चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर-साटम यांचे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ हे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. हे नाटक रोमॅन्टिक थ्रिलर असून अभिजित साटम यांच्या ‘ऋजुता प्रॉडक्शन अ‍ॅण्ड टेरकॉम’ची ही निर्मिती आहे.
‘हापूस’ या चित्रपटासह अभिजित साटम यांनी ‘मुक्काम पोष्ट बोंबिलवाडी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’ आदी नाटकांची निर्मिती अन्य निर्मात्यांबरोबर केली होती. ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ हे नाटक साटम यांची स्वतंत्रपणे सादर केलेली पहिलीच नाटय़कृती आहे. नाटकाचे लेखन अस्लम परवेझ यांचे तर दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांचे आहे.
आत्ताच्या तरुण पिढीतील जोडप्याची कहाणी, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांची प्रेमकहाणी ‘थ्रिलर’ पद्धतीने सादर करण्यात आली आहे. मनोरंजन, माणसांमधील प्रवृत्ती, रहस्य, पती-पत्नीमधील नाते, सुडाची भावना असे विविध कंगोरे या नाटकात पाहायला मिळणार आहेत.  या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच सहा कॅमेऱ्यांचा आणि एका पडद्याचा वापर केला जाणार आहे.  प्रेक्षकांसाठी तो एक वेगळा अनुभव असणार आहे.
चिन्मय आणि मधुरा यांच्यासह नाटकात स्वत: प्रियदर्शन जाधव, अनिरुद्ध जोशी, यशश्री उपासनी, अमित सुर्वे हे कलाकार आहेत. क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत आहे. प्रसाद वालावलकर यांचे नेपथ्य तर भूषण देसाई यांची प्रकाशयोजना आहे.