संगीता बालचंद्रन दिग्दर्शित ‘चिंतामणी’ या सिनेमाचे पोस्टर अनावरण आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुख्य अभिनेता भरत जाधवच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार मंडळी, तंत्रज्ञ आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
‘चिंतामणी’ सिनेमाची कथा ही एका मध्यमवर्गीय माणसाच्या असामान्य कर्तुत्वाची आहे. मुंबईच्या चाळीत आपल्या बायको आणि मुली सोबत राहणारा  ‘चिंतामणी’ आपल्या घरचांच्या आणि स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा परिस्थितीमुळे भागवू शकत नाही. त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनांची ही गोष्ट आहे.वर्तमानपत्र आणि अनेक माध्यमातून आज अनेक प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपण आवर्जून वाचतो ही. परंतु  … एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चिंतामणी हा सिनेमा पाहावा लागेल. मला जेव्हा या सिनेमाची कथा ऐकवण्यात आली तशीच ती पडद्यावर साकारली गेली आहे याचा मला जास्त आनंद आहे. संगीताजींचा हिंदी मालिकांमधील अनुभव हा दांडगा असल्याने त्यांचे मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनातील पाऊल हे योग्य आहे. हा सिनेमा थ्रिलर फॅमिली ड्रामा आहे आणि तो नक्कीच लोकांना आवडेल अशी मला आशा आहे तसेच आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा माझा या सिनेमातील रोल खूप वेगळा आहे, असे अभिनेता भरत जाधव याने सांगितले.

सिनेमाची कथा दीपक अनंत भावे यांची असून पटकथा आणि संवाद किरण श्रीनिवास कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी लिहिले आहेत. ‘चिंतामणी’ या सिनेमात अभिनेता भरत जाधव यांच्याबरोबरच अभिनेत्री अमृता सुभाष, तेजश्री वालावलकर, रुचिता जाधव यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के, मोनिका दवडे यांच्या ही भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दिवाळीची धूमधाम संपल्यानंतर ३१ ऑक्टोबरला ‘चिंतामणी’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.