नॉनसेन्स कॉमेडी वा फार्स हा प्रकार तसा रोलरकोस्टर राइडसारखाच अक्षरश: गरगरायला लावणारा असतो. समोर जे काही घडतंय त्याचा कसलाही अर्थ लावण्याच्या भानगडीत न पडता (खरं तर तशी rv16संधीच प्रेक्षकाला मिळत नाही.) ते मुकाटपणे पाहत लोटपोट हसणं, किंवा ते पचनी पडलं नाही तर नाटकातून मुकाटपणे उठून निघून जाणं, एवढंच प्रेक्षकाच्या हाती असतं. त्यामुळेच हा नाटय़प्रकार सादर करणाऱ्यांची अक्षरश: कसोटीच असते. याचं कारण नाटकातल्या गतिमान घटना-घडामोडी अपेक्षित वेगाने आणि तितक्याच इंटेन्सिटीने प्रेक्षकापर्यंत पोचल्या नाहीत तर नाटक साफ कोसळण्याची भीती असते. गौतम जोगळेकरलिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘सर्किट हाऊस’ हा फार्स मात्र नॉनसेन्सपणाचा कळस गाठत प्रेक्षकांना हसून हसून चक्क गडाबडा लोळायला लावतो.
राज्याचा एक भानगडबाज मंत्री पोपटराव चावरे याने विरोधी पक्षनेत्याच्या पीएला- डॉलीला जराशी ‘गंमत’ करण्यासाठी म्हणून सर्किट हाऊसवर बोलावलेलं असतं. परंतु ही ‘गंमत’ सुरू करण्यापूर्वीच कुणीएक अज्ञात जासूस तिथं येऊन टपकतो. परंतु आपण पोपटरावच्या नजरेस पडू नये म्हणून लपण्याच्या धडपडीत असताना अपघातानं तो खिडकीच्या तावदानात अडकून गतप्राण होतो. आपण ज्या खोलीत आहोत तिथंच झालेल्या या दुर्घटनेचं बालंट आता आपल्यावरच येणार, हे लक्षात येताच पोपटराव ते निस्तरण्यासाठी आपला पीए चिंतामणीला तिथं तात्काळ बोलावतो. दरम्यान, सर्किट हाऊसमधील एका भोचक वेटरला पोपटराव आणि डॉली तिथं कशासाठी आलेत, हे त्यांच्या एकूण देहबोलीवरून लगेचच कळतं. मग अर्थातच तो पोपटरावला ब्लॅकमेल करण्याची संधी सोडतो थोडाच? तशात घाबरट चिंतामणी तिथं येऊन पोहोचतो. पण इथं खुनाचं प्रकरण आपल्याला निस्तरायचंच या कल्पनेनंच त्याला कापरं भरतं. तेवढय़ात सर्किट हाऊसचा मॅनेजर तिथं येऊन टपकतो. भरीस भर म्हणून डॉलीचा संतप्त नवरा रॉनी लोबोही  त्याचवेळी तिचा शोध घेत तिथं येतो. या सगळ्यांपासून डॉलीला आणि स्वत:लाही वाचवताना पोपटरावचा पाय आणखीनच खोलात रुतत जातो. हे कमी की काय म्हणून पोपटरावची बायको मैनाही तो पक्षश्रेष्ठींच्या बैठकीला न गेल्याचं कळल्यानं त्याचा माग काढत तिथं पोहोचते. पोपटरावला एकीकडे त्या मृत जासूसापासून आपला पिच्छा सोडवायचा असतो आणि त्याचवेळी आपले रंगढंग जगाला कळू नयेत यासाठी डॉलीलाही सर्वाच्या अपरोक्ष तिथून बाहेर काढायचं असतं.
तशात आपला पीए चिंतामणी याने आकस्मिक लग्न केल्याची थाप पोपटरावनं त्याच्या आजारी आईची देखभाल करणाऱ्या नर्सला फोनवरून ठोकलेली असते. त्याची शहानिशा करण्यासाठी तीही अचानक तिथं येऊन धडकते. मग सुरू होतो खेळ लपवाछपवीचा! डॉली कोण आहे, याचं उत्तर देताना आणि मृत जासूसाचं प्रकरण लपवताना पोपटराव ज्या एकेक तोंडाला येईल त्या थापा मारतो, त्यांतून आणखीनच नवनवे गुंते निर्माण होत जातात. त्या सगळ्यांतून तो कसा सहीसलामत बाहेर पडतो, हे पाहताना प्रेक्षकांची हसून हसून प्रचंड दमछाक होते.  
