दिवसाला सहा तासांचे प्रसारण, आठवडय़ाला एक नवाकोरा एपिसोड, अवघ्या पाच वर्षांत १४८ एपिसोड्स, टीव्हीसाठी बनवण्यात आलेले १० अॅनिमेटेड चित्रपट, थिएटरसाठी केलेला चित्रपट आणि कोटय़वधींची उलाढाल.. हा सगळा प्रवास आहे ‘छोटा भीम’ या सध्या बच्चेकंपनीत प्रचंड लोकप्रिय असलेल्या अॅनिमेटेड मालिकेचा. ‘पोगो’ वाहिनीवर येणाऱ्या ‘छोटा भीम’ या मालिकेने बच्चे कंपनीवर एवढे गारूड केले आहे की टीआरपीत डिज्नीच्या ‘डोरेमॉन’ या अॅनिमेटेड व्यक्तिरेखेला ‘छोटा भीम’ने मागे टाकले आहे. एवढेच नाही तर आज ‘छोटा भीम’चे कपडे, खेळणी, बिस्कीटे, जाहिराती अशी एकेक बाजारपेठ काबीज करणारी चिलाकांची ‘ग्रीन गोल्ड’ कंपनी भीमच्या जोरावर १५ कोटींची उलाढाल करते आहे.
‘छोटा भीम’ एवढा मोठा ब्रँड झाला, याच्यावर माझा स्वतचा अजूनही विश्वास बसत नाही, ‘छोटा भीम’चे कर्तेकरविते राजीव चिलाका यांची ही पहिली प्रतिक्रिया. मुलांसाठी अॅनिमेशन करत असताना ते भारतीय तत्त्व, संस्कार यांची जपणूक करणारेच असायला हवे हा आमचा पहिल्यापासूनचाआग्रह होता. आपल्याकडे पाहिल्या जाणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांमध्ये भारतीय अॅनिमेटेड व्यक्तिरेखा अभावानेच आढळून येतात. आम्ही पहिल्यांदा ‘विक्रम वेताळ’ ही मालिका सुरू केली. पण, ती मालिका प्रसारित झाल्यानंतर विक्रम-वेताळाच्या गोष्टी या लहान मुलांसाठी नाही त्या मोठयांसाठीच आहेत, याची जाणीव झाली. कृष्णाला घेऊन मालिका काढायचा विचार केला. त्यावेळी लक्षात आले की १७ अॅनिमेटेड कंपन्या कृ ष्णावर काम करत आहेत. आम्ही नविन काय देणार होतो. मग, महाभारतातला भीम तसा आपल्याला जवळचा, त्याच्यावरून प्रेरणा घेऊन नऊ वर्षांचा छोटा भीम आम्ही तयार केला. म्हणजे आत्ता जो भीम दिसतो आहे त्यासाठी पहिल्यांदा ३० ते ४० डिझाईन्स तयार करण्यात आले होते, अशी माहिती चिलाका यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
‘छोटा भीम’ हा भारतीय मातीतला आहे, त्याला पौराणिक संदर्भही आहे पण, तो विचार मात्र आजच्या काळाप्रमाणे करतो. म्हणूनच देशभरातील बच्चेकंपनीला तो आपलासा वाटत असावा. आज आमच्या कंपनीत शंभर अॅनिमेशन तज्ञ फक्त भीमवर काम करत असतात, असे चिलाका यांनी सांगितले. छोटा भीमच्या लोकप्रियतेमुळे त्याचा प्रसारणाचा वेळही वाढला आहे. दिवसाला सहा तास ही मालिका प्रसारित केली जाते. गेल्यावर्षी पहिल्यांदाच ‘छोटा भीम आणि कर्स ऑफ दमयान’ असा पूर्ण लांबीचा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने ४.९ कोटींची कमाई के ली. लवकरच दुसराही चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस चिलाकांनी व्यक्त केला. ‘छोटा भीम’ला ब्रॅंडचे मूल्य प्राप्त झाले आहे, त्यामुळे त्याचे कपडे, खेळणी अशा वस्तू बाजारात येऊ लागल्या आहेत. या शिवाय, लवकरच छोटा भीमचे बिस्कीटही बाजारात येणार असून ज्या टुनटुन मौसीचे ‘लडडू’ खाऊन भीम अचाट करामती करत असतो तो ब्रॅंडेड लाडूही मुलांना लवकरच खायला मिळणार आहे.