित्तलने तिच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. टेलिव्हजनप्रमाणेच तिने सोशल मीडियावर राज्य करत ती सोशल मीडियावरील स्टार झालीय. गेल्या काही वर्षात तिने तिच्या अभिनयासोबतच व्यावसायिक कौशल्यानेदेखील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. मात्र तरीही छवीला सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

नुकतच एका महिलेने छवीला तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवरून ट्रोल केलंय. मात्र छवीनेदेखील या महिलेला सडेतोड उत्तर दिलं आहे. छवी सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. यात जाहिरातींसोबतच ती फिटनेसचे व्हिडीओदेखील शेअर करते. नुकतच एका महिलेने छवीला प्रश्न विचारला आहे, “तू व्हिडीओ बनवत असताना तुझी मुलं कुठे असतात? हो कदाचित नोकरांसोबत! तू काही सुपरवुमन नाही, दिखावू” अशी कमेंट करत एका महिलेने छवीला ट्रोल केलं.

छवी मित्तलने या महिलेने केलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत तिला उत्तर दिलं आहे. हा प्रश्न तिला 14 दिवसांचा तिने तयार केलेल्या डीटॉक्स डाएट व्हिडीओत विचारण्यात आल्याचं तिने सांगितलं. यावर माझं उत्तर , “मी रात्री 11 वाजता हे व्हिडीओ शूट करते, ऑफिसची आणि घरातील सर्व कामं उरकून, मुलांना झोपवून मला माझा वेळ मिळतो तेव्हा मी हे करते. शूट करण्यासाठी मला फक्त 15 मिनिटं लागतात, कारण मला फार काही पाठांतर करावं लागत नाही किंवा तयारी करावी लागत नाही मी जे काही आहे ते मनापासून बोलते. हे माझं यासाठी उत्तर आहे.” असं म्हणत छवीने ट्रोल करणाऱ्या महिलेची बोलती बंद केली आहे.

मात्र एवढ्यावर छवी थांबली नाही. पुढे तिने समाजात ज्या महिला इतर महिलांच्या कामावर बोट दाखवून टीका करतात त्यांनाही उत्तर दिलंय. ती म्हणाली, ” हा प्रश्न शेअर करण्याच कारणं म्हणजे खरं तर स्वत:ला प्रश्न विचारणं आहे. एखादी आई इतर मातांचं खच्चीकरण करणं केव्हा थांबवेल? नोकरी किंवा काम कऱणाऱ्या मातांना कमी लेखणं किंवा त्यांना पारखणं कधी थांबणार?. ” असा सवाल छवीने महिलांना विचारला आहे. काम करणाऱ्या महिला मुलाचं भवितव्य धोक्यात घालत नसून त्या मुलांसाठी उत्तम उदाहरण ठरत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

वाचा : “दिशा आली तर ठिक नाही तर ..”, दयाबेनच्या वापसीवर असित मोदीं म्हणाले..

छवीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. छवीने मोहित हुसेन यांच्याशी विवाह केला असून त्यांना दोन मुलं आहेत.