|| भक्ती परब

रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर सध्या ‘छोटय़ा’ मंडळींनी आपला ठसा उमटवला आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील ‘लाडू’ आणि राणादाची छोटी दोस्त मंडळी तसेच ‘नकळत सारे घडले’, ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज’, ‘कुल्फीकुमार बाजेवाला’, ‘डान्स दिवाने’, ‘विघ्नहर्ता गणेश’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘टप्पू सेना’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील छोटा संभाजी अशा अनेक मालिकांमधून तसेच ‘ती सध्या काय करतेय’, ‘हृदयांतर’, ‘घाट’, ‘उबुंटु’, ‘अंडय़ाचा फंडा’, ‘रिंगण’, ‘मंकी बात’, ‘पिप्सी’, ‘सायकल’ आणि आता प्रदर्शित होणाऱ्या ‘परी हूँ मैं’ अशा मराठी चित्रपटात बालकलाकार मोठय़ा संख्येने दिसत आहेत. चित्रपटांची कथाही छोटय़ांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथा दिसतात.

२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ चित्रपटाने मराठी चित्रपटांचा परीघ मोठा झाला. ‘श्वास’मधील ‘परशू’ची भूमिका साकारणाऱ्या अश्विन चितळे या बालकलाकारापासून ते ‘किल्ला’मधील ‘चिन्मय काळे’ची भूमिका साकारणारा अर्चित देवधर, याच चित्रपटात लक्षवेधी ठरलेला बालकलाकार पार्थ भालेराव ते ‘रिंगण’मधील ‘अभिमन्यू’ची भूमिका साकारणारा साहिल जोशी, ‘सायकल’मधील ‘मृण्मयी’ची भूमिका करणारी मैथिली पटवर्धन आणि ‘परी हूँ मैं’ चित्रपटातील श्रुती निगडे. हे सर्व बालकलाकार लोकप्रिय झाले आहेत. बालकलाकार म्हणून सुरुवात केल्यानंतर मोठेपणी अभिनेता म्हणून कारकीर्द यशस्वी होतेच असे नाही. मात्र ‘बीपी’, ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांतून दिसलेले अनेक बालकलाकार आज मालिका किंवा अन्य चित्रपटांमधून सातत्याने काम करत आहेत. ग्लॅमरच्या जगात राहूनही ते स्वत: आणि त्यांच्या पालकांकडून शैक्षणिक, कौटुंबिक विश्व जपण्यावर भर दिला जात आहे.

मालिका आणि चित्रपटात बालकलाकार म्हणून लक्ष वेधून घेणाऱ्या मैथिली पटवर्धनची आई, माधवी म्हणाल्या, मैथिलीला नृत्याची खूप आवड. त्यामुळेच तिला अभिनयाची पहिली संधी मिळाली. सातव्या वर्षी आम्ही तिला अभिनय प्रशिक्षण वर्गात दाखल केलं. ‘अस्मिता’, ‘तू माझा सांगाती’, ‘बालपण देगा देवा’ या मालिकांमधून आणि ‘सायकल’, ‘पिप्सी’ चित्रपटांतून तिने काम केलं आहे. मैथिली अभिनयासोबतच पाश्चात्त्य आणि कथ्थक या दोन्ही नृत्यशैलींचे शिक्षण घेत आहे. चित्रीकरण सांभाळून अभ्यास, नृत्य याला वेळ देत आहे. सेटवर मधल्या वेळेत ती अभ्यास करते किंवा सहकलाकारांसोबत खेळते. अभ्यासाच्या बाबतीत आम्ही तिला कुठलाच ताण घेऊ देत नाही पण ती अभ्यासातही हुशार आहे. चित्रीकरण नसतं, शाळेलाही सुट्टी असते, तेव्हा ती मित्र-मैत्रिणींबरोबर, बाहुल्या-भातुकलीच्या खेळात रमते. सध्या ती स्केटिंगही शिकत आहे. ती स्वत: सगळ्याचा चांगला समन्वय साधत आहे.

बालकलाकार साहिल जोशीची आई सायली यांनीही साहिलची नृत्याची आवड जोपासली. ही आवड जोपासत असतानाच त्या त्याला चित्रपटाच्या ‘ऑडिशन’साठी घेऊन गेल्या. पुढे त्याला एकामागोमाग एक अशी संधी मिळत गेली. ‘रिंगण’नंतर ‘पिप्सी’, ‘अबक’ या चित्रपटांत नंतर ‘आयपीयल’च्या जाहिरातीत काम केलं. त्यातूनच पुढे रोहित शेट्टी यांनी ‘सिम्बा’ चित्रपटासाठी त्याची निवड केली. सध्या साहिल मन लावून अभ्यासात गुंतला आहे. त्याला शिक्षण आणि अभिनय या गोष्टी तितक्याच प्रिय आहेत. तो नृत्यही शिकत असल्याचे त्या म्हणाल्या.

