‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळ खटॅक करू असा इशारा मनसेनं दिल्यानंतर सिनेमॅक्सने शो वाढवले आहेत. ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला मराठी सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे कल्याणमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एक शोच आहे. याविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्राइमटाइममधील शो द्यावा, अन्यथा खळ्ळ खटॅक करण्याचा इशारा मनसेचे कल्याण येथील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी दिला होता.

मनसेच्या या दणक्यानंतर ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचे रविवारपासून शो वाढवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. रविवारपासून या चित्रपटाचे चार शो सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार आहे. याबाबत मनसेला लेखी आश्वासन देण्यात येणार आहे.

वाचा : लेन्सच्या भीतीने चित्रपटाला नकार दिला होता- सुबोध

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये या चित्रपटाचा दिवसभरात फक्त एकच शो आहे. तो देखील दुपारी तीनचा. दुसरीकडे आमिर खान- अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचे दिवसातून आठ शो ठेवले आहेत. ही बाब मनसेचे कल्याणमधील शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांनी समजली असता त्यांनी कल्याणमधील सिनेमॅक्स व्यवस्थापनाला इशारा दिला. मनसेच्या अल्टिमेटमनंतर सिनेमॅक्सने शो वाढवण्याचा निर्णय घेतल आहे.