‘कटय़ार काळजात’ घुसली या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले शास्त्रीय गायक महेश काळे नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या नव्याकोऱ्या संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोमध्ये महेश काळे पहिल्यांदाच परीक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहेत. देशपरदेशात शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या या तरुण गायकाला नव्या पिढीची नस अचूक लक्षात आली आहे. त्यामुळे या शोच्या माध्यमातून तरुणांना शास्त्रीय संगीतापर्यंत कसे आणणार? या प्रश्नावर ‘कटय़ार काळजात घुसली’चे संगीत हा भेळपुरीसारखा प्रकार होता तो जर या पिढीला आवडला तर शास्त्रीय संगीताची पुरणपोळीही त्यांना नक्कीच आवडणार, असा विश्वास महेश काळे यांनी व्यक्त केला. या नव्या शोमधील नव्या भूमिकेच्या निमित्ताने चित्रपट संगीत आणि विविध शास्त्रीय मैफिलींमधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका स्वीकारताना नेमका काय विचार केला, शास्त्रीय संगीताविषयीचे त्यांचे विचार, याशिवाय रिअ‍ॅलिटी शोमधून एरव्हीही संगीताचा प्रचार करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली.

रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका स्वीकारण्यामागचा उद्देश काय होता?

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

मुळात रिअ‍ॅलिटी शोच्या परीक्षकांची प्रसिद्धी ही त्यांच्या दिसण्यातून आणि परीक्षण करणाच्या शैलीवर आधारलेली असते. म्हणजे परीक्षक हा एखादा मुकुट घालूनच प्रेक्षकांसमोर येतो. मात्र असा कोणत्याही प्रकारचा मुकुट घालण्याचा माझा प्रयत्न नसणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकींसारख्या वटवृक्षाच्या सावलीखाली संगीत शिकण्याची संधी मला लाभली. या शिकवणीतून जे काही गवसले, जे मौल्यवान विचार कानी पडले ते या शोमध्ये सहभागी असलेल्या आत्ताच्या पिढीतील स्पर्धकांपर्यंत पोहचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. शास्त्रीय संगीत ऐकणे हा केवळ मजेचा किंवा समाधानाचा भाग नसून त्यामध्ये विचार मांडण्याची ताकद असल्याने खऱ्या अर्थाने आपले भावविश्व त्याने समृद्ध होते. त्यामुळे शास्त्रीय संगीत आणि त्यातील मूल्ये यांचा प्रसार करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचे माध्यम स्वीकारण्यासाठी तयार होतो. टेलीव्हिजन तर घराघरांत पोहोचलेले आणि अबालवृद्धांकडून पाहिले जाणारे माध्यम असल्याने या शोमधून शास्त्रीय गायनाचे महत्त्व सर्वदूर पोहोचवण्यास मदत होईल, या विचाराने मी या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झालो आहे.

शोमध्ये मार्गदर्शकाची भूमिका कशा प्रकारे सांभाळणार आहात ?

या शोमध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक हा मुळातच प्रस्थापित गायक आणि गायिका आहेत. अशाच रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून पुढे येत त्यांनी आपले नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या शोचे माध्यम नवीन नाही. उलट, रिअ‍ॅलिटी शो ही माझ्यासाठी नवीन संकल्पना आणि माध्यम असल्याने त्यांच्याकडून मलाच खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांना गायनाच्या पूर्णत्वापर्यंत कसे पोहोचता येईल, हे समजावून देणं हेच माझं उद्दिष्ट असणार आहे. शिवाय, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझ्या गुरूंच्या शिकवणीतील काही पैलू या मुलांसमोर उलगडण्याचा माझा प्रसत्न असणार आहे. एकंदरीतच या शोच्या प्रवासात होणाऱ्या वैचारिक देवाण-घेवाणीच्या प्रक्रियेमुळे मलाही एका अर्थी समृद्ध होता येणार आहे.

आताच्या पिढीला शास्त्रीय संगीतात कितपत रुची आहे, असे वाटते..

आताच्या पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण ती आत्यंतिक हुशार आहे. प्रत्येक ठिकाणी समाजच जर नव्या पिढीच्या माथ्यावर हिंदी अथवा पाश्चिमात्य संगीताचा मारा करत असेल तर शास्त्रीय संगीत किंवा मराठी चित्रपट संगीत या पिढीपर्यंत पोहचणार कसे? त्यामुळे पूर्णपणे दोष या पिढीचा आहे, असे मी म्हणणार नाही. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाचे संगीत हे एखाद्या भेळपुरीसारखे होते. ही ‘भेळ’ उत्तम जमल्याने तरुणांना ती गाणी आवडली. मग त्यांना जर शास्त्रीय आणि भावसंगीताची ‘भेळ’ आवडली असेल तर शास्त्रीय संगीतासारखी ‘पुरणपोळी’ त्यांना नक्कीच आवडेल. फक्त ही पुरणपोळी त्यांना खाऊ  घालण्यासाठी आपणच प्रयत्न  करायला हवेत. जर चांगल्या हेतूने आणि दर्जेदार संगीत देण्यावर आपण भर दिला तर नक्कीच नवी पिढी अभिजात संगीताकडे वळेल. शिवाय कला ही नेहमीच जनसामान्यांकडून दुर्लक्षित राहिलेला घटक आहे, कारण जिथे दोन वेळेच्या जेवण्याची सोय करण्यासाठी धडपड करावी लागते, तिथे कलेची साधना किंवा ती ग्रहण करण्याची समज कशी निर्माण होईल, याचाही विचार करून संगीताच्या प्रसारासाठी नवे मार्ग निर्माण करायला हवेत.

आत्ताच्या बदलत्या गुरू-शिष्य परंपरेकडे तुम्ही कसे पाहता?

बदलती गुरू – शिष्य परंपरा ही एकतर्फी रस्ता आणि चारपदरी महामार्ग अशी आहे. पूर्वी शिष्याला केवळ विशिष्ट कलेतच आपले आयुष्य व्यतीत करायचे होते, म्हणजे हे एकतर्फी रस्त्यावरून चालण्यासारखे झाले. मात्र बदलत्या काळाप्रमाणे गुरू आणि शिष्य या दोघांची नातीदेखील बदलत गेली आहेत. आता शिष्याला कलेच्या शिक्षणाबरोबरच शैक्षणिक जबाबदारीदेखील पूर्ण करायची असते. शिवाय सामाजिक जबाबदारीदेखील असते आणि समाजमाध्यमांवरही त्याला व्यक्त व्हायचे असते, अशी चौपदरी कामं त्याला पार पाडावी लागतात. शिवाय माझ्या पिढीतील कोणतेही गुरू हे गुरू नसून आपापल्या थोर गुरूंकडून मिळालेली देणगी कलेच्या उपासकापर्यंत पोहोचविणारा तो केवळ पाईक आहे, या विचाराने वावरत होते. हल्ली संगीत क्षेत्रातच काय अन्य कुठेही, कोणताही गुरू माझ्या घरात राहून शिक.. असे शिष्यांना म्हणत नाही. कारण त्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे शिष्यांची सध्याची जीवनशैली, त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्याला त्याच्या कलेतून समृद्ध कसे करावे याकडे सध्याच्या गुरूंचा कल आहे.