करोनाचा फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने भारताने १४ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवलेला आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पाही संपण्याच्या जवळ आला आहे. अनेकांना ३ मे नंतर आयुष्य पुन्हा एकदा सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सध्या करोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले जात आहे. अशातच एका अभिनेत्रीवर लॉकडाउनचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘छोटी सरदारनी’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री अनीता राज आणि तिचा पती यांनी लॉकडाउनमध्ये घरी पार्टी आयोजीत केल्याचे म्हटले जात आहे. या पार्टीमध्ये त्यांच्या जवळील लोकांनी हजेरी लावली असल्याच्या देखील चर्चा सुरु आहेत. अनीताने पार्टीचे आयोजन केल्याची माहिती त्यांच्या इथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली. पण या सर्व अफवा असल्याचे अनीताने म्हटले आहे.

या संदर्भात अनीताने पुणे मीररशी संवाद साधला. त्यावेळी तिने, ‘माझा पती एक डॉक्टर आहे. त्याचे मित्र एका मेडिकल इमरजंसीसाठी घरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती. माझे पती माणुसकीच्या नात्याने त्यांना नकार देऊ शकले नाहीत. पोलिसांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याने ते घरी आले होते. पण या संदर्भात चौकशी केल्यानंतर त्यांना सत्य कळाले’ असे म्हटले आहे.

सध्या देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली. मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.