लहान मुलांसारखं निर्मळ या जगात काहीच नसतं. त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर केले जाणारे संस्कार हे सर्वोत्तम असावेत असंच प्रत्येक आई- बाबांना वाटत असतं. पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळेच बालदिनचे औचित्य साधून मुलांच्या नेहमीच्या जगण्याला आपण थोडा फाटा देऊ आणि त्यांच्यासाठी असं काही तरी खास करु जे ते कधीच विसरणार नाहीत. आता काही तरी वेगळं करायचं म्हणजे बॉलिवूडची मदत तर घ्यावीच लागणार ना… बॉलिवूडकरांनी खास मुलांसाठी असे खास सिनेमे तयार केलेत जे पाहून तुमची मुलं खूश नाही झाली तर नवलच. आम्ही तुमच्यासाठी यातल्याच काही सर्वोत्तम सिनेमांची नावं आणली आहेत. खास म्हणजे या सगळ्या सिनेमांचा शेवट आनंदी होतो त्यामुळे मुलंही शेवटी आनंदीच होतील.

हालो’- ‘हालो’ सिनेमात बेनफ दादाचंदजी यांची मुख्य भूमिका होती. १९९६ मध्ये आलेल्या या सिनेमाची कथा एका सात वर्षांच्या मुलीभोवती फिरते. तिच्याकडे असलेलं कुत्र्याचं पिल्लू शोधण्याच्या मोहिमेवर ती असते. आईच्या मुत्यूनंतर ती पूर्ण वेळ खिन्नच असते. वडील मात्र तिची चांगली काळजी घेत असतात. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये सर्व मुलं खेळाचा आनंद घेत असतात ही मात्र पूर्णवेळ एका ठिकाणी खिन्न बसून असते. तेव्हा तिला सांभाळणारी व्यक्ती लवकरच तुझ्या आयुष्यात हालो येईल जो तुझं आयुष्य बदलून टाकेल असं सहज बोलून जाते आणि काही दिवसांनी तिला एक कुत्र्याचं पिल्लू दिसतं. ती त्या पिल्लाचं नाव हालो ठेवते. सगळं काही सुरळीत सुरू असताना ते कुत्र्याचं पिल्लू हरवतं आणि तिचं आयुष्य नवं वळण घेतं. त्याला शोधताना ती कोणा कोणाला भेटते हे पाहणे फार रंजक आहे.

‘मकडी’– श्वेता प्रसाद आणि शबाना आझमी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तेव्हा तुफान गाजला होता. या सिनेमातील ‘ओ पापडवाले’ हे गाणे आजही कित्येकांच्या लक्षात असेल. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले होते. श्वेता प्रसादला २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

‘चिल्लर पार्टी’- २०११ मध्ये आलेला हा सिनेमाही फार हिट झाला होता. नितेश तिवारी आणि विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील प्रत्येक बालकलाकारला प्रसिद्धी मिळाली. सायलेन्सर, अफलातून, शाओलीन ही मुलांची नावंही खूप हिट झाली होती. या सिनेमालाही २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट बालपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

‘द ब्ल्यू अम्ब्रेला’– रस्किन बॉन्ड यांनी ही कथा लिहिली असून विशाल भारद्वाजने याचे दिग्दर्शन केले होते. बालकलाकार श्रेया शर्मा आणि पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका यात आहेत. हा सिनेमा पाहताना मुलं सिनेमा आणि परिसर दोघांच्याही प्रेमात पडतील यात काही शंका नाही.

‘धनक’- नागेश कुकनूर लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात हेतल गड्डा आणि क्रिश छाब्रिया यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात बहीण- भावांचं उत्तम नातं दाखवण्यात आलं आहे. ज्यात, प्रेम, वात्सल्य, आशा- आकांशा सारं काही आहे. १० वर्षांची मुलगी परी आणि तिचा लहान अंध भाऊ छोटू यांच्याभोवती सिनेमाची कथा फिरते. वयाच्या नवव्या वर्षी तुला दृष्टी येईल असे परीने छोटूला सांगितलेले असते. त्याचा नववा वाढदिवस जस जसा जवळ येतो तसे परीवरील दडपण वाढत जाते. नेमकी परी आणि छोटूच्या आयुष्यात काय होते हे पाहण्यासाठी हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा.