मराठी सिनेमांची संहिता कधी कोणत्या विषयावर भाष्य करेल काही सांगता येत नाही. नेहमीच नवीन संकल्पना मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा ‘चि. व चि.सौ.का.’ सिनेमाचा ट्रेलर पाहताना येतो. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
आपल्या मुलांच्या अरेन्ज मॅरेजसाठी भेटलेली दोन कुटुंब आणि कांदे पोह्यांपासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत घडणाऱ्या गमतीशीर घडामोडी म्हणजे ‘चि. व चि.सौ.का.’ या सिनेमाचा ट्रेलर. मृण्मयी गोडबोले म्हणजे सावित्री यात प्राण्यांची डॉक्टर दाखवण्यात आली आहे तर ललित प्रभाकर म्हणजेच सत्या याची सौरयंत्र बनवण्याची कंपनी असते.
ट्रेलरमध्ये कांदे पोह्यांचा कार्यक्रम सुरू असताना लग्नापूर्वी एकत्र राहण्याची मागणी मृण्मयी करते आणि सर्वांनाच धक्का बसतो. ते दोघं एकत्र राहायला लागतातही पण त्यानंतर काय काय घडतं हे पाहण्यासाठी सिनेमा पाहावाच लागेल. ट्रेलरमध्ये मृण्मयी आणि ललितचं म्हणजे सत्या आणि सावित्रीचं कुटुंबही फार गमतीशीर दाखवण्यात आलं आहे. त्यातही ललितच्या आजीचे तो क्या कहेने… ३ मिनिटं १० सेकंदाचा हा ट्रेलर पाहून सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असणार यात काही शंका नाही.
झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर अनेक दिवसांनी आता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्यासोबत मृण्मयी गोडबोलेही स्क्रिन शेअर करताना दिसेल. ललित आणि मृण्मयी पहिल्यांदा एकत्र सिनेमात काम करत असल्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन परेश मोकाशी याने केले आहे. सिनेमाची आगळी वेगळी कथा ही परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनीच लिहिली आहे. मेच्या १९ तारखेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 5:39 pm