|| सुहास जोशी

राजकीय नाटय़ावरील चित्रपट, मालिका, पुस्तक हे यशाचा हमखास फॉम्र्यूला ठरू शकतात, पण मांडणी करताना नेमकं काय मांडायचं आहे हेच कळलं नसेल तर गडबड होते. असंच काहीसं हॉटस्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजचं झालेलं आहे. राजकीय नाटय़ म्हणून या मालिकेचा गवगवा झाला असला तरी ना ती धड राजकीय आहे, ना गुन्हे कथा. ओढूनताणून आणलेलं राजकीय नाटय़, त्यात पुन्हा गुन्हेगारी विश्वाची जोड असं काही तरी करून मांडलेली ही वेबसीरिज आपली पुरती निराशा करणारी ठरते.

अमेयराव गायकवाड (अतुल कुलकर्णी) हा राज्यातील सर्वात प्रभावी राजकीय नेता. मात्र राज्याच्या राजकारणापेक्षा त्यांचे लक्ष दिल्लीकडे लागलेले असते. त्याच वेळी त्यांच्यावर भर रस्त्यात दोन मारेकऱ्यांकडून खुनी हल्ला होतो. एकीकडे त्यांची मृत्यूशी झुंज सुरू असते तर दुसरीकडे त्यांच्या मुला-मुलीमध्ये उत्तराधिकारी कोण होणार यावरून कुरघोडी सुरू होते. गायकवाडांचे मारेकरी शोधणे यावरून दुसरीकडे राजकारण सुरू होते. वीस वर्षांपूर्वी एन्काऊंटर किंग असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला त्यामध्ये सहभागी करून घेण्यास मुख्यमंत्री नरेंद्र गुरव (सचिन पिळगावकर) तयार नसतात, पण हा एन्काऊंटर किंग समांतरपणे तपास करत राहतो. आशीष (सिद्धार्थ चांदेकर) आणि पौर्णिमा (प्रिया बापट) या दोघा उत्तराधिकाऱ्यांच्या दाव्यामुळे अनेक गोष्टी घडत जातात. कधी आशुतोष आघाडीवर तर कधी पौर्णिमा आघाडीवर. या सगळ्या गदारोळात काही खून देखील पडतात. गायकवाडांच्या बेकायदेशीर संपत्तीचादेखील प्रश्न असतो.

राजकारण आणि गुन्हेगारी हे विषय हल्ली हातात हात घालून जातात असे म्हटले जाते. मात्र ते पडद्यावर मांडताना त्यापैकी कशाला झुकते माप द्यायचे याचे तारतम्य असणे गरजेचे असते. ही संपूर्ण मालिका पाहताना सतत हेच खटकत राहते. राजकारण अगदी तोंडी लावण्यापुरतेच वापरून बाकी सारा भर हा गुन्हेगारीकडे झुकणारा अधिक आहे. जे काही राजकारण आहे ते दोन व्यक्तींमधले. मुख्यमंत्री आणि प्रभावी नेता ही एक जोडी, तर गायकवाडांचा मुलगा आणि मुलगी ही दुसरी जोडी. राज्यातील इतर घडामोडी, गट-तट अशा बाबींना ही मालिका अजिबात स्पर्श करत नाही. त्यामुळे राजकीय नाटय़ म्हणून तिचे यश अगदीच मर्यादित राहते.

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्यामुळे यात खून वगैरे बाबी अगदी साहजिकच आहेत. मूळ कथाच खुनी हल्ल्यावर उभी राहिलेली आहे. पण मालिकेत त्यानंतर सर्रास खून पाडलेले आहेत. या खुनांमुळे मुख्य कथानक फार काही मोठे वळण वगैरे घेते असेदेखील होत नाही. पण सटासट खून दाखवून उगाचच काहीतरी नाटय़ निर्माण करण्याचा आव आणल्यासारखे वाटते. मालिकेतील काही प्रणयदृश्ये आणि समलैंगिक दृश्ये ही समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली होती. पण त्यातील समलैंगिक प्रणयाचा प्रसंग तर अगदीच अचानकपणे टपकतो. कसलीही पाश्र्वभूमी न मांडता आलेला हा प्रंसग विसंगतीच निर्माण करतो. तर इतर प्रणयदृश्ये ही निव्वळ हास्यास्पद आहेत.

मुख्य कथानकाच्या परिघावरची काही पात्रे यामध्ये भरपूर फुटेज खातात. त्या पात्रांची एका ठरावीक मर्यादेपर्यंत कथानकात गरज आहे. ती त्या एका ठरावीक घटनेपुरती अतिशय महत्त्वाची ठरतात. पण त्या पात्रांभोवती गुंफलेले कथानक इतके बाळबोध आहे की दिग्दर्शकाला नेमके यातून काय साधायचे आहे हेच कळत नाही. यातील एका पात्राचा संदर्भ गायकवाडांच्या संपत्तीच्या हिशोबाशी आहे. ती भूमिका संदीप कुलकर्णीने साकारली आहे. मात्र त्याच्या अभिनयाच्या ताकदीचा काडीचाही वापर दिग्दर्शकाने केलेला नाही. उलट ते पात्र हास्यासपद करून ठेवले आहे. तर दुसरे पात्र हे मारेकऱ्याची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याभोवतीचे कथानकदेखील असेच बाळबोध झाले आहे.

कथानक महाराष्ट्रातले, कथेतील पात्रंदेखील मराठी आणि बहुतांश कलाकारदेखील मराठी पण प्रत्यक्षात यातील मराठी संवाद हे भाषांतरित वाटतात. किंबहुना मराठी वेबसीरिज अशी जाहिरात केली गेली असली तरी प्रत्यक्षात दोन दाक्षिणात्य भाषा आणि मराठी, हिंदी या भाषांमध्येदेखील सीरिज पाहता येते. आणि लिपसिंक पाहता ही सीरिज मूळ मराठीत नसावी याची खात्री पटते. अगदी छापील स्वरूपात केलेले मराठी भाषांतर हा या सीरिजचा सर्वात कमकुवत भाग आहे. बोलीभाषेचा संपूर्ण अभाव संवादांमध्ये अगदी ठळकपणे जाणवत राहतो. त्यापेक्षा हिंदीमधून पाहणंच श्रेयस्कर वाटते. किंवा इंग्रजी सबटायटल असल्यामुळे इतर भाषेत पाहून देखील फारसा फरक पडत नाही. शिव्या या काही संवादांचे अविभाज्य अंग असतात हे मान्यच आहे. कथानकातील पात्रांनुसार या शिव्या अनेकदा योग्य प्रभाव टाकतात. पण याचा अर्थ मनात आले म्हणून प्रत्येक वाक्यात येणाऱ्या शिव्या या निव्वळ अडथळा ठरू शकतात.

नागेश कुकनुर हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चांगल्या कलाकृती सादर केल्या आहेत. पण या वेबसीरिजमध्ये मात्र त्यांनी पुरती निराशा केली आहे. राजकीय नाटय़ाचा हा चांगला विषय त्यातील असंख्य कमकुवत घटकांमुळे किमान साधे दोन घटका मनोरंजन करण्यातदेखील अयशस्वी ठरतो. अर्थात मालिकेच्या अखेरीस पुढील सीझनची बीजं पेरलेली आहेत, त्यामुळे पुढील सीझनमध्ये काहीतरी वेगळे पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

  • सिटी ऑफ ड्रीम्स
  • ऑनलाइन अ‍ॅप – हॉटस्टार
  • सीझन – पहिला