20 February 2019

News Flash

अमेरिका- चीनमधील ‘ट्रेड वॉर’मुळे भारतीय चित्रपटांना बक्कळ कमाईची सुवर्णसंधी

हॉलिवूडचे वर्षाला दीडशेहून अधिक चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होतात. तर जवळपास पाच ते आठ भारतीय चित्रपट चीनमध्ये वर्षाकाठी प्रदर्शित होतात.

आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटांनी चीनमध्ये तब्बल तेराशे कोटी कमावले होते.

अमेरिका चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे भारतीय चित्रपटांना बक्कळ कमाई करण्याची सुवर्णसंधी आयती चालून आली आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे. विशेषत: हे चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत. अशातच अमेरिका चीनमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा फटका हॉलिवूड चित्रपटांना बसू शकतो तेव्हा दोघांचे भांडण सुरू असताना तिसऱ्यानं म्हणजेच भारतीय चित्रपटांनी याचा लाभ घ्यावा असं मत व्यक्त करण्यात येत आहेत.

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादला होता, त्याचा बदला घेण्यासाठी चीनने अमेरिकेच्या १२८ उत्पादनांवर आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. हे व्यापार युद्ध सुरू असताना भारतीय चित्रपटांना मात्र कमाईची मोठी संधी असल्याचं मत तिअॅन गुआँगक्विंग या सहाय्यक संशोधकानं व्यक्त केलं आहे. तिअॅन चीनमधल्या एका संशोधन केंद्रात संशोधन करत आहे. अमेरिका- चीन वादामुळे भारतीय चित्रपटांना याचा फायदा होईल असं त्यांनी एकप्रकारे सुचवलं आहे.

सध्या हॉलिवूडचे वर्षाला दीडशेहून अधिक चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होतात. तर जवळपास पाच ते आठ भारतीय चित्रपट चीनमध्ये वर्षाकाठी प्रदर्शित होतात. पण आता हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चित्रपटांना जास्त प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटांनी चीनमध्ये तब्बल तेराशे कोटी कमावले होते. गेल्या वर्षभारात जे आठ चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले त्यांनी दोन हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. हे आकडे निश्चितच भारतीय चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद दर्शवतात. त्यामुळे सध्याच्या वादामुळे अर्थात हॉलिवूड चित्रपटांकडे चिनी प्रेक्षक पाठ फिरवतील आणि भारतीय चित्रपटांना संधी उपलब्ध होईल असं निरिक्षण त्यांनी नोंदवलं आहे.
गेल्या वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘बाहुबली’, हिंदी मिडिअम, ‘बजरंगी भाईजान’नं तुफान कमाई चीनमध्ये केली होती. त्यामुळे भारतीय चित्रपट या ट्रेड वॉरचा फायदा कसा उचलतात हे पाहण्यासारखं ठरेल.

First Published on July 12, 2018 3:27 pm

Web Title: chinese experts want india to fill chinas hollywood void