लेखक गौतम जोगळेकर यांनी अत्यंत गुंतागुंतीचा हा फार्स अप्रतिम विणला आहे. मती गुंग करणारी त्यांची वीण प्रेक्षकाला विचार करण्यासाठी किंचितही मोकळं सोडत नाही. ‘नमुने’दार पात्रांची निर्मिती करताना त्यांच्या इनोसन्सचा त्यांनी खुबीनं वापर केला आहे. आणि हे करताना नाटक कुठं घसरणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली आहे. फार्समध्ये सिच्युएशन्स महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर त्या सिच्युएशन्समध्ये अडकलेली पात्रं कशा तऱ्हेनं रिअॅक्ट होतात, यावरही त्याचं यशापयश अवलंबून असतं. याबाबतीत ‘सर्किट हाऊस’मध्ये नाव ठेवायला जागा नाही. मात्र, जासूसाकरवी पोपटरावला जाळ्यात अडकविण्याच्या विरोधकांच्या संभाव्य षड्यंत्राचं नाटकात पुढं काहीच होत नाही. त्यामुळे मग हा सारा खटाटोप नेमका कशासाठी होता, असा प्रश्न पडतो. दिग्दर्शकानंही त्याला वाऱ्यावरच सोडलं आहे.
विजय केंकरे हे अलीकडच्या काळातील फार्सवर हुकूमत असलेले दिग्दर्शक मानले जातात. फार्स हा हाताळायला अत्यंत ‘ट्रिकी’ प्रकार; परंतु केंकरे त्यात आता मास्टर झाले आहेत. पात्रं, घटना, त्यांतली गुंतागुंत आणि नवनव्या घोळांची भीषण गुंतवळ त्यांनी इतक्या लीलया हाताळली आहे, की पूछो मत! क्षणभरही प्रेक्षकांवरील आपली पकड ढिली पडणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे.
राजन भिसे यांच्या नेपथ्यात सर्किट हाऊसचं व्यक्तिमत्त्व तर उभं राहतंच; त्याचबरोबर यातल्या लपाछपीच्या खेळासाठी आवश्यक तो अवकाशही त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. नितीन कायरकर (संगीत) आणि शीतल तळपदे (प्रकाशयोजना) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. सोनिया परचुरेंची नृत्यरचना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा फार्सच्या प्रकृतीस पोषक अशीच. भरत वर्दमांच्या रंगभूषेनं वैविध्यपूर्ण पात्रांना ‘चेहरा’ दिला आहे.
संजय नार्वेकर हे मूलत:च विनोदाची अंगभूत जाण असणारे आणि फार्सच्या प्रकृतीशी जुळणारं व्यक्तित्व लाभलेले ताकदीचे नट आहेत. त्यांची देहबोली  आणि संवादफेकीवरची हुकूमत भल्याभल्यांना चक्रावून सोडणारी. ‘सर्किट हाऊस’मधील त्यांचा भानगडबाज, हिकमती गावरान राजकारणी पोपटराव चावरे आपल्या करणीनं आणि तल्लख डोकॅलिटीनं शब्दश: आ वासायला लावतो. त्यांचा भित्रट पीए चिंतामणी- भूषण कडू यांनी संस्मरणीय केला आहे. संहितेतल्या अनुल्लेखित जागा भरण्याचं त्यांचं कौशल्य यापूर्वीच्या त्यांच्या नाटकांतूनही सिद्ध झालेलं आहेच. लालची वेटरचा संभावितपणा प्रमोद कदम यांनी यथार्थ दाखवला आहे. अंकुर वाढवेंचा बुटबैंगण जासूस आपल्या वाटय़ाचे हशे चोख वसूल करतो. रेम्याडोक्याच्या रॉनी लोबोचा आडदांडपणा राहुल कुलकर्णीनी छान साकारला आहे. मयूरा रानडेंच्या डॉलीमध्ये अपेक्षित मादक ठसका आहे. नर्स सिंधूचं चिंतामणीवरील अव्यक्त प्रेम श्वेता घरत यांनी न उच्चारता व्यक्त केलं आहे. पोपटरावाची गुलछबू बायको मैना चावरे हिच्या भूमिकेत हेमांगी वेलणकर शोभल्या आहेत. अनिल कामतांचा वेंधळट सर्किट हाऊस मॅनेजरही ओके. मेंदूला न शिणवता फुल्टू एन्टरटेन्मेंट हवी असेल तर ‘सर्किट हाऊस’ला पर्यायच नाही.