|| मानसी जोशी

‘कुछ तो गडबड है… दया दरवाजा तोड दो’ सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांच्या तोंडचा हा संवाद माहिती नाही, अशी व्यक्ती विरळा. या संवादात उल्लेख असलेला बलदंड शरीरयष्टी, सहा फूट पाच इंच उंचीचा एका लाथेत दरवाजा तोडणारा वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर दया अर्थातच दयानंद शेट्टी हा ‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘सावधान इंडिया – एफआयआर’ मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. या गुन्हेगारी जगतावर आधारित शोमध्ये तो सूत्रसंचालकाच्या नव्या भूमिके त दिसणार आहे. गुन्हेगारीवर आधारित शो हा माझा आवडता प्रकार असून आता फक्तमाझ्या भूमिकेत बदल झाला आहे. सीआयडीमध्ये कलाकार म्हणून होतो आणि आता या शोचे सूत्रसंचालन करणार आहे, असं तो सांगतो.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

‘माझ्यासाठी हा प्रकार नवीन नाही. माझ्या कामाचे स्वरूप तसेच त्याचा आवाकाही आधीच्या मालिकेएवढाच आहे. या मालिकेत प्रेक्षकांना विविध घटना तसेच प्रसंग पाहण्यास मिळतील. त्याची मांडणी, सादरीकरण, हाताळणीही वेगळ्या प्रकारची असल्याचे दयाने स्पष्ट केले. याआधी अभिनेता आशुतोष राणा आणि टिस्का चोप्रा यांनीही मालिकेच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळली होती. प्रत्येक कलाकाराची अभिनय तसेच निवेदनाची पद्धत वेगळी असून मी माझ्या पद्धतीने निवेदन करणार आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

२१ वर्षांपूर्वी ‘सोनी टीव्ही’वर दाखल झालेल्या बी. पी. सिंग दिग्दर्शित ‘सीआयडी’ या मालिकेने इतिहास घडवला. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांच्या त्रिकुटाने रहस्यमय आणि किचकट वाटणाऱ्या केसेस प्रेक्षकांना साध्या पद्धतीने समजावून सांगितल्या. खास लोकाग्रहास्तव ही मालिका सलग २१ वर्षे यशस्वीपणे चालली. आज या मालिकेचे पुन:प्रसारित भाग पाहताना प्रेक्षक कंटाळत नाहीत. या २१ वर्षांच्या कालावधीत मालिकेच्या आशय, सादरीकरण तसेच तंत्रज्ञानात प्रचंड बदल झाल्याचे मत दया व्यक्त करतो. पूर्वी आम्हाला चित्रीकरणासही जास्त वेळ लागत असे. चेहरा, शरीरयष्टी तसेच इतर गोष्टींवरून आरोपीला ओळखणे कठीण जात असे. मात्र आता, प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे आरोपीचा तपास करणे सोपे होते. आता मोबाइल नंबरच्या मदतीने काही वेळात त्याचा माग काढता येतो. तपासात झालेल्या या बदलांचा परिणाम मालिकेच्या आशयातही झाला असल्याचे त्याने स्पष्ट केले.

आपल्याकडे छोट्या पडद्यावर गुन्हेगारीवर आधारित शोजची एक ठरावीक जातकुळी ठरलेली आहे. याच्या बाहेरही जाऊन मालिकेच्या सादरीकरणात वैविध्य आणणे गरजेचे असल्याचे दयानंद शेट्टीने सांगितले. यात परदेशी मालिका जगात लोकप्रिय आहेत. सादरीकरण, उत्तम पटकथा, आशयाच्या जोरावर ते प्रेक्षकांना शेवटच्या दृश्यापर्यंत इतके  खिळवून ठेवतात की पुढे काय होईल ते सांगणे अवघड होते. अशा मालिकांची निर्मिती आपल्याकडेही होणे गरजेचे आहे. त्यांचे आर्थिक गणितही प्रचंड असते. तिथे व्हीएफएक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पडद्यावर पाहताना दृश्ये अधिक जिवंत वाटतात. त्या तुलनेत हिंदी मालिकांचे आर्थिक गणितही तुलनेने कमी असते. काळानुरूप आपल्याकडील कार्यक्रमही तांत्रिकदृष्ट्या बदलत आहेत, असेही तो म्हणाला.

दूरचित्रवाणीवरील नेहमीच्या सरधोपट मालिका, रिअ‍ॅलिटी शो, सासू-सुनेच्या नाट्यापेक्षा गुन्हेगारीवर आधारित शो सादर करताना काळजीपूर्वक मांडावे लागतात, असेही दयाने स्पष्ट केले. या शोजचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वास्तवातील प्रसंग पडद्यावर मांडताना त्याची तीव्रता कमी करून मांडावे लागतात, कारण संपूर्ण कुटुंब ती मालिका पाहात असते. त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी एखादी घटना आणि प्रसंगांची मांडणी वेगवान असावी लागते. संकलनात अनेक तुकड्यांमध्ये दाखवावे लागते. प्रेक्षकांनी शो मधूनच पाहिल्यास त्यांना मालिकेचा थांगपत्ता लागत नाही. मात्र त्यासाठी संबंधित भाग सुरुवातीपासून पाहण्याची गरज असल्याचे तो सांगतो.

‘सीआयडी’मुळे खरी ओळख मिळाली

‘सीआयडी’मुळे छोट्या पडद्यावर गुन्हेगारी विश्व अधिक चांगल्या तºहेने प्रेक्षकांसमोर उलगडले. पोलीस तपास कसा करतात, त्यांची पद्धत याबद्दल माहिती मिळाली. ‘सीआयडी’नंतर अशाच प्रकारच्या मालिकांची निर्मिती करण्यात आली, मात्र या मालिकेची लोकप्रियता किंचितशीही कमी झाली नाही. त्यामुळे दूरचित्रवाणीवर क्राईम शोजमध्ये ही मालिका मैलाचा दगड मानली जाते. या मालिकेमुळे मला खरी ओळख मिळाल्याचे दया सांगतो. आजही मी कुठेही गेल्यास ‘सीआयडी’मधील दया याच नावाने प्रेक्षक मला ओळखतात. त्यांचे भरभरून प्रेम अजूनही मिळते, असे तो सांगतो.

दरवाजा तोड दो दया…

‘सीआयडी’मध्ये दया या एका संवादामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. एसीपी प्रद्युम्न आणि त्याची टीम जेव्हा बंद दरवाजापाशी पोहोचते, तेव्हा प्रद्युम्न दयाला म्हणतात, दरवाजा तोड दो दया… हे संवाद एवढे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत की टी शर्टपासून इतर कार्यक्रमातील विनोद तसेच मिम्समध्ये त्याचा आजही वापर केला जातो. याचे श्रेय लेखकाला जाते, असे दया सांगतो. सहज म्हणून हे संवाद लिहिण्यात आले होते, मात्र आता ते एवढे लोकप्रिय झालेत की कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात, कार्यक्रमात याचा हमखास उपयोग करतात. यानिमित्ताने लोकप्रिय मालिकेचा आपण एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो, असेही मत त्याने व्यक्त केले.