आतापर्यंत प्रेक्षकांनी ‘सीआयडी’ ऑफिसर्सना प्रमाणिकपणे गुन्ह्य़ाचा छडा लावताना आणि गुन्हेगारांना कठोर शासन करताना पाहिलेले आहे. पण लवकरच सीआयडीमधील अधिकारी गरबा खेळताना दिसणार आहेत. येत्या शनिवार-रविवारी सोनी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’मधील सीआयडी अधिकाऱ्यांना सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दयाबेन आणि जेठालाल भेटणार आहेत. त्यानिमित्ताने मालिकेतील गंभीर वातावरणाला विनोदाचा तडका मिळणार आहे.
‘सीआयडी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सध्या सोनी आणि सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्याचा दोन्ही वाहिन्यांचा प्रयत्न असल्याचे सोनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. याआधीही दोन किंवा तीन मालिकांमधील पात्रे एकत्र आणण्यात आली आहेत. पण एक विनोदी आणि एक पोलिसी विश्वातील मालिकेच्या पात्रांना एकत्र आणण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
सीआयडीच्या शनिवारच्या भागात जेठालालसाठी दुकानात डबा घेऊन जात असताना दयाबेनला रस्त्यात एसीपी प्रद्युम्नचे पाकीट सापडते आणि दया-जेठालाल प्रामाणिक नागारिकाचे कर्तव्य बजावत ते पाकीट घेऊन सीआयडीच्या ऑफिसमध्ये जातात. पण तेथे गेल्यावर त्यांना लक्षात येते, ते पाकीट आणि आतील कागदपत्रे खोटी आहेत आणि एसीपी प्रद्युम्न पण गायब असतात. तेथून सीआयडी अधिकाऱ्यांची या सगळ्या गोंधळामागची कहाणी शोधण्याची मोहीम सुरू होते. अर्थात यावेळी त्यांच्यासोबत दया-जेठालाल असणार आहेत आणि दयाबेन म्हणजे गरबा हे न चुकणारे समीकरण आहे. त्यामुळे सीआयडी अधिकाऱ्यांना दयाबेन गरबा खेळायला लावणार हे नक्की. या गोंधळात ते एसीपी प्रद्युम्नला शोधू शकतात की नाही हे पाहायला मालिका पाहावी लागेल.
पण गोष्ट इथेच संपणार नाही आहे, जर दयाबेन – जेठालाल न सांगता सीआयडीमध्ये येऊ शकतात, तर ‘सीआयडीची धाड’ गोकुलधाम सोसायटीवर पण नक्कीच पडू शकते. १४ जुलैला सीआयडी गोकुलधाम सोसायटीमध्ये येणार असल्याचे मालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.