मराठी चित्रपटांमध्ये चांगले, आशयघन चित्रपट या वर्षांच्या सुरुवातीपासून पाहायला मिळाले आहेत. परंतु ‘हेडलाइन’ या चित्रपटाला या आशयघन चित्रपटांमध्ये तर नाहीच, पण किमान करमणूकप्रधान करणाऱ्या चित्रपटांमध्येही स्थान देता येणार नाही. चित्रपटाचे कथासार चांगले असले तरी पटकथा, अभिनय, संवादफेक आणि सर्व तांत्रिक अंगे याबाबतीत मात्र संपूर्णपणे फसलेला चित्रपट बालिश म्हणावा लागेल.
काही काळापूर्वी पुणे येथे रेव्ह पार्टीवर छापा घालण्यात आला होता. त्यात धनदांडग्यांची सतरा-अठरा वर्षांची मुलेमुली पकडण्यात आली होती. या घटनेवर सर्वच वृत्तपत्रांमध्ये  मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. चित्रपटाच्या शीर्षकाचा चित्रपटातील कथासाराशी असलेला एवढाच काय तो संबंध आहे. बाकी सारे अतिशय बालिश पद्धतीने दाखविण्यात आले आहे.
निखिल ऊर्फ निक, यश आणि आर्या असे तीन जीवाभावाचे मित्रमैत्रिणी शाळूसोबती आहेत. ते आता कॉलेजमध्येही एकत्र शिकत असतात. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या या तिघांपैकी यश आणि निक दोघेजण मोबाइल, फेसबुक, चॅटिंगच्या आहारी जातात आणि त्यातूनच त्यांना एका रेव्ह पार्टीचे निमंत्रण मिळते. या रेव्ह पार्टीवर पोलीस छापा घालतात. रेव्ह पार्टीवरील छाप्यात निक, यश सापडतात. पोलीस ठाण्यावर अर्थातच मीडियाचा गराडा पडतो. त्यात वार्ताकन करणाऱ्या पत्रकार मुलगी वारंवार लहान मुलांना रेव्ह पार्टीत पकडले असा उल्लेख करते. मुळात १७ ते २० वर्षांची मुलेमुली ही लहान मुले या गटातील निश्चितच नाहीत हे सर्वाना चांगलेच माहीत आहे. परंतु तरीसुद्धा लेखक-दिग्दर्शकाने या वयोगटातील तरुणाईला लहान मुले असे संबोधून मोठाच गोंधळ घातला आहे. वास्तविक कथावस्तू चांगली होती. सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यात होता. परंतु अतिशय बटबटीत मांडणी, नवोदितांव्यतिरिक्त असलेल्या कलावंतांचाही बटबटीत अभिनय यामुळे चित्रपट बालिश ठरतो.
यश, निखिल आणि आर्या या प्रमुख तीन व्यक्तिरेखा साकारणारे कलावंत नवोदित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून उत्तम अभिनयाची अपेक्षा करता येणार नाही हे मान्य केले तरी दिग्दर्शकाने त्यांच्याकडून काम करवून घेतले नाही. त्यांच्या संवादफेकीमुळे चित्रपट हास्यास्पद ठरतो.
चित्रपटातील प्रत्येक चित्रचौकट आणि अन्य सर्व गोष्टी पाहताना ही नवशिक्यांची निर्मिती ठरते. छायालेखनातील त्रुटींमुळे चित्रपट अधिकच हास्यास्पद आणि बालिश ठरतो.
हेडलाइन
निर्मिती – मस्ती एण्टरटेन्मेंट
दिग्दर्शक – सुनील वाईकर
कथा – आरती जाधव
पटकथा -प्रदीप रघुनाथ
संगीत – प्रसाद-अद्वैत
छायालेखन – चारुदत्त दुखंडे
कलावंत – निखिल वैरागर, अजिंक्य जाधव, शाश्वती पिंपळीकर, दीपक करंजीकर, वंदना वाकनीस, पूजा पवार (साळुंखे), मोहिनी कुलकर्णी, रवी महाजन, प्रसाद ओक, बालकलाकार ओंकार बोरकर, सिया पाटील, संदीप जुवाटकर, संग्राम सरदेशमुख, राजू वाईकर, मंजुश्री जाधव, विनिता संचेती, विनायक गरुड.