सिनेसृष्टीत पाऊ ल ठेवणारी जवळजवळ सर्वच मंडळी नायक किंवा नायिका बनण्याच्या हेतूने या क्षेत्रात येतात. त्यात काहींना सुंदर चेहरा आणि देखण्या लुकच्या जोरावर मोठय़ा पडद्यावर मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. तर काहींना नाइलाजास्तव खलनायकांच्या भूमिका साकाराव्या लागतात. पण या सर्व गमतीजमती सुरू असतानाच अँथोनी पर्किन्स, ख्रिस्तोफर ली, टॉम हार्डी, ग्लेन क्लोज, केविन स्पेसी यांसारखीही काही मंडळी आली ज्यांना केवळ अभिनयाची भूक होती. त्यांनी एक उत्कृष्ट कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. अशा जबरदस्त कलाकारांपैकी एक असलेला हीथ लेजर आज तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आहे. २२ जानेवारी २००८ रोजी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी या अफलातून अभिनेत्याचे निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानने एका खास मुलाखतीत पुन्हा एकदा हीथ लेजरच्या आठवणींना उजाळा दिला.हीथ आणि नोलान या दोघांमधील संबंध तसे बरेच ताणलेले होते. ‘बॅटमॅन : द डार्क  नाइट’ या चित्रपटात दोघांना एकत्र आणताना निर्मात्यांना अक्षरश: तारेवरची कसरतच करावी लागली होती. थोडक्यात काय तर आचार्य अत्रे आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यात जसे राजकीय मतभेद होते, तसाच काहीसा प्रकार या दोघांच्याही बाबतीत होता. पण अत्र्यांनी चव्हाणांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेला मृत्युलेख वाचून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तसाच धक्का नोलानची मुलाखत पाहून प्रेक्षकांना बसला. एकेकाळच्या आपल्या कट्टर वैऱ्याची स्तुती करताना नोलान इतका भावूक होईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. स्वत:च्या भावनांवर जबरदस्त नियंत्रण ठेवणाऱ्या नोलानच्या डोळ्यांतून वाहणारे दु:खाश्रू या मुलाखतीचे खास वैशिष्टय़ मानले गेले. हीथ लेजरने साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखा जबरदस्त होत्या, परंतु त्याने साकारलेल्या जोकरची सर दुसऱ्या कोणत्याच खलनायकाला येणार नाही असे त्याला वाटते. त्याचा ‘द डार्क नाइट’मधला अभिनय पाहिला की त्याची घृणा वाटावी इतका जिवंत खलनायक त्याने उभारला होता. तो अत्यंत गुणी आणि अभ्यासू अभिनेता होता. आपली प्रत्येक व्यक्तिरेखा साकारताना एखादा नवखा अभिनेता आपली कारकीर्दीतील पहिली भूमिका साकारताना जितकी तयारी करतो, त्याच तयारीनिशी तो आपली प्रत्येक भूमिका वठवत असे. ख्रिस्तोफर नोलानच्या या मुलाखतीची समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर स्तुती केली जात आहे.