लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कित्येक महिला या जगात आहेत पण प्रत्येकीला न्याय मिळतो असं नाही. काहींना आयुष्यभर न्याय मिळवण्यासाठी झगडावं लागतं, तर याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक महिलांचे आवाज दाबूनही टाकण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी विनस्टीन यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या संदर्भात सोशल मीडियावर एक चळवळही सुरू केली गेली आहे. हॉलिवूड अभिनेत्रींनी याआधीही अशा अत्याचारांना वाचा फोडली आहे. या अभिनेत्रींमध्ये आता जेनिफर लॉरेन्सच्या नावाचाही सहभाग झाला आहे. एका कार्यक्रमात तिने सिनेसृष्टीत पदार्पणात कराव्या लागलेल्या संघर्ष आणि शोषणाबद्दल सांगितले.

जेनिफरने तिच्यासोबतचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला जो ती आजही विसरु शकली नाही. एका निर्मात्याने तिला निर्वस्त्र करुन रांगेत उभे राहण्यास सांगितले. याबद्दल बोलताना जेनिफर म्हणाली की, हा प्रसंग मी अजून विसरले नाही. माझ्यासाठी ती फार लाजिरवाणी आणि दुःखद घटना होती. मी नुकतीच करिअरला सुरूवात केली होती. त्या निर्मात्याने मला दोन आठवड्यांमध्ये वजन कमी करण्यास सांगितले होते.

https://www.instagram.com/p/BaV_3vDhXtX/

एका मुलीने याआधी वजन कमी केले नसल्यामुळे तिला तो सिनेमा मिळाला नव्हता. त्या मुली या जेनिफरपेक्षा बारीक होत्या. त्यावेळी मला असहाय, लाजिरवाणे आणि आयुष्यातील चुकीचा निर्णय घेतल्यासारखे वाटले होते. तेव्हा मी हे सगळे होऊ दिले, कारण करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे असे मला तेव्हा वाटत होते, असे जेनिफरने सांगितले. या सर्व प्रकारानंतर निर्मात्याने त्याच्या कृत्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, डाएटसाठी प्रेरणा मिळवण्यासाठी स्वतःचा नग्न फोटो नेहमी पाहायला पाहिजे.