कथाकथन करून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेल्या श्रुती निगडे हिची आई हेमलता यांनी श्रुतीला अभिनय आणि शिक्षणाचा समतोल कसा राखायचा, चित्रीकरण नसतं, ‘ऑडिशन’ दिल्यानंतर नकार येतो तेव्हा स्वत:ला कसं सावरायचं हे शिकवलं आहे.

वाहिन्यांवर जेव्हा लहान मुलांसाठी नृत्य, गाणे, अभिनय यांवर आधारित ‘रिअ‍ॅलिटी शो’ सुरू झाले तेव्हा मुलांचं बालपण हरवतंय अशी टीका झाली होती, त्यात तथ्यही होतं. कारण तेव्हा लहान मुलांना अशी पटकन संधी मिळत नव्हती. पण गेल्या दोन वर्षांतला छोटय़ा पडद्यावरील लहान मुलांचा वावर बघता त्यांनी आपल्याला मिळालेली संधी आणि आपलं खरं आयुष्य यात गल्लत केलेली दिसून येत नाही. पण अजूनही छोटय़ा शहरांतून येणाऱ्या लहान मुलांच्या विश्वात तसे झालेले नाही. उदाहरणार्थ, गेल्याच आठवडय़ात ‘डान्स दिवाने’च्या रंगमंचावर आलोक नावाच्या मुलानं सुंदर नृत्य केलं तेव्हा सेलेब्रिटी परीक्षक म्हणून आलेला अक्षयकुमार त्याला म्हणाला, बाळा खूप छान नृत्य करतोस. मला तुझ्या आईशी बोलायचंय. त्याची आई अक्षयकुमारला म्हणाली, आलोकला तुमच्यासारखं बनवायचं आहे. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अक्षयकुमार म्हणाला, त्याला माझ्यासारखं नको, त्याला ‘तालबद्ध जिन्मॅस्टिक’मध्ये घाला, तो यात भारताला सुवर्णपदक मिळवून देईल. ते त्याला आवडतंय.

‘बालक-पालक’मधील मदन देवधर, शाश्वती पिंपळकर हे बालकलाकार चित्रपट आणि मालिकांमधून पुढे आले. ‘टाईमपास’मधील ‘दगडू’ची भूमिका साकारणाऱ्या प्रथमेश परब यानेही अभिनयात सातत्य राखलं आहे.

अलीकडे दोन वर्षांतील बालकलाकारांची छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरची यशस्वी कामगिरी आणि अभिनयातलं सातत्य पाहता यांचं भविष्य उज्ज्वल आहे. पण संधी मिळाली नाही तर किंवा नाकारले गेलो तर काय करायचं? याचाही विचार या क्षेत्रात येणारे बालकलाकार आणि त्यांच्या पालकांनी केला पाहिजे.

मुलं चित्रिकरणाच्यावेळी घरापासून लांब असल्याने मी त्यांचा पालक झालो होतो. लहान मुलं मोठय़ांचं अनुकरण करत असतात. त्यांना उद्याचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी आपण आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. अलिकडे चित्रपटातून शाळेपासूनची प्रेमकथा  दाखवली जाते ती बंद व्हावी. लहान मुलांचं असलेलं विश्व, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आवडत्या-नावडत्या गोष्टी यावर चित्रपट तयार झाले पाहिजेत.      -पुष्कर श्रोत्री, अभिनेता-दिग्दर्शक

आपल्याकडे अजूनही बालचित्रपट म्हटले की ‘व्हीएफएक्स’, ‘कार्टुन’ यावरच भिस्त असते. मुलांवर संस्कार होतील असे चित्रपट तयार झाले पाहिजेत. लहान मुलांमध्ये शिकण्याची वृत्ती आणि आकलनक्षमता असते. ‘मंकी बात’ चित्रपटाच्या वेळी हे बालकलाकार त्यांच्या पद्धतीने भूमिकेचा अभ्यास करुन येत होते. लहान मुलांना घेऊ न नव्हेतर लहान मुलांसाठीच चित्रपट यावेत. लहान मुलांचं हलाखीचं दाखवून, त्यांची पिळवणूक दाखवून पुरस्कार मिळविण्यापेक्षा, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकण्यापेक्षा लहान मुलांसाठी त्यांच्या गोष्टी, प्रश्न घेऊ न चित्रपट निर्मिती झाली पाहिजे.  -विजू माने, दिग्दर्शक