कॉलेज आठवणींचा कोलाज : फुलवा खामकर, नृत्य दिग्दर्शिका

मी दादरच्या बालमोहन शाळेत शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच मला जिम्नॅस्टिक्सची आवड होती. दहावीची शाळेतली प्रिलियम परीक्षा बुडवून मी स्पर्धेला गेले होते. दहावीला मला ७५ टक्के मिळाले. आमच्या घरात एवढे टक्के मिळवणारी मी पहिलीच होते. महाविद्यालयीन शिक्षण मी माटुंग्याच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून घेतलं. तेव्हा पोदारचा ‘कट ऑफ’ जास्त असायचा. पण मला नशिबाने ते कॉलेज मिळालं. मी १५ वर्षांची असताना कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी गेले होते. तेव्हा ते कॉलेजचं रूप बघून मी भारावले होते. आणि मला हेच कॉलेज हवं नाही तर मी कॉलेजलाच जाणार नाही. असा बालहट्ट मी उगाच आईजवळ केला होता. पुढे दहावी झाल्यानंतर मला पोदारला प्रवेश मिळाला.

मी मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी. त्यात पोदार म्हणजे अभ्यासू मुलांचं कॉलेज अशी त्याची ख्याती. त्यात तिकडे फक्त इंग्लिशमध्येच बडबड करायची. हे जे काही वातावरण होतं. त्या वातावरणाशी दोन हात करण्यातच माझा दिवस गेला. माझी नृत्यात करिअर करण्यात कॉलेजचा मोठा हात आहे. या वास्तूत आल्यावरच मला जाणवलं की मला नाचता येत. त्यामुळे मला माझी नृत्याची दिशा कॉलेजने दिले. मल्हार फेस्टिव्हलमधल्या स्पर्धा असोत किंवा छोटय़ा मोठय़ा नृत्य स्पर्धा असोत मी सगळीकडे सहभाग घेतला व सगळीकडे जिंकले. अकरावीला असताना मराठी वाङ्मय मंडळाच्या अंतर्गत मी कथाकथन स्पर्धेत भाग घेतला होता. ही माझी पहिलीच वेळ होती. शेकडो लोकांसमोर बोलण्याची. या स्पर्धेत मला पहिलं बक्षीसही मिळालं. कॉलेजने जसं नृत्य दिलं तसंच मला माझा जीवनसाथीही दिला. माझा नवरा अमर खामकर. याची आणि माझी पहिली भेट कॉलेजमध्येच झाली. आम्ही दोघेही एकाच बॅचचे होते. तो कॉलेजच्या हायकर क्लबचा सदस्य होता. अनवधानाने मीसुद्धा त्या चमूत घुसले गेले. कॉलेजमध्ये असताना मी या चमूसोबत खूप हायकिंग केलं. कोकणकडा, पेबचा किल्ला ही त्यातलीच काही उदाहरण.

पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षांला असताना मी लहान मुलांना जिम्नॅस्टिक्स शिकवायला जायचे. ज्यामुळे माझं अनुभवाचं गाठोडं पक्क होत होतं. दुसऱ्या वर्षांला असताना तर एक किस्साच झाला. माझी चौथी राष्ट्रीय स्पर्धा होती. आणि त्यानंतर मी छत्रपती पुरस्कारासाठी अर्ज करणार होते. त्या राष्ट्रीय स्पर्धेच्या दरम्यानच नेमकी परीक्षा लागली. मी पेपर दिला. पण तो नेमका फुटला. पुन्हा एकदा नव्याने परीक्षा देण्यासाठी वेळापत्रका लागलं. पण मुख्याध्यापकांनी स्पर्धेवर लक्ष केंद्रित कर तुझी परीक्षा नंतर घेतली जाईल, असं सांगून दिलासा दिला. मी स्पर्धा जिंकून आले आणि नंतर परीक्षा दिली. त्या वर्षी मला चार गोल्ड मेडल मिळाली.

कॉलेजात असताना घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे खूप पैसे जवळ नसायचे. क्लासेस घ्यायचे, त्यातून पैसे मिळायचे. पण ते खाण्यावारी किंवा मजेसाठी मी कधीच घालवले नाहीत. आमच्या कॉलेजच्या जवळ मणीज कॅफे होतं. तिथे साडेचार रुपयाला एक प्लेट इडली मिळायची. त्यातही आम्ही मैत्रिणी ती अर्धी करून खायचो.

कॉलेज ते कैलास लस्सी (दादर पूर्व) एवढा रस्ता आम्ही चालत पार करायचो. आणि वन बाय टू लस्सी प्यायचो. कॉलेजच्या पहिल्या दिवशी असलेली घाबरट फुलवा आणि कॉलेज पास आऊट होऊन बाहेर पडलेली, आत्मविश्वासाने भरलेली फुलवा यात फार फरक होता. मला घडवण्यात माझ्या कॉलेजचा खूप मोठा हात होता. माझा पुनर्जन्मच तिथे झाला. आमच्या पोदारची सेंड ऑफ साजरा करण्याची एक प्रथा आहे. ती अशी की, सभागृहात ऑर्केस्ट्रामध्ये धमाल मस्ती करून झाल्यावर आम्ही सगळे जण हातात मेणबत्त्या घेतो आणि ‘कभी अलविदा ना कहेना’ हे गाणं म्हणतो. हे गाणं मी चार वर्ष इतरांसाठी म्हणून ढसाढसा रडले. आणि पाचव्या वर्षी स्वत:साठी म्हणून रडले होते. पण कॉलेज संपल्यानंतरसुद्धा मी पुढची दहा वर्ष कॉलेजमध्ये डान्स कोरियोग्राफीसाठी जात होते. कॉलेजने एक डान्सर म्हणून पदवी शिक्षण घेत असताना मला घडवलं. आणि कॉलेज संपल्यावर एक कोरियोग्राफर म्हणून पायावर उभ केलं. त्यामुळे मी नेहमी म्हणते तसं- पोदरनेच फुलवा घडवली.

शब्दांकन : मितेश जोशी