अभिनय क्षेत्रात स्त्रियांचे होणारे शारीरिक शोषण हा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत येत आहे. त्यातच ‘रोझ मॅक्गोवन’,‘मेरिल स्ट्रीप’, ‘अँजेलिना जोली’, ‘एमा वॉटसन’यांसारख्या सेलेब्रीटी व ‘#मी टू’ सारख्या चळवळींमुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्याने आता आणखीनच आक्रमक रुप धारण केले आहे. नुकत्यात पार पडलेल्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही महिला सक्षमीकरण हा मुद्दा जोरदार गाजला. त्यामुळे आता रोजच्या रोज नवनविन कलाकार अगदी बिनधास्तपणे त्यांच्यावर झालेल्या शारिरीक अत्याचाराचे अनुभव माध्यमांसमोर मांडत आहेत. या यादीत आता अभिनेत्री ‘सिएरा पेटन’ हे आणखीन एक नवीन नाव जोडले जात आहे.

अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीपासुनच सिएरावर शारीरिक अत्याचार झाले. एका मुलाखती दरम्यान तिने ‘फ्लाइट ऑफ फ्युरी’ या आपल्या पहिल्या चित्रपटातील अनुभव सांगीतले. चित्रपटात निवड झाल्यानंतर रोमानिया येथे चित्रीकरणासाठी जात असताना विमानातच चित्रपटाची पटकथा तिला देण्यात आली. त्यात काही नग्न दृष्यांबद्दल उल्लेख होता. दिग्दर्शक मायकल कॉईशने या आधी तिला दिलेल्या पटकथेत या न्यूड सीन्स बद्दल काही उल्लेख नव्हता. कोणतीही पुर्वकल्पना न देता केल्या गेलेल्या बदलांमुळे सिएरा गोंधळली. त्यामुळे चित्रिकरणासाठी सेटवर पोहोचताच क्षणी तीने मायकलशी संपर्क साधला. परंतु तिचा एकही शब्द न ऐकता तीच्यावर नग्न दृष्य देण्यासंदर्भात दबाव टाकण्यात आला. शिवाय जर तिने नकार दिला तर तिच्या जागी अन्य कोणा दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देण्यात येईल अशीही धमकी तिला देण्यात आली. शेवटी नाईलाजास्तोर निर्मात्यांची मागणी तीला मान्य करावीच लागली. त्यानंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री बने पर्यंत जवळ जवळ प्रत्येक चित्रपटात तिला नग्न दृष्यांसाठी दबाव टाकण्यात आला.

सिएराच्या मते पटकथेत गरज नसतानाही नग्न दृष्यांचा वापर करणे हा सिनेक्षेत्रातील नवीन उद्योग झाला आहे. त्यामुळे नव्या अभिनेत्रींसाठी न्यूड सीनशिवाय गत्यंतर नाही ही सध्याची स्थिती आहे. केवळ यश मिळवण्याची धुंदी डोक्यात असल्यामुळे तिने अनेकांना आपला गैरवापर करु दिला. पण हळुहळु वास्तविकता तिच्या लक्षात आली. परंतु तोपर्यंत वेळ निघुन गेली होती. या मुलाखती दरम्यान तिने सिनेक्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या नविन कलाकारांना त्यांचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्ष राहण्याचा सल्ला दिला.